शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

तुम्ही बोलत राहा.. ते ऐकतील; पण पैसे मोजावे लागतील!

By नंदकिशोर पाटील | Updated: February 1, 2023 05:46 IST

संवाद हरवलेली कुटुंबं, ही आता जागतिक समस्या बनली आहे. प्रत्येकाला काही तरी सांगायचे आहे; पण ऐकणारेच कुणी नाही, अशा विलक्षण कोंडीत जग अडकले आहे.

- नंदकिशोर पाटील(संपादक,  लोकमत, औरंगाबाद)

वयाची चाळिशी गाठलेला एक युवक हॉटेलात जातो. टेबलावर ठेवलेले मेन्यू कार्ड वाचून तो वेटरला आवाज देतो. वेटर येतो आणि आणखीएक मेन्यू कार्ड समोर ठेवतो. खरे तर त्याच मेन्यू कार्डची त्याला उत्सुकता, प्रतीक्षा असते. दोन्ही कार्डांवर बारकाईने नजर टाकून तो वेटरला ऑर्डर देतो. थोड्या वेळाने तो वेटर खाण्या-पिण्याचे पदार्थ आणि सोबत एक सुंदर तरुणी घेऊन येतो. समोरच्या खुर्चीवर ती तरुणी विराजमान होते. ‘हॅव ए गुड टाइम.. एन्जॉय !’ अशा शुभेच्छा देऊन वेटर निघून जातो.  टेबलावर ते दोघेच. अनोळखी. अपरिचित. काही क्षण नि:शब्द जातात. मग दोघेही एकमेकांचा परिचय करून देतात. या जुजबी ओळखीपाळखीनंतर ‘ती’च्यासाठी कॉफीची ऑर्डर दिली जाते. दोन अपरिचित व्यक्तींमध्ये सुरू झालेला संवाद हळुवारपणे रंगत जातो. उभयतांच्या गप्पांचा फड चांगलाच रंगलेला असतानाच वेटर बिल घेऊन येतो. दोघांचाही हिरमोड होते. ‘पुन्हा भेटू’, म्हणत त्या तरुणीचा निरोप घेऊन तो हॉटेलबाहेर पडतो! 

‘लिसनर’ नावाच्या शॉर्टफिल्मचे हे संक्षिप्त कथानक. जगभर ही फिल्म दाखविली गेली आणि तितकीच नावाजलीही गेली. ही शाॅर्टफिल्म बनविण्यामागे संदर्भ होता अमेरिकेतील वॉल्डेन युनिव्हर्सिटीच्या ‘ॲन्युयल रिविव्ह ऑफ सायकॉलॉजी’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेला एक लेख. ‘संवाद हरवलेली कुटुंबं’ हा त्या लेखाचा विषय. अर्थात, तो अमेरिकेतील एकल कुटुंब व्यवस्थेवर आणि त्यातही ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, फेसबुक, आयबीएमसारख्या आयटी कंपन्यात काम करणाऱ्या कपल्सवर आधारित. ज्यांच्या मेंदूतून व्हॉट्सॲप, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्रामसारखी सामाजिक संवादी माध्यमं (सोशल मीडिया) जन्माला आली तीच माणसं वैयक्तिक आयुष्यात किती नि:शब्द, निरस आणि एकलकोंडी असतात, हा त्या लेखाचा निष्कर्ष. या ‘लिसनर’ शॉर्टफिल्मची प्रेरणा घेऊन कॅलिफोर्नियात, सिलिकॉन व्हॅलीसह युरोपात अशी हॉटेल्स सुरू झाली आहेत, जिथे तुम्हाला, तुमचं मन मोकळं करता येतं! मात्र, त्यासाठी पैसे मोजावे लागतात! ते तुमच्यात गुंतत नाहीत; पण तुम्हाला गुंतवून ठेवतात. भावनिकदृष्ट्या कसलीही गुंतवणूक नसलेल्या एखाद्या अनोळखी व्यक्तीशी पैसे मोजून तासभर संवाद साधायला ‘गिऱ्हायकं’ येतील की नाही याबाबत हाॅटेलमालक थोडे साशंक होते. पण त्यांची शंका क्षणभंगुर ठरली. बघता-बघता अशा प्रकारची ‘टॉक-टाइम’ हॉटेल्स हाऊसफुल्ल झाली!

संवाद हरवलेली कुटुंबं, ही आता जागतिक समस्या बनली आहे. जागतिकीकरणानंतर आर्थिक सुबत्ता आली, राहणीमान उंचावले, पण कामाचा ताण, नोकरीची धास्ती आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कराव्या लागणाऱ्या तडजोडींमुळे मनस्वास्थ्य हरवून बसलेली माणसं आपल्या घरात आहेत. ही केवळ नोकरदार वर्गाची समस्या नाही. 

विद्यार्थी, बेरोजगार युवक, महिला, वृद्ध असे सगळे संवाद हरवून बसलेल्या एक प्रकारच्या मानसिक आजाराचे शिकार आहेत. मध्य युरोपातील चेक प्रजासत्ताकची राजधानी प्राग येथे नुकत्याच झालेल्या जागतिक मनोविकार तज्ज्ञांच्या परिषदेत या विषयावर अतिशय गांभीर्याने चर्चा झाली. विशेषत: कोरोना महामारीनंतर आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत झालेल्या लक्षणीय वाढीमागे संवादाचा अभाव हे कारण असल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावरची गर्दी आणि त्यावर खर्ची पडणाऱ्या वेळेत झालेली वाढ हे त्याचे एक प्रमुख लक्षण. प्रत्येकाला काही तरी सांगायचे आहे, पण ऐकणारेच कुणी नाही, अशा एका विलक्षण कोंडीत जग अडकले आहे. हा कोंडमारा जीवघेणा ठरतो आहे. परवा नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेली वाचून आई-वडिलांना धक्काच बसला. त्याने लिहिले, ‘मी गेल्या अनेक दिवसांपासून तुम्हाला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतोय; पण तुम्ही ऐकूनच घेत नाही. माझ्याच घरात जर कुणी ऐकणारं, समजून घेणारं नसेल तर मी कोणाजवळ मन मोकळं करू?’ या मुलाने लिहिलेल्या चिठ्ठीतील मजकुराने आपले डोळे आणि कान उघडले तरी पुरे! अन्यथा, पैसे देऊन संवाद साधण्याची सोय उपलब्ध करून देणारी हॉटेल्स आपल्याकडेही येऊ घातली आहेच!nandu.patil@lokmat.com

टॅग्स :FamilyपरिवारSocialसामाजिक