‘सीसीएमपी’ आरोग्यासाठी गरजेचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 07:31 IST2025-07-13T07:31:18+5:302025-07-13T07:31:30+5:30

सीसीएमपी अभ्यासक्रमास शासन मान्यता मिळाली आहे. यामुळे हा अभ्यासक्रम पूर्ण करणारे डॉक्टर्स आधुनिक औषधोपचार करू शकतात.

‘CCMP’ is essential for health medical sector education | ‘सीसीएमपी’ आरोग्यासाठी गरजेचा

‘सीसीएमपी’ आरोग्यासाठी गरजेचा

- डॉ. बाहुबली शाह, 
प्रशासक, महाराष्ट्र 
होमिओपॅथिक परिषद
महाराष्ट्र विधिमंडळाने एकमताने संमत केलेल्या कायद्यानुसार सुरू झालेला सीसीएमपी (सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी) हा अभ्यासक्रम आजच्या आरोग्यविषयक गरजांची पूर्तता करणारा महत्त्वाचा टप्पा ठरत आहे. साडेपाच वर्षांच्या होमिओपॅथी अभ्यासक्रमासह एक वर्षाच्या क्लिनिकल रोटेशनचा समावेश असलेला हा कोर्स आधुनिक वैद्यकीय शिक्षणाचे मूलभूत तत्त्व आत्मसात करून तयार करण्यात आला आहे.

सीसीएमपी अभ्यासक्रमास शासन मान्यता मिळाली आहे. यामुळे हा अभ्यासक्रम पूर्ण करणारे डॉक्टर्स आधुनिक औषधोपचार करू शकतात. उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयातून यावर स्थगिती मिळविण्याचे ‘आयएमए’चे अनेक प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत,  हे वास्तवही लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या औषधशास्त्र विभागाने केलेल्या अभ्यासानुसार सीसीएमपी अभ्यासक्रमानंतर ग्रामीण व दुर्गम भागातील आरोग्यसेवेच्या गुणवत्तेत सुमारे १०० टक्के वाढ झाली आहे. नॅशनल जर्नल ऑफ सायंटिफिक रिसर्चमध्ये प्रसिद्ध झालेला हा अहवाल अभ्यासक्रमाची परिणामकारकता दर्शवतो. 

एमएमसी कायदा १९६५च्या तरतुदीनुसार सीसीएमपी अर्हता ही अनुसूचित २८ व्या क्रमांकावर अधिसूचित आहे. त्यामुळे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने या अर्हताधारकांची स्वतंत्र नोंद करणे बंधनकारक आहे. परंतु एमएमसीमधील तत्कालीन सत्ताधारी आयएमएच्या दबावामुळे गेली आठ वर्षे ही नोंदणी प्रक्रिया टाळली जात होती.

अखेर, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत एमएमसी प्रबंधकांनी विधि व न्याय विभागाच्या अभिप्रायानुसार कार्यवाही करण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाच्या पत्राच्या आधारावर एमएमसीने नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. दुसरीकडे या पूर्णपणे कायदेशीर प्रक्रियेविरोधात आयएमएकडून वारंवार आक्षेप घेतले जात आहेत. शासनावर दबाव आणण्यासाठी वैद्यकीय सेवा बंद करण्याची धमकी देणे, जनतेला वेठीस धरणे हे प्रकार अत्यंत निषेधार्ह आहेत. आयुष डॉक्टर्सनी अशा अराजकतेच्या विरोधात उभे राहून, जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी शासनाला पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. सीसीएमपी हा अभ्यासक्रम म्हणजे ग्रामीण व दुर्गम भागातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठीचा एक सकारात्मक आणि आवश्यक पुढाकार असून, त्याला विरोध नव्हे तर पाठबळ द्यावे.

Web Title: ‘CCMP’ is essential for health medical sector education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :doctorडॉक्टर