चिमण्याही शिकल्या परिस्थितीनुसार जगायचे कसे; जमेल तिथे बांधली घरटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 11:50 IST2022-03-20T11:50:41+5:302022-03-20T11:50:55+5:30
अस्तित्वासाठी स्वीकारला ‘ॲडाप्टेशन’चा नियम

चिमण्याही शिकल्या परिस्थितीनुसार जगायचे कसे; जमेल तिथे बांधली घरटी
- निशांत वानखेडे
नागपूर : लहानपणी आई-आजीच्या गोष्टींमध्ये ‘एक घास चिऊचा, एक घास काऊचा’ असे सांगताना आई अंगणात वावरणाऱ्या चिऊताईला सहज दाखवायची. परंतु, आज ही चिऊताई दिसेनासी झाली आहे. माणसांमध्ये न भिता, बिनधास्त वावरणारी चिऊताई अचानक माणसांना सोडून कुठे फुर्र झाली आहे, असे वाटते ना. पण नाही, ती कुठे गेली नाही, फक्त बस्तान बदलवले आहे. माणसांनी निर्माण केलेल्या परिस्थितीवर मात करत ती पण जगायला शिकली आहे. शास्त्रीय भाषेत चिमण्यांनी ‘ॲडाप्टेशन’ स्वीकारले आहे.
तज्ज्ञांच्या मते चिमण्यांनी नवा अधिवास स्वीकारला आहे. चिमणी हा जगभरात सर्वाधिक आवडणारा पक्षी आहे. तसा ताे भारतातही सर्वश्रूत आहे. ॲडाप्टेशन म्हणजे असलेल्या परिस्थितीत स्वत:मध्ये शारीरिक व बाह्य बदल करून जगणे हाेय. माणसांप्रमाणे चिमण्यांनीही ताे नियम स्वीकारल्याचे तज्ज्ञांनी अभ्यासातून मांडले आहे. आधीपासून माणसांमध्ये राहणे, हासुद्धा त्याचाच प्रकार आहे.
कृत्रिम घरटी, प्लास्टिक पाईप्स
पक्षी अभ्यासक डाॅ. आशिष टिपले यांच्या मते इतर प्राण्यांप्रमाणे चिमण्यांनीही स्वत:ला ॲडाप्ट केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनात विद्याभारती काॅलेजतर्फे १०० घरटी सेलू शहरात वितरित केली व ती व्यापणाऱ्या पक्ष्यांचा अभ्यास केला. यामध्ये चिमण्यांनी सर्वाधिक अधिवास जमविला, पिल्ले जन्माला घातली. याशिवाय घराच्या परसबागेत, झाडांवरही त्यांनी बस्तान बसविले आहे. एवढेच नाही तर घरातील अडगळीची जागा किंवा प्लास्टिकच्या पाईपमध्येही चिमण्यांचे बस्तान दिसून येते. डाॅ. आशिष टिपले यांनी स्वत:च्या घरी ‘बर्ड फिडर’ लावले आहे. त्यात धान्य टाकलेले असते. पक्ष्यांना धान्य टिपण्याची व्यवस्था असते. येथील धान्य टिपण्यासाठी चिमण्यांची दिवसभर गर्दी राहत असल्याचे त्यांनी सांगितले.
गाव, शहराच्या वेशीवर
महाराष्ट्र वन्यजीव मंडळाचे सदस्य यादव तरटे पाटील यांनी महत्त्वाचे निरीक्षण नाेंदविले आहे. चिमण्या एका वर्षात तीन ते चार वेळा अंडी देतात. मिलन काळात मातीत अंघोळ करतात. घरटी करण्यासाठी गवत व नैसर्गिक साहित्य जर असेल तर ‘अंड्यां’चे नैसर्गिकरीत्या तापमान नियमन होते. शहरात माती, गवत, काडीकचरा मिळत नसल्याने त्यांनी शहराच्या वेशीवर बस्तान मांडले आहे.
पक्षीप्रेमी डाॅ. पिंपळापुरे यांच्या मते चिमण्यांच्या संवर्धनासाठी शास्त्रीय अभ्यास आवश्यक आहे.
चिमण्यांची गणना हाेणे आवश्यक आहे. त्यामुळे त्या काेणत्या भागात, किती प्रमाणात दिसतात, त्यांची घरटी कुठेकुठे आहेत, याचा अंदाज घेता येईल.