शहरं
Join us  
Trending Stories
1
गौतम गंभीरचे प्रयोग टीम इंडियाला झेपेना; दीड वर्षात नंबर ३ वर खेळवले तब्बल सात फलंदाज
2
आई आमदार बनली, पण मंत्रिपद मुलाला मिळालं; नितीश कुमारांच्या नव्या सरकारमध्ये संधी, सगळेच हैराण
3
Mumbai: मुंबईकरांसाठी खुशखबर...! नव्या इमारतीतील घरांसाठी नोंदणी शुल्क माफ
4
BJP vs Shinde Sena: मुद्रांक शुल्क सवलतीच्या निर्णयावरून शिंदेसेना-भाजपमध्ये क्रेडिट वॉर सुरू!, कोण काय बोलतंय? वाचा
5
आजचे राशीभविष्य - २१ नोव्हेंबर २०२५, कार्यपूर्ती, यश आणि कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस
6
Elections: मुंबईत ११.८० लाख तर, ठाण्यात ४.२१ लाख मतदार वाढले; महिला मतदारांची संख्या अधिक!
7
SC: राज्यपाल, राष्ट्रपतींना विधेयकांच्या मंजुरीसाठी डेडलाइन देता येणार नाही, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
8
India- Israel: भारत-इस्रायल समृद्धीचे नवे पर्व सुरू, मुक्त व्यापारासाठी उभयतांत सहमती
9
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
10
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
11
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
12
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
13
विशेष लेख: मिस्टर/मिसेस 'पसेंटेज' आणि बंगल्यावरचे 'ठेके'
14
लेख: बिन भिंतींच्या उघड्या शाळेत तुमचे स्वागत आहे...
15
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
16
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
17
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
18
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
19
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
20
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
Daily Top 2Weekly Top 5

आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 07:02 IST

चिंपांझी हसतात, शोक करतात, साधने-आयुधे बनवून वापरतात आणि प्रेमाचे बंधही जपतात, हे दाखवून देणारी जेन कायम स्मरणात राहील!

- डॉ. सुनील देशपांडे, प्राणी आरोग्यतज्ज्ञ

पूर्व आफ्रिकेमध्ये टांझानियाच्या घनदाट जंगलांमध्ये ती चालत होती. तेवढ्यात तो आला. तिने हातात ठेवलेले केळे त्याने स्वीकारले… आणि त्यांच्या जगात तिचा प्रवेश झाला. तो होता - डेव्हिड ग्रेबिअर्ड. हो. हे त्याचे नावही तिनेच ठेवले होते. ती धाडसी मुलगी होती मूळची ब्रिटनची आणि अभ्यासासाठी आफ्रिकन झालेली डेम जेन गुडाल! ज्या डेव्हिडने तिच्या हातातून केळे स्वीकारून त्यांच्या समुदायात तिचे स्वागत केले; तो होता चिंपांझी जातीचा माकड! मानव जातीच्या सगळ्यात जवळ जाणारी, भासणारी, वागणारी प्राण्यांची जात म्हणजे चिंपांझी ! 

१ ऑक्टोबर २०२५ रोजी डॉ. जेन गुडाल यांचे ९१ व्या वर्षी निधन झाले. ज्यांनी प्राण्यांकडे, मानवाकडे आणि वसुंधरेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कायमचा बदलला अशा डॉ. गुडाल एक धाडसी आणि हुशार शास्त्रज्ञ, लेखिका आणि वक्त्या होत्या. 

उंच शिडशिडीत ब्रिटिश स्त्री. तिने आपले संपूर्ण आयुष्य निसर्गाशी एकरूप होऊन चिंपांझी नामक प्राण्याच्या अभ्यासासाठी वाहिले. जेनच्या मनात लहानपणापासूनच प्राणी आणि निसर्गाबद्दल प्रचंड कुतूहल होते. खेळण्यांमध्येही इतर बाहुल्यांपेक्षा माकडाच्या बाहुल्या तिला जास्त आवडायच्या. घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे महाविद्यालयीन शिक्षण लगेच घेणे शक्य झाले नाही; परंतु प्राण्यांविषयी तिचा अभ्यास वाचनातून, निरीक्षणातून व प्रत्यक्ष अनुभवातून चालूच राहिला. टारझनच्या गोष्टी लहानपणी वाचत असताना तिला जंगलांचे आकर्षण निर्माण झाले. ती अनेकदा गमतीने म्हणत असे,  की टारझनने चुकीच्या जेनशी लग्न केले! आपण आफ्रिकेत जाऊन वन्यजिवांचा अभ्यास करावा, हे तिचे बालपणापासूनचे स्वप्न होते. जंगलात राहावे, प्राण्यांना त्यांच्या अधिवासात पाहावे, त्यांच्याविषयीच्या गोष्टी लिहाव्या एवढेच तिचे स्वप्न होते; पण तिच्या नशिबात त्याहून बरेच काही होते! १९५७ मध्ये जेन केनियाला गेली व तेथे जीवशास्त्रज्ञ लुई लीकी यांच्या संपर्कात आली. वयाच्या २६व्या वर्षी १९६० मध्ये टांझानियातील गोंबे स्ट्रीम राष्ट्रीय उद्यानात जेन गुडालने चिंपांझींवर स्वतंत्र अभ्यासाची सुरुवात केली.

