२ दिवसांत सरल पोर्टलवर माहिती भरा, शिक्षण विभागाच्या आदेशावर शिक्षकांची नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2022 13:33 IST2022-05-18T13:33:03+5:302022-05-18T13:33:37+5:30
शिक्षण निरीक्षक उत्तर विभागाच्या शिक्षण निरीक्षकांनी उत्तर विभागातील शाळांना आदेश देऊन सरल पोर्टलमध्ये विद्यार्थ्यांची सर्व माहिती दि २० मे पर्यंत भरण्याचे आदेश दिले आहेत.

२ दिवसांत सरल पोर्टलवर माहिती भरा, शिक्षण विभागाच्या आदेशावर शिक्षकांची नाराजी
मुंबई - शाळांना सुट्टी लागल्याने शिक्षक गावी गेले असतांना सरल पोर्टलवर विद्यार्थ्यांची माहिती दोन दिवसात भरण्याचे आदेश शिक्षण विभागाने शाळांना दिले आहेत. शिक्षक गावी असतांना माहिती कशी भरणार असा सवाल करीत भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी विरोध केला असून मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. याबाबत अनिल बोरनारे यांनी शिक्षण सचिव व शिक्षण आयुक्तांना पत्र लिहून मागणी केली आहे
शिक्षण निरीक्षक उत्तर विभागाच्या शिक्षण निरीक्षकांनी उत्तर विभागातील शाळांना आदेश देऊन सरल पोर्टलमध्ये विद्यार्थ्यांची सर्व माहिती दि २० मे पर्यंत भरण्याचे आदेश दिले आहेत. जर या तारखेपर्यंत माहिती भरली नाही तर शैक्षणिक वर्ष २०२१-२२ ची संचमान्यता जनरेट होणार नसल्याचे आदेशात नमूद केले आहे.शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्याने अनेक शिक्षक आपल्या मूळ गावी गेले आहेत. कोरोनाच्या दोन वर्षात शिक्षक आपल्या गावी जाऊ शकले नव्हते. विद्यार्थ्यांची सर्व माहिती शाळेत असल्याने सरल पोर्टल वर माहिती कशी भरणार असा सवालही विचारत शाळा सुरू झाल्यावर शिक्षक माहिती भरतील त्यामुळे २० जून पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी अनिल बोरनारे यांनी केली आहे.