मोदी जाणतील का जनतेची ही ‘मन की’ बात?
By Admin | Updated: April 8, 2015 23:58 IST2015-04-08T23:58:53+5:302015-04-08T23:58:53+5:30
मोदी काही बोलले आणि संवादापेक्षा वाद व विसंवादच जास्त उद्भवला, असं नेहमी घडत आलं आहे. अगदी ते पंतप्रधान नसतानाही आणि आता असतानाही

मोदी जाणतील का जनतेची ही ‘मन की’ बात?
प्रकाश बाळ
(ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभ लेखक)
मोदी काही बोलले आणि संवादापेक्षा वाद व विसंवादच जास्त उद्भवला, असं नेहमी घडत आलं आहे. अगदी ते पंतप्रधान नसतानाही आणि आता असतानाही. साहजिकच ‘पंचतारांकित स्वयंसेवी कार्यकर्त्यांच्या प्रभावाखाली न्यायव्यवस्था येत आहे की काय’, अशी शंका मोदी यांनी रविवारी दिल्लीत झालेल्या एका परिषदेत बोलताना व्यक्त केल्यानं मोठं वादंग निर्माण झालं, यात नवल काही नाही. किंबहुना हा वादविवाद व्हावा, असाच मोदी यांचा उद्देश होता.
मात्र मोदी यांच्या दिल्लीतील या विधानामुळं इकडं मुंबईत राहणाऱ्या मुश्ताक खान यांना कोणी तरी आपल्या मनातीलच बोलत आहे, असं वाटलं असण्याची जास्त शक्यता आहे. मुंबईतील वडाळा येथे राहणाऱ्या मुश्ताक खान यांचा मुलगा हमादान याच्यावर अलीकडंच ठाण्याजवळच्या मुंब्रा या गावी रस्त्यावरील कुत्र्यांनी हल्ला केला आणि त्यात तो गंभीर जखमी झाला. हमादानवर कुत्र्यांनी हल्ला केल्यावर महाराष्ट्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आमदार महादेव जानकर यांनाही मुंबईच्या गोरेगाव भागात रस्त्यावरील कुत्र्यांच्या हल्ल्याला सामोरं जावं लागलं. मुंबईच नव्हे, तर देशाच्या सर्व राज्यातील बहुतेक शहरं व गावं यात हा भटक्या कुत्र्यांचा त्रास नागरिकांच्या सहनशीलतेच्या पलीकडं जात चालला आहे. त्याचं कारण काय, तर भटक्या कुत्र्यांना मारू नये, त्यांचं निर्बीजीकरण करावं, असा न्यायव्यवस्थेचा आदेश आहे. हा आदेश न्यायव्यवस्थेनं दिला, तो प्राणिमित्र संघटनेनं केलेल्या जनहीत याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर.
येथेच नेमका मोदी यांनी दिल्ली येथे केलेल्या विधानाचा संबंध येतो. वास्तव काय आहे, हे पंचतारांकित स्वयंसेवी कार्यकर्ते लक्षात घेत नाहीत आणि त्यांच्या प्रचारामुळं प्रभावित होऊन न्यायव्यवस्था अनेकदा असे काही आदेश देते की, त्यानं वास्तव अधिकच बिकट बनतं, असं मोदी सुचवू पाहत होते. अर्थात मोदी यांचा रोख प्राणिमित्र संघटनांवर नव्हता. ‘रस्त्यावरचं कुत्रं जर आपल्या गाडीखाली आलं, तरीही आपण हळहळतोच’, असा उल्लेख गुजरातेतील नरसंहारात मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल बोलताना ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेला लोकसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या मुलाखतीत मोदी यांनी केला होताच की ! गुजरातेत मारल्या गेलेल्या मुस्लिमांना गाडीखाली आलेल्या कुत्र्याइतकंच मोदींच्या दृष्टीनं महत्त्व होतं. त्यामुळं मोदी यांचा खरा रोख हा गुजरातेतील घटनांच्या विरोधात लढणाऱ्या तिस्ता सेटलवाड यांना अटक करण्याच्या गुजरात सरकारच्या प्रयत्नांना सर्वोच्च न्यायालयानं ‘खो’ घालण्यावर आणि अलीकडंच ‘ग्रीनपीस’ या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संघटनेच्या प्रिया पिलई या कार्यकर्तीला लंडनला जाण्यास प्रतिबंध करण्याचा केंद्र सरकारचा आदेश रद्दबातल ठरवण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयावर होता.
