Akshaya Tritiya 2017 : जाणून घ्या महत्त्व, शुभ वेळ आणि पूजा-विधी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2017 15:14 IST2017-04-26T09:20:12+5:302017-04-26T15:14:57+5:30

‘अक्षय तृतीया’हा सण वैशाख महिन्यात शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरा केला जातो. यावर्षी २८ एप्रिल रोजी सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे.

Akshaya Tritiya 2017: Know importance, auspicious time and worship! | Akshaya Tritiya 2017 : जाणून घ्या महत्त्व, शुभ वेळ आणि पूजा-विधी !

Akshaya Tritiya 2017 : जाणून घ्या महत्त्व, शुभ वेळ आणि पूजा-विधी !

ong>-Ravindra More 
‘अक्षय तृतीया’हा सण वैशाख महिन्यात शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरा केला जातो. यावर्षी २८ एप्रिल रोजी सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. अक्षय्य तृतीया हा महत्त्वाच्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ ‘अक्षय्य’(न संपणारे) असे मिळते. अक्षय्य तृतीयेला ब्रह्मा व श्रीविष्णु यांच्या मिश्र लहरी उच्च देवतांच्या लोकांतून, म्हणजे सगुणलोकांतून पृथ्वीवर येतात. त्यामुळे पृथ्वीवरील सात्त्विकता १० टक्कयांनी वाढते, अशी कल्पना आहे.

अर्थ : 
सदोदित किंवा सातत्याने सुख व समृद्धि प्राप्त करून देणाऱ्या देवतेची अक्षय तृतीयेच्या दिवशी कृतज्ञतेचा भाव ठेवून केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणाऱ्या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही. देवतेची कृपादृष्टि सदोदित आपल्यावर राहण्यासाठी अक्षय तृतीयेला कृतज्ञ भाव ठेवून तिची उपासना करणे. 

मूर्तिका पूजन : 
सदोदित कृपादृष्टि ठेवर्णया मूर्तिकेमुळेच आपल्याला धान्यलक्ष्मी, धनलक्ष्मी व वैभवलक्ष्मी यांची प्राप्ति होते. अक्षयतृतिया हा दिवस म्हणजे कृतज्ञ भाव ठेवून मूर्तिकेची उपासना करण्याचा दिवस.

मातीत आळी घालणे व पेरणी : 
पावसाळा तोंडावर घेऊन अक्षय तृतीया येते. वर्षाऋतूच्या आगमनाचा म्हणजे मृग नक्षत्राचा व या तिथीचा घनिष्ट संबंध आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीचे अक्षय तृतीयेपर्यंत मशागत करण्याचे काम पूर्ण करावे. अक्षय तृतीयेच्या दिवशी मशागत केलेल्या जमिनीतील मूर्तिकेचे कृतज्ञ भाव ठेवून पूजन करावे. त्यानंतर पूजन केलेल्या मूर्तिकेमध्ये आळी घालावीत व त्या आळयांमध्ये बियाने पेरावे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बियाणे पेरण्यास सुरुवात केल्यास त्या बियाणांपासून विपुल धान्य पिकते व कधीही बियाणाला तोटा पडत नाही. त्यामुळे वैभव प्राप्त होते.  

वृक्षरोपण :
अक्षय तृतियेच्या शुभमुहूर्तावर आळी करून लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात. तसेच आयुवेर्दात सांगितलेल्या औषधी वनस्पतीही अक्षय तृतियेच्या मुहूर्तावर रोवल्यास या वनस्पतींचा क्षय होत नाही, म्हणजेच औषधी वनस्पतींचा तुटवडा भासत नाही.

अक्षय तृतियेच्या दिवशी श्रीविष्णुसहित वैभवलक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन करण्याचे महत्त्व :
अक्षय तृतियेच्या दिवशी राजाने किंवा प्रजेच्या पालनपोषणाची जबाबदारी असणाऱ्यानी सामूहिकरीत्या राजवाड्यात किंवा सामूहिक पूजाविधीच्या ठिकाणी श्रीविष्णुसहित वैभवलक्ष्मीच्या प्रतिमेचे कृतज्ञतेचा भाव ठेवून भक्तिभावाने पूजन करावे. यामुळे प्रजा सुखी व समृद्ध होते. लक्ष्मीदेवीची कृपाच आपल्यावर होत नाही; कारण लक्ष्मीदेवी ही श्रीविष्णूची शक्ति आहे. जेथे श्रीविष्णूलाच बोलावणे नाही, तर त्याच्यासोबत किंवा त्याच्यात असणारी त्याची शक्ति कशी बरे पूजास्थळी येऊन कृपा करेल? म्हणून कोणत्याही रूपातील श्रीलक्ष्मी पूजनाच्या वेळी श्रीविष्णूला प्रथम आवाहन करावे व नंतर श्रीलक्ष्मीलाही आवाहन करावे. त्यामुळे उपासकाला लक्ष्मीतत्त्वाचा जास्तीत जास्त लाभ होतो.
दुसरया ताटलीत आपल्याला पूर्वजांना आवाहन करायला पाहिजे. पूर्वजांना तीळ अर्पण करण्यापूर्वी तिळांमध्ये श्रीविष्णू व ब्रह्मा यांती तत्त्वे येण्यासाठी देवतांना प्रार्थना करावी. त्यानंतर पूर्वज सूक्ष्मातून आलेले आहेत व आपण त्यांच्या चरणावर तीळ आणि जल अर्पण करीत आहोत, असा भाव ठेवावा. त्यानंतर दोन-तीन मिनिटांनी देवतांच्या तत्त्वांनीभारित झालेले तीळ व अक्षदा पूर्वजांना अर्पण कराव्यात. सात्त्विक बनलेले तीळ हातात घेऊन त्यावरून ताटामध्ये हळुवारपणे पाणी सोडावे. त्यावेळी दत्त किवा ब्रह्मा किवा श्रीविष्णू यांना पूर्वजांना गती देण्यासाठी विनंति पूर्वक प्रार्थना करावी, असे शास्त्रात सांगितले आहे. तीलतर्पणामुळे पूर्वजांच्या सूक्ष्मदेहातील सात्त्विकता वाढून त्यांना पुढच्या लोकात जाण्यासाठी आवश्यक ऊर्जा मिळते व मानवाला पूर्वजांपासून जो काही त्रास होत असल्यास तो कमी होतो, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे.

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी काय करावे 
या दिवशी आपल्या जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत अंघोळ करावी.
सकाळी पंखा, तांदूळ, मीठ, तूप, साखर, चिंच, फळ आणि वस्त्राचे दान देऊन ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी.
ब्राह्मणास भोजन घालावे.
या दिवशी सातूचे महत्त्व असून ते जरूर खायला हवेत.
या दिवशी नवीन वस्त्र, शस्त्र, दागिने विकत घ्यावेत.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे आदी शुभ कामेही केली जातात.  

शुभ मुहूर्त 
अक्षय तृतीया २८ एप्रिल रोजी सकाळी १०.२९ पासून सुरु होईल आणि २९ रोजी सकाळी ६.४९ वाजेपर्यंत असेल. २८ रोजी पूर्ण दिवस राहील सोबतच दुपारी १.३९ मिनिटांनी रोहिणी नक्षत्र लागेल. या नक्षत्रात खरेदी करणे शुभ मानले जाते.  

Web Title: Akshaya Tritiya 2017: Know importance, auspicious time and worship!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.