कर्करोगावर मात करणारे सेलिब्रिटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 08:30 IST2016-02-05T03:00:22+5:302016-02-05T08:30:57+5:30
कॅन्सर हा केवळ शब्द ऐकूनही अंगावर काटा उभा राहतो. परंतु प्रचंड आत्मविश्वासाच्या बळावर या आजाराशी संघर्ष करणारे, त्यातून सुखरूप बाहेर येणारेही अनेक आहेत.

कर्करोगावर मात करणारे सेलिब्रिटी
काल-परवाच जगभरात कॅन्सर डे पाळण्यात आला. कॅन्सर हा केवळ शब्द ऐकूनही अंगावर काटा उभा राहतो. परंतु प्रचंड आत्मविश्वासाच्या बळावर या आजाराशी संघर्ष करणारे, त्यातून सुखरूप बाहेर येणारेही अनेक आहेत. आपल्याला आवडणारी विविध क्षेत्रातील अशी काही मंडळी आहेत ज्यांनी ही करामत करून दाखवली आहे. अशाच काही सेलिब्रिटींची ही साहसकथा...
मनीषा कोईराला
सर्वकाही छान सुरू असताना एकेदिवशी मनीषाच्या आयुष्यात आक्रित घडले. तिला अंडाशयाचा कर्करोग असल्याचे उघड झाले. ती उपचारासाठी अमेरिकेस गेली. अत्यंत संघर्ष केल्यानंतर तिने कर्करोगावर मात केली. जेव्हा ती परत आली, तेव्हा तिच्या चेहºयावर हास्य होते. कर्करोग तुमच्या शरीराला इजा करू शकतो. परंतु, तुमच्या जिद्दीला नाही, हाच संदेश ती आजही देत असते.
युवराज सिंग
भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू युवराजला सेमिनोमा (फुफ्फुस आणि हृदय यांच्यादरम्यान झालेली गाठ) झाल्याचे आढळून आल्यानंतर सारे क्रिकेटविश्व हादरले. युवराज उपचारासाठी अमेरिकेला गेला. त्या ठिकाणाहून त्याने फेसबुकवर अपडेट करीत आपल्या फॅन्सना दिलासा दिला. तो परतला तो विजयी होऊनच. त्याने यावर पुस्तकही लिहिलेय, ‘द टेस्ट आॅफ माय लाईफ’
लिसा रे
कर्करोगाशी लढा दिल्यानंतर आॅक्टोबर २०१५ मध्ये लिसा रे हिने आपण कॅन्सरसोबत लढत असल्याचे मान्य केले. ‘मला रक्ताचा कर्करोग झाला आहे, हा आजार बरा होण्यासारखा नाही आणि मी अशाही स्थितीत लढते आहे, असे तिने सांगितले. तिच्या जगण्याच्या जिद्दीला नक्कीच सलाम करण्यासारखे आहे.
अनुराग बासू
लाईफ इन मेट्रो आणि बर्फी अशा उत्तम चित्रपटाचे दिग्दर्शन करणारा अनुराग बासू हा रक्ताच्या कर्करोगाशी झगडतोय, हे किती लोकांना माहिती आहे? डॉक्टरांनी त्याला केवळ २ महिने जगशील असे सांगितले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत त्याने ‘लाईफ इन मेट्रो’ आणि ‘गँगस्टर’ची स्क्रीप्ट लिहून काढली. तो अजूनही काम करतोय याचे कारण त्याचे जीवनावरील प्रेम आहे.
हग जॅकमन
२०१३ साली हग जॅकमॅनच्या नाकाच्या पेशींमध्ये त्वचेचा कर्करोग आढळून आला. त्यानंतर त्याने अनेक उपचार घेतले. प्रत्येक तीन महिन्याला तो वैद्यकीय तपासणीसाठी जात असतो. स्वत:ची काळजी घेण्याबरोबरच त्याने त्वचेच्या कर्करोगाबाबत सार्वजनिक काळजी घेण्यासाठी चळवळही सुरू केली आहे.