/> माणूस हा कोणत्याही वयात शिक्षण घेऊ शकतो व जन्मभर विद्यार्थी असतो. हे नेपाळ मधील एका ६९ वर्षाच्या आजोबांनी दाखवून दिले आहे. ते या वयातसुद्धा दररोज एक तासाहून अधिक वेळ पायी प्रवास करुन दररोज शाळेत जातात. दुर्गे खामी असे या आजोबाचे नाव आहे. शाळेतील विद्यार्थी झोपेतून उठल्यानंतर जशी शाळेची तयारी करतात. तसेच हे आजोबाही सकाळी उठल्यानंतर शाळेचा पोशाख परिधान करुन, पाठीला मुलांसारखे दप्तर लटकावून शाळेला निघतात. हिमालयाच्या कुशीत सँगजा असे त्यांच्या गावाचे नाव आहे. या वयातील व्यक्ती आरोग्याच्या समस्यानेच ग्रासलेले असतात. त्यांच्या तब्येतीची घरातील इतर मंडळींना काळजी घ्यावी लागते. मात्र, हे आजोबा तब्येतीचा कोणताच विचार न करता दररोज शाळेत जातात. त्यांना शिकविणारे शिक्षकही त्यांच्यापेक्षा वयाने खूप लहान आहेत. परंतु, ते त्याचा कोणताही कमीपणा वाटू देत नाहीत. ते शाळेतील मुलांबरोबर दररोज खेळ सुद्धा खेळतात. घरी करण्यासाठी दिलेला गृहपाठही ते नियमितपणे पूर्ण करतात. दहावीच्या वर्गात सध्या ते शिक्षण घेत आहेत. शिक्षणाचे महत्त्व न समजल्यामुळे व शाळा लांब असल्याने लहानपणी शिक्षण घेता आले नसल्याचे ते सांगतात. सोशल मीडीयावरही हल्ली या विषयाची चर्चा होत आहे.