राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 07:38 IST2025-11-07T07:37:49+5:302025-11-07T07:38:48+5:30
विद्यार्थ्याकडून बळजबरीने लिहून घेतला प्रवेश घेत नसल्याचा ई-मेल, काॅलेज म्हणते - पैसे मागितले नाहीत

राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: एमबीबीएस प्रवेशासाठी महाविद्यालये विद्यार्थ्यांकडे पैशांची बेकायदा मागणी करत असल्याचे प्रकार घडत असताना अशीच आणखी एक घटना उघडकीस आली आहे. सिंधुदुर्गातील एसएसपीएम मेडिकल कॉलेज अँड लाइफटाइम हॉस्पिटलने गडचिरोलीच्या विद्यार्थ्याकडे प्रवेशासाठी नऊ लाख २० हजार रुपयांची मागणी केल्याने खळबळ उडाली आहे. इतकेच नव्हे तर कॉलेज प्रशासनाने त्या विद्यार्थ्याकडून प्रवेश रद्द करत असल्याचा ई-मेल लिहून घेऊन तो जबरदस्तीने सीईटी सेलला पाठविण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे.
या गैरप्रकाराबाबत विद्यार्थ्याने राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी सेल) आणि वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाकडे (डीएमईआर) तक्रार केली आहे. त्याची दखल घेऊन प्रवेश नियामक प्राधिकरणाचे (एआरए) अवर सचिव नीलेश फाळके यांनी कॉलेजचे अधिष्ठाता व तक्रारदार विद्यार्थ्याला चौकशीसाठी १० नोव्हेंबरला बोलावले आहे, कॉलेजच्या चौकशीसाठी ‘डीएमईआर’ने समिती नेमली आहे.
वैद्यकीय प्रवेशाच्या एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीची प्रवेश प्रक्रिया मंगळवारी झाली. यासाठी अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गातील एका विद्यार्थ्याला तिसऱ्या फेरीत एसएसपीएम कॉलेज मिळाले होते.
‘राज्य सरकारच्या सवलतीमुळे आपल्याला प्रवेशासाठी केवळ ५० हजार रुपये शुल्क भरावे लागणार होते. मात्र कॉलेजने माझ्याकडे नियमित शुल्काव्यतिरिक्त ९ लाख २० हजार रुपयांची मागणी केली,’ असा आरोप विद्यार्थ्याने तक्रारीत केला आहे.
‘मी कॉलेजमध्ये प्रवेशासाठी गेल्या सोमवारी गेलो होतो. त्यावेळी कॉलेज प्रशासनाने माझ्याकडे ९ लाख २० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. यांत वसतिगृह शुल्कासह अन्य शुल्कांचा समावेश असल्याचे मला सांगितले. वसतिगृहात प्रवेश घेणे ऐच्छिक असताना कॉलेजने वसतिगृहात प्रवेश घ्यावाच लागेल, असेही बंधन घातले आणि पैसे भरल्यानंतरच प्रवेश दिला जाईल, असे सांगितले,’ असा आरोप विद्यार्थ्याने केला. ‘वडील शेती करतात. शिक्षणाचा एवढा खर्च झेपणार नसल्याने मी सामाजिक संस्थेकडून मदत घेऊन वसतिगृह शुल्क भरणार होतो. त्या संस्थेला देण्यासाठी मी वसतिगृह शुल्काच्या विवरणपत्राची मागणी कॉलेजकडे केली होती. मात्र कॉलेजने ते देण्यास नकार दिला,’ असे या विद्यार्थ्याने सांगितले.
समुपदेशनावेळी विद्यार्थ्याला मोबाइलसह सर्व साहित्य बाहेर ठेवण्यास सांगितले जाते. सुरक्षारक्षकांनी संपूर्ण तपासणी केल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांना आत सोडले जाते, असाही आरोप पालकांनी केला आहे.
समिती स्थापन
विद्यार्थ्याच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन वैद्यकीय शिक्षण विभागाने कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ. अनिता परितेकर आणि बधिरीकरणशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रदीप राऊत यांची समिती नेमली आहे.
विद्यार्थी आणि कॉलेज अधिष्ठाता या
दोघांना चौकशीसाठी बोलावले आहे. विद्यार्थ्याच्या तक्रारीची चौकशी केल्यानंतर कारवाई केली जाईल.
- दिलीप सरदेसाई, प्रवेश नियामक प्राधिकरणाचे (एआरए) सदस्य सचिव तथा सीईटी सेलचे आयुक्त
जास्तीचे पैसे मागितले नाहीत : कॉलेज
शुल्क नियामक प्राधिकरणाने निर्धारित केलेल्या शुल्काव्यतिरिक्त कोणतेही शुल्क मागितले जात नाही. हॉस्टेल आणि मेस सुविधा विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक आहेत. त्याबाबत विद्यार्थ्यावर कोणतीही सक्ती केली नाही.
वंदना गावपांडे, अधिष्ठाता, एसएसपीएम मेडिकल कॉलेज
दोन तास बसवून ठेवले
‘प्रवेशाबाबत सीईटी सेलकडे तोंडी तक्रार केल्यानंतर कॉलेज प्रशासनाने पुन्हा बोलावले. यावेळी त्यांनी दोन तास संस्थेत जबरदस्तीने बसवून ठेवले. वैयक्तिक कारणामुळे एसएसपीएम कॉलेजमध्ये प्रवेश घेत नाही, असा ईमेल बळजबरीने लिहून घेऊन सीईटी सेलला पाठविण्यास भाग पाडले,’ असाही गंभीर आरोप विद्यार्थ्याने केला आहे.