Work from home; ‘Punch to Punch, Between Lunch’ is the idea of working life | वर्क फ्रॉम होम; ‘पंच टू पंच, बिटविन लंच’ ही नोकरदार आयुष्याची कल्पना

वर्क फ्रॉम होम; ‘पंच टू पंच, बिटविन लंच’ ही नोकरदार आयुष्याची कल्पना

कोरोनाच्या महामारीने जगाला केवळ एका अभूतपूर्व अशा आरोग्य-संकटातच लोटलं असं नव्हे, तर माणसांच्या जगण्याच्या सवयीची रीतच एका फटक्यात बदलून टाकली. सकाळी उठून आवरून कामाचं ठिकाण गाठणं, हे ‘तेच ते आणि तेच ते’ रुटीन एकदम ठप्पच होऊन गेलं. ज्यांना ज्यांना कामाच्या ठिकाणी न जाता उपलब्ध टेक्नॉलॉजीच्या वापराने घरी बसूनच आपलं काम निभावणं शक्य आहे, त्यांच्या रोजच्या दिनक्रमावर एक ‘न्यू नॉर्मल’ गोष्ट अगदी अचानक येऊन आदळली : वर्क फ्रॉम होम. लोकप्रिय संक्षिप्त रूप हऋऌ. एखादं मोठं सिक्रेट मिशन असावं तसं जो तो एकमेकांना सांगू लागला, ‘सध्या मी पण हऋऌ. !

नोकरदार माणसांच्या आयुष्यात झूम मीटिंग, ड्युओ मीटिंग, गुगल मीटिंग असे शब्द शिरले. ज्यांना हे सवयीचं होतं, ते - मुख्यत: आयटी वाले- सरावलेले होते; पण डायनिंग टेबलावर आपला लॅपटॉप मांडून मागे खेळणाऱ्या मुलांना गप्प करत बॉसशी झूमवर बोलताना बाकीच्यांची डोकी एकदमच कलकलू लागली.

सकाळी उठून आॅफिसचा ‘पंच’ गाठणं हे एकमेव कर्तव्य असलेल्या नोकरदारांच्या ‘पंच टू पंच, बिटविन लंच’ आयुष्यात हा मोठाच बदल होता. त्यात सकाळी पोळीभाजीचे डबे करून आॅफिस गाठणं सवयीचं असलेल्या स्त्री नोकरदारांच्या वाट्याला तर घरात कुकरच्या शिट्ट्या मोजत आॅनलाईन प्रेझेंटेशन करण्याची तारेवरची कसरत आली. हे अख्ख्या जगभर झालं आणि अनेक बड्या कंपन्यांना पहिल्यांदाच हा साक्षात्कार झाला, की आपल्या स्टाफला आॅफिसमध्ये येण्याची खरं म्हणजे काही गरजच नाही.

पोस्ट-कोरोना जगात खर्च कमी करणं अटळ झालेल्या कंपन्या आता शक्यतो स्टाफने आॅफिसात येऊच नये असे प्रयत्न करतील आणि निदान जी कामं रिमोटली करता येतात त्याबाबतीत तरी ‘वर्क फ्रॉम होम’ हे न्यू नॉर्मलच बनून जाईल अशी चर्चा आहे.
पण आता घरून काम करण्याचे फायदे आणि तोटेही जाणवू लागले आहेत. त्यामुळे या बदलाचा विचार करणाऱ्यांमध्ये तीन अगदी कट्टर गट पडले आहेत :
१. वर्क फ्रॉम होमचे कट्टर समर्थक
२. वर्क फ्रॉम होमचे कट्टर विरोधक.
३. या दोन्हीचा मध्य गाठा असं सुचविणारे मध्यममार्गी.

या तिन्ही गटातटांत काय काय वाद-युक्तिवाद आहेत, ते आपण एकूण तीन भागांच्या मालिकेत पाहणार आहोत. हे खरं की, ‘काम’ आणि ‘नोकरी’त द्यायचा वेळ या पूर्वापार सवयीच्या संकल्पना नव्याने लिहिल्या जाण्याचा हा काळ आहे. त्याचा वेध घेण्याच्या प्रारंभी, आपण आजच्या चालू वर्तमानकाळातून जरा भटकून येऊ, म्हणजे आसपास काय चाललं आहे, हे कळेल!

सर्वच सरसकट वर्क फ्रॉम होम शक्य नाही. तीन दिवस घरून - तीन दिवस कार्यालयातून अशीही रचना होऊ शकेल. एकमार्गी कामात हे जमेल; पण ज्या क्षेत्रात सर्जनशीलता, कल्पकता, नावीन्य हवे, तिथे सांघिक चर्चा, भेटीगाठी आवश्यकच असतील. कुठल्याही कामात मानवी संपर्क कमी झाला तर त्याचा उत्पादनक्षमतेवर परिणाम होतो. कर्मचाºयांना मानसिक थकवा, ताण येऊ नये म्हणूनही कंपन्यांच्या मनुष्यबळ विकासाला प्रयत्न करावे लागतील.
- विनोद बिडवाईक, व्हाइस प्रेसिडेंट, मनुष्यबळ विकास, अल्फा लावल, भारत-आफ्रिका

Web Title:  Work from home; ‘Punch to Punch, Between Lunch’ is the idea of working life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.