दहावीनंतर विद्यार्थ्यांसमोर व्यवसायिक शिक्षणाचे कोणते पर्याय?; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 01:48 PM2020-07-29T13:48:51+5:302020-07-29T13:49:33+5:30

दहावीनंतर विद्यार्थ्यांसमोर अनेक व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांचे पर्याय उपलब्ध आहेत. त्यांचा विचार व्हायला हवा

options of vocational education courses for students after ssc | दहावीनंतर विद्यार्थ्यांसमोर व्यवसायिक शिक्षणाचे कोणते पर्याय?; जाणून घ्या

दहावीनंतर विद्यार्थ्यांसमोर व्यवसायिक शिक्षणाचे कोणते पर्याय?; जाणून घ्या

googlenewsNext

- प्रा. सिद्धलिंग गुजर, व्यवसाय शिक्षण शिक्षक 

दहावीचे निकाल जाहीर झाले आहेत. आता महाविद्यालयीन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू होईल. विज्ञान, वाणिज्य आणि कला यापैकी कोणती शाखा याचा विचार विद्यार्थ्यांनी, त्यांच्या पालकांनी केलेला असेल. परीक्षेत मिळालेले गुण कदाचित इतर पर्यायांचा विचार होईल. त्यावेळी व्यवसायाभिमुख शिक्षणाचा विचार व्हायला हवा. यामुळे विद्यार्थ्यांना रोजगार तर मिळेलच. पण पुढे जाऊन ती इतरांनाही रोजगार देतील. 

डॉ. कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार इ. ११ वी. व इ. १२ वी.  स्तरावर व्यवसाय शिक्षणाची जोड द्यावी व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण देऊन रोजगार/स्वयंरोजगार करण्यास प्रवृत्त करावे व महाविद्यालयीन उच्च शिक्षणाकडे जाणारा विद्यार्थ्यांचा लोंढा कमी करावा, या हेतूने राज्यात प्रथम सन १९७८-७९ मध्ये ३३%  व्यवसाय व्याप्तीचे द्विलक्षी अभ्यासक्रम (बायफोकल) सुरू करण्यात आले. 

केंद्र शासनाच्या १९८६ च्या नविन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण व सेवायोजन विभागाच्या शासन निर्णयानुसार दि. २८/१०/१९८८ रोजी ७०% व्यवसाय शिक्षण व ३०% सामान्य शिक्षण अंतर्भूत असलेले किमान कौशल्यावर अधारित व्यवसाय अभ्यासक्रम (एमसीव्हीसी) सन १९८८-८९ सुरू करण्यात आले. हे अभ्यासक्रम प्रात्यक्षिकावर आधारित असल्याने विद्यार्थ्यांना संबंधित व्यवसायाचे किमान कौशल्य प्राप्त करुन स्वतःचा व्यवसाय सुरू करावा अथवा उद्योगात/औद्योगिक कारखान्यात नोकरी करता यावी, हा या योजनेचा उद्देश होता.

सध्या देशात व राज्यात कोरोना विषाणूमुळे गंभीर परस्थिती निर्माण झालेली आहे. औद्योगिक क्षेत्रातिल उद्योग कुशल कामगारांअभावी बंद पडत आहेत तर परप्रांतीय कामगार त्यांच्या राज्यात परतले आहेत. अशा वेळी राज्यातील युवकांना विविध कंपन्या, कारखाने, उद्योगात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.

कोरोनाची ही आपत्ती न ठरता संधीत रुपांतरित करणे योग्य ठरेल, यासाठी युवकांना कमी कालावधीचे व्यवसाय शिक्षण पूर्ण करणे गरजेचे आहे. दहावी पास विद्यार्थ्यांना ११ वीसाठी कनिष्ठ महाविद्यालयातून कला, विज्ञान, वाणिज्य शाखेबरोबर उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम (एचएसी व्होकेश्नल)/(एमसीव्हीसी) ही चौथी शाखा उपलब्ध आहे.

या अभ्यासक्रमात एकून सहा गटातंर्गत एकून २० अभ्यासक्रम शिकवले जातात. 
- तांत्रिक गट
१. इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी.
२. इलेक्र्टीकल टेक्नॉलॉजी
३. मेकॅनिकल टेक्नॉलॉजी
४. ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी.
५. कन्सट्रक्शन टेक्नॉलॉजी.
६. कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी.

