सारांश लेख: झाड कापताना त्यातून रक्त सांडतं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2023 11:35 AM2023-04-02T11:35:31+5:302023-04-02T11:36:08+5:30

सरकारनेच गांभीर्याने झाडांच्या पुनर्वसनाचा विचार करावा.

Summary Article: When a tree is cut, it bleeds... | सारांश लेख: झाड कापताना त्यातून रक्त सांडतं...

सारांश लेख: झाड कापताना त्यातून रक्त सांडतं...

googlenewsNext

सयाजी शिंदे, अभिनेते - वृक्षप्रेमी

आपल्याकडे अनेक ठिकाणी महामार्गांच्या बांधणीचे आणि रुंदीकरणाचे काम सुरू आहे; पण या सर्वात मोठ्या प्रमाणावर बळी जातोय तो आपल्याला अखंड ऑक्सिजन देणाऱ्या झाडांचा. नुकतीच पुणे-बंगळुरू रस्त्यावर काही झाडे कापली गेली. त्यातही एक मोठे किमान २०० वर्षे जुने वडाचे झाड देखील पाडले. वड हा आपला राष्ट्रीय वृक्ष आहे. आता या झाडाने गेल्या २०० वर्षांत जो ऑक्सिजन दिला, त्याच्या सानिध्यात वाढलेल्या अन्य झाडांना-वेलींना जीवदान दिले, झाडावर बसणाऱ्या पक्ष्यांचा आसरा दिला, त्यांचा एक अधिवास पाडण्यात आला, त्याची किंमत आपण कशी मोजणार आहोत?

आपण  याचा कधीतरी गांभीर्याने विचार करणार आहोत की नाही? कुठे चाललो आहोत आपण? आपल्याला भविष्यात याची काय व किती किंमत मोजावी लागेल, याची काही कल्पना आहे का? अलीकडेच पुणे-बंगळुरू रस्त्यावर पाडलेल्या या वडाच्या झाडाची माहिती मिळाल्यावर मी माझ्या टीमसह तिथे पोहोचलो. तिथे कायतर म्हणे मधमाश्यांनी आमच्यावर हल्ला केला. अरे, त्यांनी हल्ला नाही केला. त्या झाडाला पाडल्यावर आम्ही तिथे पाहायला गेलो. आम्ही त्यांच्या अधिवासात प्रवेश केला. तेव्हा त्यांची ती प्रतिक्रिया होती, असे म्हणायला हवे. आज त्या रस्त्यावर जी झाडे पडली आहेत, त्या झाडांच्या फांद्यांवर झालेल्या वाऱ्यामुळे त्यातून पांढरा चिक गळतो आहे. हा पांढरा चिक म्हणजे त्या झाडांचे रक्त आहे हो ! ही भळभळती जखम आपल्याला कधी समजणार? किती बदललो आपण! गावात एखादा सरपंच वारला तर आपण मोठी शोकसभा घेतो. गाव धाय मोकलून रडतो. त्या सरपंचाची महती सांगतो. अरे पण तो सरपंच होता पाच वर्षे. त्यातही दोन पक्षांची इकडची-तिकडची कामे त्याने केली. पण ही झाडे तब्बल २०० वर्षे इथे आहेत.

ज्या झाडाने २०० वर्षे तुम्हाला निरपेक्षपणे निर्मळ श्वास दिला, सावली दिली आणि मोजण्यापलीकडचे उपकार तुमच्यावर केले, ते उन्मळल्यावर त्याची शोकसभा व्हायला नको?, एवढी आपली संवेदनशीलता हरपली का? तुमच्या सरणावर रचले जाण्यासाठी या झाडांनी आज स्वतःचा जीव गमावला आहे, असे मला राहून राहून वाटते.

- विकासकामे करताना वृक्षतोड केली जाते; पण अशावेळी झाडांची कत्तल करण्यापूर्वी जरा नियोजन करा. या झाडांना अन्यत्र हलवून तिथे त्यांचे पुनर्वसन करा. ते करणे सहज शक्य आहे. निसर्गाची स्वतःची एक जैवसाखळी आहे. 
- ती अशा पद्धतीने नष्ट करणे भविष्यात मानव जातीच्या मुळावर बेतू शकते, याचा किमान विचार होणे ही काळाची गरज आहे. 
- औरंगाबाद, परभणी येथील रस्त्यांची कामे सुरू असताना आम्ही ४०० पैकी ४० झाडे वाचवली. त्यांचे प्रत्यारोपण केले; पण माझ्यासारख्या एका माणसाच्या क्षमतेला मर्यादा आहेत.

सरकारनेच जर गांभीर्याने याचा विचार करून झाडांच्या पुनर्वसनाचा विचार करून कृती करत, मग विस्ताराची आणि विकासाची कामे केली तर निसर्गाचा तोलही सांभाळला जाईल. या गोष्टीचा गांभीर्याने विचार करण्याचे माझे सरकारला नम्र आवाहन आहे.

Web Title: Summary Article: When a tree is cut, it bleeds...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.