तरीही मोदी जे काही दिल्लीत म्हणाले, त्यामागचा उद्देश कोणताही असला, तरी केवळ मुश्ताक खानच नव्हे, तर देशातील असंख्य लोकांना ते भावेल व पटेलही. भटक्या कुत्र्यांची संख्या काबूत राखण्यासाठी त्यांना न मारण्याच्या न्यायव्यवस्थेच्या आदेशामुळं वास्तव अधिक बिकट झालं आहे, हे असंख्य भारतीय दररोज अनुभवत आहेत. त्यामुळं एखाद्या हमादान खानवर कुत्र्यांनी हल्ला केला की, अगदी प्रतिक्षिप्तपणं प्रतिक्रिया उमटते, ती म्हणजे ‘मंत्र्याच्या, उद्योगपतींच्या वा न्यायाधीशांच्या मुलाला कुत्र्यानं ठार मारल्याविना हा आदेश रद्द होणार नाही’ अशीच. मोदी यांना हे माहीत असल्यानंच त्यांनी ही खेळी खेळली आहे, हेही विसरून चालणार नाही.
वस्तुत: जगण्याच्या संघर्षात अग्रक्रमानं महत्त्व कोणाला द्यायचं? माणसाला की प्राण्यांना? अहिंसेचं तत्त्व आयुष्यभर एक मूल्य म्हणून पाळणाऱ्या महात्मा गांधी यांनी याचं उत्तर अनेक दशकांपूर्वीच देऊन ठेवलं आहे.
झालं असं होतं की, सेवाग्राम आश्रमाबाहेर एक भटकं कुत्रं अनेकांना चावत होतं. या घटनेचे पडसाद गांधीजींच्या संध्याकाळच्या प्रार्थना सभेत उमटले. अहिंसेचं तत्त्व पाळताना या कुत्र्याचं काय करायचं, असा प्रश्न महात्माजींना विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं की, ‘माणूस व कुत्रा यांत माणसाला महत्त्व आहे आणि जर कुत्रा माणसाला जगू देत नसेल, तर त्याला मारण्याआड अहिंसेचा अडसर असता कामा नये’. याच मुद्द्यावर नंतर गांधीजींनी ‘हरिजन’मध्ये एक लेखही लिहिला.
प्रगत देशात काय होत असतं?
अफगाणितानात अमेरिकी सैन्य असताना तेथील एका आत्मघातकी हल्ल्याच्या वेळी सैनिकांच्या छावणीबाहेरचं भटकं कुत्रं ओरडलं आणि त्यानं सावध झाल्यानं हा हल्ला रोखता आला. त्यामुळं या कुत्र्याला त्या छावणीतील सैनिकांनी पाळलं. त्यांच्यापैकी एकानं मायदेशी जाताना हा कुत्रा बरोबर नेला. अमेरिकेत या सैनिकाच्या घरात त्याच्या मुलांना या कुत्र्याचा लळा लागला. पुढं एक दिवशी अचानक हा कुत्रा गायब झाला. शोध घेतल्यावर समजलं की, घराचं दार उघडं असताना तो बाहेर पडला आणि त्याच्या गळ्यात पट्टा नसल्यानं स्थानिक सरकारी कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून नेलं व नंतर कोणी न्यायला न आल्यावर सरकारी नियमांप्रमाणं हे कुत्रं मारून टाकण्यात आलं.
सध्या आपण अनेक गोष्टींत अमेरिकेचं अनुकरण करीत आहोत, तेव्हा याबाबत ते करायला काय हरकत आहे? आणि गांधी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवरील प्रात:स्मरणीय नाव बनलं आहे. दिल्लीत कट्टर संघ स्वयंसेवक सत्तास्थानी आहेत. शिवाय दिल्लीतील प्रधान सेवकाला गांधीप्रेमाचं भरतंही अधून मधून येत असतं. तेव्हा मुश्ताक खानसारख्या लाखो भारतीयांच्या ‘मनकी बात’ जाणून मोदी कुत्र्यांचा त्रास कमी व्हावा, म्हणून कायद्यातच बदल करून न्यायालयीन अडसर दूर सारतील, अशी अपेक्षा ठेवायला हरकत नसावी. जर तसं झालं नाही तर? ‘पंचतारांकित स्वयंसेवी कार्यकर्त्यांचा प्रभाव’ केवळ न्यायव्यवस्थेवरच नाही, तर मोदी व इतर राजकारण्यांवरही आहे, असं मानण्यापलीकडं सर्वसामान्य भारतीयाच्या हातात काही आहे काय?