बारावीनंतर करिअरसाठी अशाही 'वाकड्या' वाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2025 09:54 IST2025-05-11T09:54:19+5:302025-05-11T09:54:19+5:30
सुवर्णमध्य साधून करिअरची वाट निवडावी, असा सल्ला करिअर मार्गदर्शक दिनेश मोरे यांनी दिला आहे.

बारावीनंतर करिअरसाठी अशाही 'वाकड्या' वाटा
करिअरसाठी बारावीनंतर अनेक विद्यार्थी मेडिकल, इंजिनीअरिंगचा पर्याय निवडतात; परंतु त्याही पलीकडे अनेक ऑफ बीट क्षेत्रांत करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. गुणांच्या स्पर्धेबरोबरच स्वतःची क्षमता, संबंधित क्षेत्रातील रुचीपेक्षाही त्याचे करिअरमध्ये रूपांतरित होण्यासाठी आपल्यातील कैशल्ये, कसब आणि नंतर नोकरी-रोजगारातून मिळणारा पैसा, याचा सुवर्णमध्य साधून करिअरची वाट निवडावी, असा सल्ला करिअर मार्गदर्शक दिनेश मोरे यांनी दिला आहे.
मरिन इंजिनीअरिंग
नौका, जहाजे, पाणबुड्यांवरील इंजिन, बॉयलर, जनरेटर, पंप, व्हेंटिलेशन सिस्टिम आदी यांत्रिक देखभाल, डिझाइन आणि ऑपरेशन यांचा अभ्यास.
करिअरच्या संधी: जहाज, नौदल, जहाज बांधणी कंपन्या, बंदर प्राधिकरण.
शिक्षण : १२ वी विज्ञान (पीसीएम) नंतर बी.ई/बी.टेक. इन मरिन इंजिनीअरिंग. इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटीची सीईटी आवश्यक.
मास मिडिया
बारावीनंतर बॅचलर ऑफ मास मीडिया (पत्रकारिता, जाहिरात, जनसंपर्क, डिजिटल मीडिया) अभ्यासक्रम.
करिअरच्या संधी : वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, न्यूज पोर्टल, रेडिओ, जाहिरात एजन्सी, जनसंपर्क संस्था, तसेच कंटेट रायटर, सोशल मीडिया मॅनेजर.
संशोधन
ज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नवनवीन शोध घेण्याची आवड असणाऱ्यांना विज्ञान, आरोग्य, पर्यावरण, कृषी, औद्योगिक, समाजशास्त्र, शिक्षण, अभियांत्रिकी शाखांत करिअर घडवता येईल.
करिअरच्या संधी: रिसर्च लॅब, शैक्षणिक, संशोधन क्षेत्रातील सरकारी संस्था, खासगी कंपन्या.
शिक्षण : १२ वी विज्ञान (पीसीबी किंवा पीसीएम) उतीर्ण झाल्यावर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च येथे पदवी अभ्यासक्रम उपलब्ध. याच संस्थेत विज्ञान व संशोधनावर आधारित ५ वर्षांची बीएस-एमएस ही दुहेरी पदवी घेता येते.
मायक्रोबायोलॉजी
सूक्ष्मजीवांचा अभ्यास करणारे हे शास्त्र आहे. आरोग्यापासून ते अन्न, पर्यावरण आणि औद्योगिक प्रक्रियांपर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये महत्त्वाची भूमिका.
करिअरच्या संधी : रुग्णालये, डायग्नोस्टिक लॅबमध्ये संसर्गजन्य रोगांचे निदान, पॅथोलॉजी लॅब्स, लस संशोधन व निर्मिती, औषधनिर्मिती कंपन्या, अन्न उद्योग, कृषी व पर्यावरण क्षेत्र, संशोधन व शिक्षण, सरकारी संशोधन संस्था.
शिक्षण: १२ वी विज्ञान (पीसीबी) नंतर बी. एस्सी. इन मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, लाइफ सायन्सची पदवी घेता येते.
फाइन आर्ट्स
१२ वीनंतर बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स अभ्यासक्रम.
करिअरच्या संधी : चित्रकला, शिल्पकला, ग्राफिक डिझाइन, मुद्रण, अॅनिमेशन आणि व्हिज्युअल आर्ट्स, छायाचित्रण, इंटेरिअर डिझाईन क्षेत्र.
बायोटेक्नॉलॉजी
जिवाणू किंवा त्यांच्यापासून मिळणाऱ्या जैविक घटकांचा उपयोग करून नवीन उत्पादने तयार करणे किंवा प्रक्रिया सुधारणे.
करिअरच्या संधी: औषध कंपन्या, अन्नप्रक्रिया उद्योग, रिसर्च लॅब्स, कृषी संशोधन संस्था, रुग्णालये व डायग्नोस्टिक सेंटर. शिक्षणक्षेत्रात प्राध्यापक, अकॅडमिक रिसर्चर,
शिक्षण : १२ वी विज्ञान (पीसीबी किंवा पीसीएम) नंतर बी.एस्सी./बी.टेक. बायोटेक्नॉलॉजी. प्रवेशासाठी सीयुईटी, जेईई किंवा राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा द्यावी लागते.
संकलन: आमोद काटदरे