Udhampur Airbase Pakistan Attack, Fact Check: पाकिस्तानच्या मदतीने दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये गोळीबार करत २६ निष्पाप हिंदूंची हत्या केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानेपाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये ऑपरेशन सिंदूर केले. त्यात दहशतवाद्यांचे ९ तळ उद्ध्वस्त करण्यात आले. तसेच, सुमारे १०० दहशतवादीही मारले गेले. इतका मोठा धक्का देऊनही पाकिस्तानच्या नापाक कुरापती सुरूच आहेत. गेले २ दिवस अंधार पडल्यानंतर पाकिस्तानी सैन्याकडून भारताच्या सीमेलगतच्या भागांना लक्ष्य केले जात आहे. दुसरीकडे पाकिस्तानी मीडियाच्या माध्यामातून खोटे दावे करत जगाची आणि विशेषत: भारतीयांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण भारतीय सैन्यदल आणि सायबर विभाग पाकिस्तानचे दोन्ही आघाड्यांवरील हल्ले हाणून पाडत आहेत.
पाकिस्तानने उधमपूर एअरबेस उडवल्याचा दावा खोटा
प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो ऑफ इंडिया म्हणजेच पीआयबीकडून सातत्याने विविध बातम्या आणि सोशल मीडिया पोस्ट यांच्या सतत्येची पडताळणी सुरु आहे. याचदरम्यान, एका न्यूज चॅनेलने दावा केला होता की, पाकिस्तानने भारतातील एक एअरबेस नेस्तनाबूत केला. पण तो दावा आणि बातमी खोटी असल्याचे पीआयबीने सांगितले आहे. तसेच, तो एअरबेस पूर्णपणे सुरक्षित असून, सध्या तेथे दैनंदिन कामकाज (IOperational) सुरु आहे असेही सांगण्यात आले.
भारताच्या PIB ने केली पाकिस्तानची पोलखोल
AIK न्यूज या वृत्तवाहिनीने लाईव्ह टीव्हीवर दावा केला होता की, पाकिस्तानने भारतात विविध हल्ले केले, त्यातील एका हल्ल्यात भारताच्या उधमपूरचा एअरबेस उद्ध्वस्त केला आहे. पण हा दावा साफ खोटा निघाला. त्या न्यूज चॅनेलने प्रसारित केलेले व्हिडीओ आणि आणखी काही सोशल मीडियावर व्हायरल झालेले व्हिडीओ हे उधमपूर एअरबेसचे नाहीत. राजस्थानच्या हनुमानगड परिसरातील एका केमिकल फॅक्टरीला काही काळापूर्वी आग लागली होती. त्याचा व्हिडीओ चुकीच्या पद्धतीने प्रसारित केला जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच या व्हिडीओ सध्या सुरु असलेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षाशी काहीही संबंध नाही, असे PIB ने स्पष्टपणे सांगितले आहे.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून पाकिस्तानी सैन्याकडून अंधार पडल्यानंतर हल्ले करण्याचा सपाटा सुरू आहे. भारतीय सैन्य त्यांचे हल्ले परतवून लावत आहे. याचदरम्यान, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF ने पाकिस्तानला मोठ्या रकमेचे कर्ज मंजूर केले आहे. त्यामुळे या युद्धाची तीव्रता आणखी किती वाढेल, याकडे साऱ्यांचेच लक्ष आहे.