महापालिकेच्या १८२८ शाळा होणार ‘मुंबई पब्लिक स्कूल'

By अतुल कुलकर्णी | Published: September 26, 2021 06:27 AM2021-09-26T06:27:04+5:302021-09-26T06:27:58+5:30

एकच रंगसंगती, आधुनिक साधने व खासगी शाळांशी स्पर्धा.

mumbai municipal corporations 1828 schools to be known as Mumbai Public Schools pdc | महापालिकेच्या १८२८ शाळा होणार ‘मुंबई पब्लिक स्कूल'

संग्रहित छायाचित्र

Next
ठळक मुद्देएकच रंगसंगती, आधुनिक साधने व खासगी शाळांशी स्पर्धा

अतुल कुलकर्णी
मुंबई : प्रगत राष्ट्रातील सरकारी शाळांच्या संकल्पनेवर आधारित ‘मुंबई पब्लिक स्कूल’चा विचार प्रत्यक्षात साकारण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू झाले आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबई महापालिकेच्या ताब्यातील १८२८ शाळांचे रंग-रूप बदलण्याच्या कामाला गती आली आहे. आतापर्यंत जवळपास १५० शाळांनी कात टाकली आहे. प्रत्येक वॉर्डात एक तरी सीबीएसईची शाळा सुरू करण्याचेही नियोजन आहे.

मंत्री आदित्य ठाकरे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले की, महापालिकेच्या शाळांनी स्पर्धेत नावाजलेल्या खासगी शाळांच्याही पुढे राहिले पाहिजे. त्यासाठी जे जे करावे लागेल, ते आम्ही मिशन मोडवर करणार आहोत. दर्जेदार शाळा म्हणजे ‘मुंबई पब्लिक स्कूल’ अशी ओळख राज्यभर झालेली पाहायची आहे, असेही ते म्हणाले.

महापालिकेचे सहआयुक्त अजित कुंभार यांनी या संकल्पनेची माहिती दिली. ते म्हणाले की, इंग्रजी माध्यमाच्या शाळांसोबतच मराठी माध्यमासह प्रादेशिक भाषेतील अन्य सर्व शाळांमध्ये एकसूत्रता यावी व महापालिकेच्या शाळांचा दर्जा एकसारखा राहावा, यासाठी सगळ्या शाळांचे नामकरण ‘मुंबई पब्लिक स्कूल’ असे करण्यात येत आहे. त्या नावापुढे ती शाळा ज्या भागातील आहे, त्या भागाचे नाव जोडले जात आहे. या नावाचा समावेश असलेले विशेष सांकेतिक बोधचिन्ह तयार करून ते वापरण्यासही सुरुवात झाली आहे. सर्व शालेय इमारतींचे आकर्षक प्रवेशद्वार व त्यावर बोधचिन्हासह ‘मुंबई पब्लिक स्कूल’ या नावाचा आकर्षक नामफलक करण्याचे कामही सुरू झाले आहे.

प्रादेशिक भाषेतील शिक्षकांच्या इंग्रजी भाषेच्या ज्ञानामध्ये वाढ करण्यासाठी ब्रिटिश कौन्सिल या आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत प्रशिक्षण देण्यात आले आहे. बहुतांश शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करण्यात आले आहे. प्रथम भाषेसाठी इंग्रजी व प्रादेशिक भाषा असे दोन विषय ठेवून बहुतांश शाळा द्विभाषिक करण्यात आल्या आहेत.

महापालिकेच्या शाळांचा पसारा

  • मराठी, हिंदी, गुजराती, उर्दू, इंग्रजी, तेलगू, तामिळ व कन्नड अशा आठ माध्यमाच्या ९६३ प्राथमिक शाळांमध्ये २.५ लाख विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण.
  • २२४ माध्यमिक शाळांमधून जवळपास ४१ हजार विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण.विशेष मुलांसाठी १७ शाळा. पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी ८१४ शाळा.
  • ३९९ खासगी अनुदानित शाळांमधून पहिली ते चौथीच्या जवळपास १ लाख मुलांना शिक्षण.
  • ११ सीबीएसईच्या व १ आयसीएसई अशा १२ शाळांमधून अंदाजे ४५०० विद्यार्थी.
     

असे असतील बदल

  • सर्व शाळांची रंगसंगती एकच असेल. बालवाडी, पहिली, दुसरीच्या वर्गांमध्ये आकर्षक शैक्षणिक चित्रांची रंगरंगोटी.
  • डिजिटल वर्ग, आधुनिक संगणक प्रयोगशाळा, लघू विज्ञान केंद्र, व्हर्च्युअल क्लासरुम, पब्लिक ॲड्रेस सिस्टम, मुलींसाठी सॅनिटरी नॅपकीन मशीन, पिण्याचे शुद्ध पाणी, आरटीई नियमानुसार सुविधा.
  • खेळाच्या मैदानात सुधारणा, स्वतंत्र कला कक्ष, मुंबई शहर, पूर्व व पश्चिम उपनगरातील प्रत्येक विभागात एक विज्ञान कुतूहल भवन, आधुनिक सभागृह.

Web Title: mumbai municipal corporations 1828 schools to be known as Mumbai Public Schools pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app