- कृषी गट
७. ऍनिमल हसबंडरी ऍण्ड डेअरी टेक्नॉलॉजी
८. क्रॉप सायन्स.
९. हॉर्टीकल्चर.
- वाणिज्य गट 
१०. लॉजिस्टिक अॅण्ड सप्लाय चेन मॅनेजमेंट.
११. मार्केटिंग रिटेल मॅनेजमेंट
१२. अकाऊंटिंग, फायनान्सियल ऑफिस मॅनेजमेंट.
१३. बॅंकिंग फायनान्शियल सर्विसेस, इन्शुरन्स.
 मत्स गट. 
१४. फिशरी टेक्नॉलॉजी.

- अर्ध वैद्यकिय गट. 
१५. ऑप्थॉल्मिक टेक्निशियन
१६. रेडिओलॉजी टेक्निशियन
१७. मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन.
१८. चाईल्ड, ओल्ड एज ऍण्ड हेल्थ केअर सर्व्हिसेस.

- गृह शास्त्र गट. 
१९. फूड प्रॉडक्शन टेक्निशियन
२०. टुरिझम ऍण्ड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट.
या अभ्यासक्रमासाठी वर्गात मर्यादित विद्यार्थी संख्या(३०-४०) असते.

इ. १० वीत १ किंवा २ विषयात अनुत्तीर्ण (ATKT) झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून ११ वीत प्रवेश दिला जातो. 
उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या नियंत्रणाखालील BOAT (पश्चिम विभाग) मुंबई, यांच्या मार्फत शिकाऊ उमेद्वारी योजने अंतर्गत व्होकेशनल टेक्नीशियन च्या माध्यमातून ऍप्रॅंटिशिपची सुविधाही उपलब्द करुन देण्यात आली आहे.
सद्यस्थितीत शिकाऊ उमेदवारीचे कामकाज रिजनल डायरेक्टर ऍप्रॅंटिशिप ट्रेनिंग (RDAT) यांच्याकडे वर्ग करण्यात आले आहे. राज्यात सध्या शासकीय ५३, अशासकिय अनुदानित ९२०, अशासकिय विनाअनुदानित ४१०, संस्था कार्यरत आहेत. 

इयत्ता ११वीची परीक्षा कनिष्ठ महाविद्यालयात, तर  इयत्ता १२ वीची वार्षिक परीक्षा महाराष्र्ट राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतली जाते. यात ३ पेपर व्यवसाय अभ्यासक्रम विषयाचे असतात.

यांचे मूल्यमापन ६० गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा ४० गुणांची लेखी परीक्षा, सोबतच मराठी, इंग्रजी २० गुण प्रात्यक्षिक, ८० गुण लेखी व जनरल फाउंडेशन ४० गुण प्रात्यक्षिक, ६० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाते.

इयत्ता १२ वी नंतर पुढे पदवी (डिग्री) शिक्षणासाठी  BA. BCom. BSc. BVoc. BCA. BSW. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठाच्या विविध पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो.

या अभ्यासक्रमामुळे समाजातील गोरगरीब, वंचित, १० वीत कमी मार्क्स असलेले, ज्यांच्या घरची परस्थिती बेताची आहे, तातडीने स्वतःच्या पायावर उभे राहणे आवश्यक आहे,आणि रोजगारातून/स्वंयरोजगारातून स्वतःची ओळख निर्माण करण्याची जिद्द आहे. अशांनी वरीलपैकी एका व्यवसाय अभ्यासक्रमाची निवड करुन ११वीत प्रवेश घेवून दोन वर्षात पूर्ण करावा, वाढत्या बेरोजगारीला व्यवसाय शिक्षण योग्य पर्याय ठरेल. 

विविध औद्योगिक कारखाने, शेती, दुग्ध व्यवसाय, पशुपालन, कुक्कुट पालन, शेळी पालन, हॉस्पिटल्स, लॅबरॉटरिज, मार्केटिंग, मॉल्स, बँक, अकाऊंटन्सी, इन्शुरन्स, टुरिझम, लॉजिस्टिक, इलेक्र्टिशियन्स, ऑटोमोबाइल्स, कॉम्प्युटर, कन्स्ट्रक्शन, फिशरिज, फूड प्रॉडक्ट्स, ईत्यादी अस्थापणात रोजगार/स्वयंरोजगारासाठी कौशल्य प्राप्त मनुष्यबळ पुरवण्यासाठी या व्यवसाय  शिक्षणाचा फायदा होईल.

Web Title: options of vocational education courses for students after ssc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.