- अविनाश कुबल ,पर्यावरण तज्ज्ञ
पाणथळी (वेटलॅंड) जागा ही पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची नैसर्गिक संरचना. पृथ्वीवरील परिसंस्थांच्या यादीतील एक महत्त्वाची परिसंस्था. या परिसंस्थेमध्ये गोड्या तसेच खाऱ्या पाण्याच्या क्षेत्रात आढळणाऱ्या विविध वनस्पती, त्या वनस्पतींच्या आधारे निर्मित अन्न साखळ्यांचा भाग असलेले विविध प्रकारचे सजीव यांचा समावेश होतो. यात अतिसूक्ष्म कीटकांपासून ते थेट महाकाय प्राण्यांचा समावेश आहे. या सर्व प्राण्यांचे पोषण व संवर्धन करणारी ही परिसंस्था. देशातील या परिसंस्थेचे आरोग्य कसे आहे याबद्दलचा एक अभ्यास नुकताच केंद्र शासनाच्या वने, पर्यावरण व हवामान बदल मंत्रालयाने पूर्ण केला. यात राज्यातील २३ हजारांपैकी अवघ्या १८ पाणथळींना ‘हेल्थ कार्ड’ मिळाले आहे.
देशभरातील २१,१२,६३२.९६ हेक्टर इतक्या विशाल भूभागाचे सर्वेक्षण करून एकूण ७,५७,०८० इतक्या पाणथळी जागांचा अभ्यास करण्यात आला. राज्यातील जवळपास २३,००० पाणथळी जागांचा अभ्यास करून शासनाद्वारे ठरविलेल्या निकषांच्या आधारे त्याचा सद्यस्थिती अहवाल तपासला असता या पाणथळी जागांपैकी केवळ १८ जागा निकष पूर्ण करू शकल्या. म्हणजेच राज्यातील केवळ ०.०७८ टक्के पाणथळी जागा केंद्राच्या निकषांनुसार योग्य स्थितीत आहेत. अथवा राज्यातील ९९.९२ टक्के इतक्या पाणथळी योग्य स्थितीमध्ये नाहीत हे सिद्ध झाले.
कसे मोजतात पाणथळींचे आरोग्य?केंद्र शासनाच्या निकषांचा विचार केला असता पाणथळी क्षेत्राची सुदृढता (आरोग्य) काही निकषांवर आधारित आहे. असे क्षेत्र ज्याला विशिष्ट असे पर्यावरणीय अर्थात पाणथळी स्वरूप टिकवून ठेवणे सहज शक्य आहे. आणि त्याचे हे पर्यावरणीय स्वरूप सहजासहजी बदलणार नाही, असे असायला हवे. प्रमुख चार मुद्दे म्हणजे त्या पाणथळीच्या प्रदेशात स्थानिक नसलेल्या वनस्पती प्रजातींची अनिर्बंध वाढ झालेली नसावी. स्थानिक प्रजातींची वाढ खुंटणे अथवा त्यांच्या वाढीवर मर्यादा असता कामा नये. पाण्यामध्ये कोणत्याही प्रदूषकांचे प्रमाण असू नये. तसेच भारतीय प्रमाण पद्धती आयएसआय अथवा आंतरराष्ट्रीय प्रमाण पद्धती म्हणजे डब्ल्यूएचओच्या निकषांनुसार पाण्यातील घटकांमध्ये प्रमाणाबाहेर वाढ अथवा प्रमाणाबाहेर कमतरता असू नये. शेवटचे म्हणजे पाणथळी जागा लगतच्या प्रदेशात मनुष्यनिर्मित दृश्यमान बदल तसेच पर्यावरणीय घटनांमुळे घडून आलेला बदलसुद्धा अमान्य असतो.
याचा बसला फटका : मनुष्यनिर्मित बांधकामे, जलप्रदूषण, अस्थानिक पाण वनस्पतींची बेफाम वाढ, अशा सर्व कारणांमुळे महाराष्ट्रातील पाणथळी जागा सुदृढ यादीत येऊ शकत नाहीत. पाण्याचे प्रदूषण थांबविणे, पाण्यातील अस्थानिक प्रकारच्या वनस्पतींची वाढ रोखणे, पाणथळी प्रदेशात बांधकामांवर नियंत्रण असे उपाय करावे लागतील.
