सरकार पडेल की पडणार नाही? ‘रोहित पवार युवा ब्रिगेड’...ये क्या मामला है भाई?

By यदू जोशी | Published: August 29, 2020 06:55 AM2020-08-29T06:55:04+5:302020-08-29T06:55:23+5:30

राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी सरकारमधून बाहेर पडायला सांगितलं तर तत्काळ बाहेर पडू हे विजय वडेट्टीवारांचं जर-तर कशासाठी? दोघांचा प्रयत्न ‘लॉयल दॅन द किंग’ होण्याचा दिसतो.

Will the government fall or not? ‘Rohit Pawar Youth Brigade’ Article on Political Happening | सरकार पडेल की पडणार नाही? ‘रोहित पवार युवा ब्रिगेड’...ये क्या मामला है भाई?

सरकार पडेल की पडणार नाही? ‘रोहित पवार युवा ब्रिगेड’...ये क्या मामला है भाई?

Next

यदू जोशी, वरिष्ठ सहाय्यक संपादक, लोकमत

चर्चा होत राहील; पण...
राज्यातील तीन चाकांचं महाविकास आघाडी सरकार पडणार असं भाकीत भाजपचे नेते व्यक्त करीत असतात. पक्षात बाहेरून आलेला गोतावळा सांभाळण्यासाठी भाजपवाले असं बोलतात का माहिती नाही. काँग्रेसच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रवादीनं जसं प्रफुल्ल पटेल यांना नेमलंय तसं भाजपनं आपल्याच आमदारांवर नजर ठेवण्यासाठी कुणालातरी नेमण्याची गरज आहे. आठ ते दहा आमदार कुंपणावर बसलेले आहेत. सरकार अधिक मजबूत होतंय असं दिसलं तर ते राष्ट्रवादीत उड्या घेतील. सरकार पाडण्यासाठी जे हालचाली करू शकतात त्या देवेंद्र फडणवीसांना निदान डिसेंबरपर्यंत तरी भाजपश्रेष्ठींनी बिहारमध्ये गुंतवून ठेवलंय. शिवाय महाराष्ट्रातील सरकार पाडण्यास भाजपश्रेष्ठी सध्या तरी अनुकूल नाहीत. त्यामुळे सरकार पडण्याची फक्त चर्चा होत राहील; पण ते पडणार नाही. याचा अर्थ सरकारमध्ये सगळं आलबेल आहे असं मुळीच नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात तब्बल २४ दिवस अबोला होता आणि त्याचा फायदा घेत अजित पवार यांनी उद्धव यांच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न केला, अशी चर्चा मध्यंतरी होती. ती भाजपनं पसरविली असण्याची शक्यता आहे पण बऱ्याच दिवसात उद्धव ठाकरे-शरद पवार एकमेकांना भेटल्याची बातमी नाही हेही खरं!

१. भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं आहे २) सत्तेतून बाहेर पडल्यास काँग्रेस फुटेल आणि ३) राष्ट्रवादीवर शरद पवार यांचं संपूर्ण नियंत्रण आहे हे तीन मुद्दे मौजुद आहेत तोपर्यंत सरकारला धोका नाही. बाय द वे, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिणाऱ्यांपैकी पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरा या तीन नेत्यांना ते माफी मागत नाहीत तोवर त्यांना रस्त्याने फिरू देणार नाही या मंत्री सुनील केदारांच्या घोषणेचं काय झालं? माफी तर कुणीच मागितली नाही. राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी सरकारमधून बाहेर पडायला सांगितलं तर तत्काळ बाहेर पडू हे विजय वडेट्टीवारांचं जर-तर कशासाठी? दोघांचा प्रयत्न ‘लॉयल दॅन द किंग’ होण्याचा दिसतो. आता अधिवेशन आहे म्हणून सहज प्रश्न पडला. यूपीएससी टॉपर्सचा सत्कार, स्थलांतरित मजुरांची सोय करणं हे विधानमंडळाचं काम आहे का? अधिवेशन नसताना एखाद्या विषयात चौकशीचे आदेश देता येतात का? असतात नाना तऱ्हा.

दोन नागपूरकरांची बिहारमध्ये कसोटी
बिहारचं अन् नागपूरचं नातं ऐतिहासिक आहे. अटक ते कटकपर्यंत सत्ताविस्तार करणाºया पराक्रमी नागपूरकर राजे भोसलेंनी एकेकाळी बिहारमधील काही भाग काबिज केला होता. श्रीमंत रघुजीराजे भोसले त्या ठिकाणी गेले आणि तेथील लोक, संस्कृती बघून म्हणाले, ‘यह तो हमारे नागपूर जैसाही दिखता है... म्हणून त्या भागाला नाव पडलं, छोटा नागपूर. नवं राज्य झाल्यानंतर हा भाग आजच्या झारखंडमध्ये आहे. प्रख्यात विदर्भवादी लोकनायक बापूजी अणे हे स्वातंत्र्यानंतर बिहारचे दुसरे राज्यपाल होते. पाटणा शहरात बिहारच्या मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या मार्गाला अणे मार्ग असं नाव आहे. बिहारची विधानसभा निवडणूक चालू वर्षाअखेर होतेय. सत्तारूढ आघाडीतील क्रमांक दोनचा पक्ष असलेल्या भाजपचे निवडणूक प्रभारी म्हणून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जबाबदारी आहे. ते नागपूरकर अन् बिहारसाठीच्या काँग्रेस उमेदवार छाननी समितीचे प्रमुख असलेले राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश पांडे हेही नागपूरकरच. दोघांची घरं नागपुरात एकमेकांपासून दूर नाहीत. पांडे यांचा रोल बिहारमध्ये फडणवीस यांच्याइतका मोठा नाही; पण काँग्रेसचे उमेदवार ठरविण्यात त्यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका असेल. दोन नागपूरकरांची बिहार कसोटी सुरू झाली आहे.

रोहित पवार युवा ब्रिगेड’ ...ये क्या मामला है भाई?
राष्ट्रवादीतील काही नेत्यांच्या संघटनांचं प्रस्थ एकेकाळी फारच वाढलं होतं. तेव्हा पक्षकार्याऐवजी आपापल्या संघटनांना बळ देणाºया नेत्यांनी पक्षाकडे जास्त लक्ष द्यावं या शब्दात अजित पवार, आर.आर. पाटील यांनी त्या काळी कान टोचले होते. या सगळ्याची आठवण आली ती फेसबुकवर फिरणाºया पोस्ट बघून. आता नवीन संघटना उदयास आली आहे. नाव आहे, रोहित पवार युवा ब्रिगेड. नवनाथ देवकाते हे या ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष असून, ते राष्ट्रवादीचे पदाधिकारी असल्याचं त्यांच्या प्रोफाइलवरून दिसतं. नागपूरच्या एका नेत्यानं या ब्रिगेडच्या विदर्भ विभागीय मुख्य समन्वयकपदी त्यांची नियुक्ती केल्याबद्दल रोहित(दादा) पवार आणि देवकाते यांचे आभारही मानले आहेत. अशी काही ब्रिगेड असल्याची माहिती रोहित पवारांनाही आहे की नाही हे कळलं नाही. कदाचित हे वाचून टिष्ट्वटद्वारेच काय तो खुलासा ते करतील.

Web Title: Will the government fall or not? ‘Rohit Pawar Youth Brigade’ Article on Political Happening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.