देवगड हापूसच्या खरेदीची फसवणूक टाळण्यासाठी !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2017 13:33 IST2017-03-28T08:03:08+5:302017-03-28T13:33:08+5:30
महाराष्ट्रात देवगड हापूसच्या नावाखाली अन्य जातींचे आंबे ग्राहकांना विकले जाण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे ग्राहकांना अस्सल देवगड हापूसची चव चाखायला मिळत नाही.
.jpg)
देवगड हापूसच्या खरेदीची फसवणूक टाळण्यासाठी !
कोकणातील देवगड तालुक्यात हापूस आंब्याचे मोठे उत्पादन घेतले जाते. हा आंबा देवगडचा हापूस म्हणून भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे. मात्र महाराष्ट्रात देवगड हापूसच्या नावाखाली अन्य जातींचे आंबे ग्राहकांना विकले जाण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे ग्राहकांना अस्सल देवगड हापूसची चव चाखायला मिळत नाही. यासाठी ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी देवगड तालुका आंबा बागायतदार आणि व्यापारी उत्पादक संघाने पुढाकार घेतला आहे. राज्यातील प्रमुख बाजार आवारातील विक्रेत्यांमार्फत अस्सल देवगड हापूसची विक्री करण्यात येणार आहे.
ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी तसेच ग्राहकांना देवगड हापूस ओळखता यावा, यासाठी संस्थेचे नाव असलेले विशिष्ट बॉक्स तयार करण्यात आले आहेत. या बॉक्समधून देवगड हापूसची विक्री करण्यात येणार आहे. त्यावर शेतकऱ्याचा मोबाइल क्रमांक, कोड क्रमांक, संस्थेचा मोबाईल क्रमांक, नोंदणी क्रमांक याबाबत माहिती देण्यात आली आहे. एखाद्या बॉक्समधील फळ खराब निघाले तर त्याची तक्रार संस्थेकडे करता येईल. विक्रेत्यांवर संघाचे नियंत्रण असणार आहे. सामान्यांना देवगड हापूसची चव चाखता यावी, यासाठी आकाराने लहान असलेला आंबा विक्रीसाठी पाठवला जाणार आहे.
कसा ओळखाल देवगडचा हापूस
देवगडची साल पातळ असून ती साल सहज निघते, त्याचा गर केशरी रंगाचा असतो शिवाय सालीसोबत गर निघत नाही तसेच फोडीसोबत रेषा निघत नाहीत.
देवगड हापूसच्या ओळखीची जपवणूक
फळबाजारातील विक्रेते शेखर कुंजीर यांच्या गाळ्यावर एक एप्रिलपासून देवगड हापूस विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. संपूर्ण हंगामात फळांच्या आकारानुसार दर ठरवण्यात येणार आहेत. तीनशे ते सातशे रुपयांपर्यंत डझनाचे दर असतील. देवगड हापूसची ओळख जपण्यासाठी आम्ही हा उपक्रम राबविणार आहोत, असे जोशी यांनी सांगितले.