सुदृढ पाणथळीचे निकष कोणते? कोणत्याही प्रकारचे प्रदूषण नसावे, पाण्यामध्ये अतिरिक्त प्रमाणात जैविक कचरा पडल्यामुळे त्याचे कुजणे, त्यातून दुर्गंधी येणे आणि नवीन गाळाची निर्मिती झालेली नसावी. पाणथळी परिसरात सुदृढ जैवविविधता आणि प्रामुख्याने विविध प्रकारच्या पाणपक्ष्यांचे अस्तित्व असावे. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास त्या पाणथळीची पुराचे अधिकचे पाणी साठवून ठेवणे आणि त्याद्वारे पुरावर नियंत्रणात्मक संरक्षकाचे काम सुरळीतपणे होणे आवश्यक आहे. शिवाय, पाणथळीने आपले कार्य म्हणजे, सुदृढ भूजल पुनर्भरण, उन्हाळ्यात योग्य असा जलस्तर राखून ठेवणे, आल्हाददायकता आणि नैसर्गिक सौंदर्य टिकवून ठेवणे हेसुद्धा आवश्यक आहे.
असे दिले जाते हेल्थ कार्डकेंद्र शासनाच्या वने, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाने पाणथळी जागांची सुदृढता तपासून घेण्यासाठी आणि सद्यस्थिती अहवाल तयार करण्यासाठी पाणथळी जागेचे एकूण क्षेत्रफळ, त्या जागेतील जलसंरचना आणि जलस्रावक्षेत्र आणि सोबत जैवविविधता पाणथळीचे व्यवस्थापन यांच्यावर भर दिला आहे. अर्थात पाणथळी जागेवर भराव टाकून किती भूभाग तयार केला गेला आहे? पाणथळीकडे येणाऱ्या नैसर्गिक प्रवाहांपैकी किती प्रवाह अडवले गेले किंवा त्यांच्या नैसर्गिक प्रवाहाचे स्वरूप बदलले गेले? पाणथळीकडून वाहत जाणाऱ्या नैसर्गिक अशा किती प्रवाहाचे स्वरूप बदलले गेले? पाणथळीमधील पाण्याची जैविक ऑक्सिजन मागणी म्हणजे त्या पाणथळीतील जलचरांच्या अस्तित्वासाठी आवश्यक प्राणवायूचे प्रमाण टिकून आहे का? पाणथळी जागेचे किती क्षेत्रफळ आक्रमक प्रकारच्या अस्थानिक वनस्पतींनी झाकले गेले आहे? गेल्या पाच वर्षांत पाणथळीकडे आलेल्या सर्व प्रकारच्या पाणपक्ष्यांची माहिती, पाणथळी जागेचा प्रत्यक्ष स्थळ-नकाशा (अतिक्रमण तपासून घेण्यासाठी आवश्यक), पाणथळी जागेचा व्यवस्थापन आराखडा, पाणथळी जागेचा प्रसिद्ध झालेला जाहीरनामा आदींचा अभ्यास केला जातो. अशा सखोल अभ्यासानंतर प्रत्येक पाणथळी जागेची श्रेणी सुनिश्चित केली जाते.
Web Summary : Maharashtra's wetlands are in dire straits. A recent study reveals that 99% of the state's wetlands fail to meet central government health standards due to pollution, invasive species, and human encroachment, threatening biodiversity and ecological balance.
Web Summary : महाराष्ट्र के वेटलैंड्स बुरी हालत में हैं। एक हालिया अध्ययन से पता चला है कि प्रदूषण, आक्रामक प्रजातियों और मानव अतिक्रमण के कारण राज्य के 99% वेटलैंड्स केंद्र सरकार के स्वास्थ्य मानकों को पूरा करने में विफल हैं, जिससे जैव विविधता और पारिस्थितिक संतुलन को खतरा है।