/>जगात कुठेही गेले तरी मृत व्यक्तीला अंतिम संस्कारासाठी स्मशानभूमीत साडेतीन पावले जागा पुरेसी ठरते. मात्र आजकाल वाढत्या शहरीकरणामुळे हल्ली बºयाच ठिकाणी तेवढीही जागा मिळत नाही. यातून मार्ग काढण्यासाठी ब्राझिलमध्ये एक जगावेगळी स्मशानभूमी आहे. जमिनीच्या वर असलेली ही स्मशानभूमी चक्क बहुमजली आहे. सेंटॉस शहरातील या स्मशानभूमीमध्ये मृत्यूनंतर समुद्र, जंगल, स्टेडियम वा हव्या त्या दिशेला तोंड करून चिरनिद्रा घेण्याचाही पर्याय उपलब्ध आहे. फक्त ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मृत्यूआधी त्याचा मृत्यूपत्रात उल्लेख वा नातलगांना कल्पना द्यावी लागते. ही स्मशानभूमी १४ मजली इमारत असून त्यात १६ हजार कबरी आहेत. भविष्यात गरज भासल्यास ही स्मशानभूमी ३२ मजल्यांपर्यंत वाढविली जाऊ शकते. जमिनीपासून १०८ मीटर उंचीवर असलेल्या या स्मशानभूमीमध्ये चिरनिद्रा घेतल्यानंतर स्वर्गाच्या जवळ पोहोचल्याचा अनुभव येतो, असा समज आहे. जगावेगळी आणि सगळ््यात उंच असल्याने या स्मशानभूमीचा गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही समावेश आहे. दु:ख हलके करण्यासाठी या स्मशानभूमीत एक मिनीबार आणि शानदार वेटिंग रूमसुद्धा आहेत.