कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 07:33 IST2025-10-15T07:33:30+5:302025-10-15T07:33:47+5:30
‘नाहीरे’ लोकांचे बिनचेहऱ्यांचे विश्व मराठी कवितेत ठळकपणे आणणारे कवी नारायण सुर्वे यांचे जन्मशताब्दी वर्ष आजपासून सुरू होते आहे. त्यानिमित्ताने...

कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
- श्रीकांत देशमुख,
साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक
‘ना घर होते ना गणगोत, चालेन तेवढी पायाखालची जमीन होती…’ या ओळींनी मराठी भाषेत कवितेचे ‘नवे विद्यापीठ’ १९६६ साली खुले झाले. या विद्यापीठातली माणसे सभोवताली सगळीकडेच होती. खुरडत जगणारी, अंधारात फुटपाथवर झोपणारी, गिरण्यांमध्ये काम करणारी, पोकळ आयुष्याला सामोरे जाणारी. या कवितेतले ‘नाहीरे’ लोकांचे बिनचेहऱ्यांचे विश्व, त्याचा हरवून गेलेला आकार आणि विनाशाकडे होणारी वाटचाल सुर्व्यांनी कवितेतून पहिल्यांदा आणली आणि नव्या जाणिवेचे एक महाद्वार खुले केले. ऐसा गा मी ब्रह्म, माझे विद्यापीठ, जाहीरनामा, नव्या माणसाचे आगमन अशा संग्रहांतून अधोविश्वाचे दुःख संवेदनेच्या केंद्रस्थानी आणण्याचे युगप्रवर्तक काम सुर्व्यांनी केले.
केशवसुत, मर्ढेकर, नारायण सुर्वे या क्रमाने मराठी कवितेचा विचार केला जातो. कविता आणि समाज यांचे एक नाते असते. जेव्हा कविता समाजाची, दुःखितांची भाषा बोलू लागते तेव्हाच ती विश्वात्मक होते. जनसामान्यांच्या वेदनेला कवेत घेणाऱ्या जगभरातल्या विचारधारा अशा कलाकृतीतून नकळतपणे उजागर होतात. आपल्या वर्तमानाला आपले कसे करायचे, हा प्रश्न खऱ्या कवीला कधी पडत नसतो, कारण तो वर्तमानच जगत असतो, वर्तमानाचा हुंकार हा त्याचा हुंकार असतो. नारायण सुर्वे यांची कविता वेदनेच्या राजपथावरून चालणारी कविता आहे.
अगदी सुरुवातीपासून तो अखेरपर्यंत कुठल्याही वैचारिक तडजोडी न करता लिहित राहणे, आपल्या कवितेतल्या भावविश्वाला थेट समाजाशी जोडून त्यासाठी संघर्ष करणे हे काम करणारे कवी मराठी भाषेत किती आहेत, हा प्रश्न जेव्हा निर्माण होतो तेव्हा सुर्वे यांच्या कवितेतले हातावर पोट भरणाऱ्या मजूर-कामगारांचे, वेश्यांचे विश्व समोर येते. म्हणूनच ही कविता नुसती कविता नसून वर्तमानाचा जाहीरनामा ठरते. तिने कधी कशाचाही अहंकार बाळगला नाही, की दुःखाचा गाजावाजा केला नाही. सुर्वे म्हणतात, ‘खरे म्हणजे मी माणसे आधी वाचतो. परिस्थिती वाचतो…’ सुर्वे बोलतात ती कवीकुळाच्या स्वत्वाची भाषा आहे. त्यामुळे मराठी परंपरेत जाणिवेच्या पातळीवर शोधायचे झाले तर या कवितेचे नाते तुकोबा, जोतिबा, बाबासाहेब या परंपरेशी आहे. ‘भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झालेले’ लोक या कवितेने नायक म्हणून उभे केले.
अनाथ म्हणून जन्माला आलेला हा मुलगा म्हणतो, ‘मी जन्मलो तेव्हा काही नाम धारण करून जन्मलो नाही. मात्र मी नसेन, तेव्हा या पृथ्वीच्या पाठीवर एक नाव ठेवून जाईन ते म्हणजे नारायण गंगाराम सुर्वे.’ आपल्या संवेदनेची नाळ या पृथ्वीगोलावरल्या दुःखीतांच्या वेदनेशी आजन्म जोडलेला हा थोर कवी.
कवीच्या अस्तित्वाचा शोध कसा घ्यायचा हा प्रश्न जेव्हा निर्माण होतो तेव्हा त्याच्या संवेदनविश्वाशी आपल्याला नाते जोडायचे असते. ‘हे माझ्या देशा, सूर्यकुलाचे आपणही सभासद, म्हणून सूर्यकुलाला शोभेसेच वर्तन व्हावे’ ही या कवितेतील दायित्वाची भाषा आहे. मार्क्सबद्दल बोलताना, ‘आता इतिहासाचे नायक आपणच आहोत, या पुढल्या सर्व चरित्रांचेही’ असे उद्गार ही कविता काढते, तेव्हाच तिचे सूर्यकुळाशी असणारे दिव्य आणि विद्रोही नाते प्रकट होते. ‘आम्ही नसतो तर हे सूर्य, चंद्र, तारे बिचारे फिक्के फिक्के असते. बापहो ! तुमच्या व्यथांना शब्दात अमर कोणी केले असते’, असेही ती म्हणते.
मराठी कवितेला अगदी अनोळखी असणारे भावविश्व, जीवनाशी प्रामाणिकता आणि सामाजिक सद्भाव सुर्व्यांच्या कवितेने मराठी भाषेला दिला, काव्य संवेदनेची वाट प्रशस्त केली. ‘स्वतःला रचित गेलो’ इतक्या साधेपणाने ती कित्येक दशके मराठी माणसाशी बोलत गेली. ‘नाही सापडला खरा माणूस’ ही या कवितेची खंत होती. ‘ह्या मुंबईच्या घडणीतली अमृताक्षर तुम्हीच आहात’, ही जाणीव दीनदलितांना करून देणारी ही कविता.
कुठलाही बेगडीपणा, प्रतिमांचा सोस नसणारी आणि हितगुज करतो तशी बोलणारी ही कविता मराठी भाषेला एक आगळे-वेगळे वैभव प्राप्त करून देणारी होती. ‘नेहरू गेले तेव्हाची गोष्ट’ ही कविता सांगत होती, ‘पाठी शेकवीत बसलेली घरे कलकलली, शहर कसे करडे होत गेले, नंतर अंजिरी. पुढे काळोखाने माणिक गिळले.’
सुर्व्यांचा जन्म १९२६ साली झाला आणि २०१० साली सुर्वे गेले. त्यांच्या कवितेचा प्रकाश आजही मराठी कवितेला वेदना विद्रोहाची वाट दाखवतो आहे. मास्तर तुमचंच नाव लिवा, मर्ढेकर, मनीऑर्डर, मुंबईची लावणी, गिरणीची लावणी अशा कित्येक कवितांतून सूर्यकुळाशी नाते सांगणारी ही कविता मराठी भाषेतील चिरंजीव कविता आहे. कवी गेला तरी तो काय ठेवून जातो याचा प्रत्यय देणारी फार थोडी कविता असते. सुर्वे हे मराठी भाषेतले पहिले आधुनिक सूर्यकवी आहेत, ते त्या अर्थाने!
(हरीश गुप्ता यांचा साप्ताहिक स्तंभ गुरुवारच्या अंकात प्रसिद्ध होईल.)