MPSC Exam Update: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य शासकीय सेवेतील विविध पदांच्या भरतीसाठीच्या कमाल वयोमार्यदेत शिथिलता देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला असून याबाबतचा आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र गट-ब सेवा संयुक्त परीक्षा तसेच गट-क सेवा संयुक्त परीक्षेसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना नव्याने अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.
नव्या निर्णयानुसार, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ०१ जानेवारी, २०२४ ते या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत पदभरती करिता ज्या जाहिराती नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आणि त्या जाहिरातींच्या निवड प्रक्रियेचा कोणताही टप्पा पार पडलेला नाही, अशा जाहिरातीकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांना संदर्भ क्र. (१) मधील सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक २५.०४.२०१६ च्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेत एक वर्ष इतकी शिथिलता देण्यात येत आहे. तसंच ज्या पदांसाठी संबंधित पदांच्या सेवाप्रवेश नियमात विवक्षित कारणास्तव संदर्भाधीन दिनांक २५.०४.२०१६ मध्ये विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेपेक्षा भिन्न कमाल वयोमर्यादा विहित केली आहे, अशा पदांसाठी विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेत देखील सदर एक वर्ष इतकी शिथिलता देय राहील. यामुळे जे उमेदवार अशा जाहिरातींकरिता अर्ज करण्यास पात्र होत आहेत, त्यांना अर्ज सादर करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी विहित कार्यवाही करावी, असे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत.
दरम्यान, सदर शिथिलता ही केवळ एक वेळची विशेष बाब म्हणून लागू करण्यात येत असून या शासन निर्णयानंतर प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरीता संबंधित पदांच्या सेवाप्रवेश नियमात अथवा संदर्भाधीन क्र. (१) मधील दि.२५.०४.२०१६ च्या शासन निर्णयात विहित केलेली कमाल वयोमर्यादाच लागू राहील. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४१२२०१९२७००४९०७ असा आहे, असं शासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.