जेनच्या निरीक्षणांतून समोर आलेला पहिला निष्कर्ष म्हणजे चिंपांझींची साधननिर्मिती क्षमता. हे चिंपांझी केवळ साधनांचा वापरच करत नाहीत, तर ते काड्या व फांद्या बदलून त्यांना उपयुक्त स्वरूप देतात. दगडांचा हत्यार म्हणून वापर करतात. हे मानवाव्यतिरिक्त इतर प्राण्यांमध्ये साधननिर्मिती आढळल्याचे पहिले ठोस पुरावे होते.

दुसरा निष्कर्ष म्हणजे चिंपांझींची सामाजिक रचना. चिंपांझी समूहांत गटनेतृत्व, स्पर्धा, हिंस्रपणा, तसेच स्नेह, प्रेम आणि मातृत्व, ममता असे विविध सामाजिक पैलू स्पष्टपणे दिसतात. तिसरा निष्कर्ष म्हणजे चिंपांझींचे भावनिक वर्तन. जेन गुडालने चिंपांझींच्या भावना, राग, भीती, दुःख, काळजी, खेळकरपणा, अंतर्मुखता, बहिर्मुखता यांचा तपशीलवार अभ्यास केला. त्यांच्या स्वभावांच्या नोंदी ठेवल्या. जेनची ही निरीक्षणे, नोंदी त्या काळातील पारंपरिक प्राणीशास्त्रीय दृष्टिकोनांपेक्षा, अभ्यास पद्धतीपेक्षा वेगळी होती. याबद्दल तिची तिच्या समकालीन अभ्यासकांनी थट्टा केली. तिच्यावर टीकाही केली; पण ती तिच्या अभ्यास पद्धतीबाबत ठाम होती. तिच्या या अभूतपूर्व संशोधनाने आपले जवळचे नातेवाईक कसे राहतात, कसे सामाजिकीकरण करतात आणि कसे विचार करतात याबद्दलच्या मानवाच्या समजुती बदलल्या.  चिंपांझी हसतात, शोक करतात, साधने-आयुधे बनवतात, वापरतात आणि प्रेमाचे बंधही जपतात, हे तिने दाखवून दिले.

जेन गुडालने १९७७ मध्ये  ‘जेन गुडाल इन्स्टिट्यूट’ची स्थापना केली.  ‘रूट्स अँड शूट्स’ प्रोग्रामद्वारे, तिने तरुणांच्या पिढ्यांना पर्यावरण रक्षणाबाबत, वन्यजिवांच्या संरक्षणाबाबत दिशा दिली. तिच्या संशोधनातील मौलिकता व महत्त्व लक्षात घेऊन केंब्रिज विद्यापीठाने तिला पदवी नसतानाही थेट पीएच.डी. अभ्यासक्रमात प्रवेश दिला. पुढे तिने प्राणी मानसशास्त्र या  विषयात केंब्रिज विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी मिळवली. जेनच्या संशोधन व कार्याला जागतिक स्तरावर गौरव मिळाला आहे. तिला संयुक्त राष्ट्रसंघाचा ‘Messenger of Peace’ हा किताब, टेंपलटन पुरस्कारासह अनेक सन्मान, पुरस्कार प्राप्त झाले. तिने In the Shadow of Man व Reason for Hope यासारखी ३० हून अधिक पुस्तके लिहून जनमानसात वैज्ञानिक माहिती पोहोचवली. प्राण्यांची काळजी, जंगलांचे संरक्षण, हवामान बदलाशी लढा आणि एक चांगले जग निर्माण करण्यासाठी तिची आठवण आपल्याला नेहमीच प्रेरणा देत राहील.    - drsunildeshpande@gmail.com 

English
हिंदी सारांश
Web Title : Jane Goodall: The primate researcher who understood chimpanzees in Tanzania.

Web Summary : Dr. Jane Goodall, who passed away at 91, revolutionized our understanding of primates, particularly chimpanzees. Her groundbreaking research in Tanzania revealed their tool-making abilities, complex social structures, and emotional lives. She founded the Jane Goodall Institute and inspired generations to protect wildlife.
टॅग्स :forestजंगल