दिल्ली नवा इतिहास रचणार का?

By Admin | Updated: February 5, 2015 23:56 IST2015-02-05T23:56:19+5:302015-02-05T23:56:19+5:30

सापाच्या डोळ्यात जसे आकर्षण असते तसे आकर्षण दिल्ली शहरात आहे असे म्हणतात. त्यामुळे जी व्यक्ती दिल्लीत येते ती त्या शहराची होऊन जाते.

Will Delhi make a new history? | दिल्ली नवा इतिहास रचणार का?

दिल्ली नवा इतिहास रचणार का?

सापाच्या डोळ्यात जसे आकर्षण असते तसे आकर्षण दिल्ली शहरात आहे असे म्हणतात. त्यामुळे जी व्यक्ती दिल्लीत येते ती त्या शहराची होऊन जाते. दिल्लीत १ कोटी २३ लाख मतदार आहेत. त्यामुळे या शहराचा स्वत:चा असा वेगळा रंग आहे. येथील कामकरी वर्गाचा उपजीविकेचा जसा प्रश्न आहे तसाच सार्वजनिक आरोग्याचाही प्रश्न आहे. घरी सुरक्षितरीतीने पोचण्याचा जसा प्रश्न आहे तसेच झोपडपट्ट्यांचाही प्रश्न आहे. एकीकडे ल्यूटीयन्सची दिल्ली आहे तर दुसरीकडे झोपडपट्ट्या असलेली दिल्ली आहे. या झोपडपट्ट्यातील लोक पक्क्या घरात राहण्याचे स्वप्न बघत जगत असतात.
देशाची राजधानी असलेल्या या शहराचा प्रत्येक दिवस नवीन भीती मनात घेऊन उगवत असतो. रात्री घरी पोचलेली व्यक्ती दुसऱ्या दिवशी आपण कोणत्या रस्त्याने आपल्या कार्यालयात पोचू या चिंतेत झोपी जात असते. त्याला भाजी कुठून मिळेल आणि कोणती बस मिळेल याची काळजी वाटत असते. घरी राहणाऱ्या लोकांना नळाला पाणी येईल का, वीज बंद तर होणार नाही याची काळजी असते. येथे प्लॅस्टिकचा वापर करण्यावर बंदी, फटाके फोडण्यावर बंदी, १५ वर्षाच्यापेक्षा जुन्या वाहनांचा वापर करण्यावर बंदी. अशातऱ्हेच्या अनेक बंदीचा सामना करीत दिल्लीची माणसे आला दिवस व्यतित करीत असतात.
तशीही दिल्ली बदलली आहे. येथील चावडी बाजार आता हार्डवेअर बाजार म्हणून ओळखला जातो. चांदनी चौकाचे रूपांतर कापड बाजारात झाले आहे. दुसरीकडे टांगेवाले दिसेनासे झाले आहेत. काही लोक आजही स्वयंपाकासाठी स्टोव्हचा वापर करीत असतात. तरीही जी व्यक्ती दिल्लीत येते ती दिल्लीचीच होऊन जाते. मग राहण्यास जागा मिळाली नाही तर दुकानाच्या पाटीवर रात्रीचे वेळी लोक झोपत असतात. शहरातील वस्त्या वाढत आहेत. अशोक विहार, लॉरेन्स रोड, वसंत कुंज, सरिताविहार अशा नवीन वस्त्या व नवीन रस्ते झाले. तरीही ५० चौरस फूट जागेत राहणारे लोक जसे येथे आहेत तसेच स्वत:च्या बंगल्यात ४००० चौरस फुटाचे बाथरूम असलेले लोकही येथेच आहेत. तरीही दिल्लीकडे येणाऱ्यांची रीघ कमी झालेली नाही. प्रत्येक लोकसमुदायाने दिल्लीत स्वत:चे वसतीस्थान निर्माण केले आहे. असे करीत असताना त्यांनी स्वत:चे राहणीमान मात्र कायम राखले आहे. घटनेच्या कलम २१ ने लोकांना वीज, पाणी, रस्ते, आरोग्य, रोजगार आणि प्रदूषणमुक्त वातावरण मिळण्याचा अधिकार दिला आहे. पण राजकीय पक्षांच्या निवडणूक जाहीरनाम्यातही ह्याच गोष्टी देण्याचे अभिवचन वर्षानुवर्षे देण्यात येत असते. प्रत्येक राज्याने या गोष्टी आपल्या नागरिकांना देण्याचे घटनेने बंधनकारक केले आहे. तरीही राजकीय पक्षांना याच गोष्टी लोकांना मिळवून देण्याचे अभिवचन द्यावे लागत आहे हे प्रत्येक सत्ताधीशाचे अपयशच नाही का?
अडीच वर्षापूर्वी अण्णा हजारे यांनी दिल्लीत एक आंदोलन सुरू केले. राजकारण हे चिखलाप्रमाणे घाणेरडे आहे असे त्यांनी त्यावेळी म्हटले होते. हे म्हणणे मान्य करणारे लोक त्यांच्यासोबत होते. पण आता तीच माणसे राजकारणाच्या चिखलात उतरण्यासाठी सिद्ध झाली आहेत. त्याचा आम आदमी पक्ष ७० सूत्री जाहीरनामा जाहीर करून निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा किंवा भाजपाचे व्हिजन डाक्युमेंट लोकांना भुलविण्याचे काम करीत आहे. त्यांनी पिण्याचे पाणी देण्याचे अभिवचन दिले. स्वस्त दरात वीज देऊ असे सांगितले. गरिबांना गरिबीपासून मुक्त करू असेही सांगण्यात आले.
दिल्लीबाबत वस्तुस्थिती अशी आहे की दिल्लीतील १ कोटी २३ लाख मतदारांपैकी ७३ लाख लोकांचे उत्पन्न महिना १५ हजार रुपये, २२ लाख मतदारांचे उत्पन्न महिना ७ हजार तर ९ लाख लोकांचे उत्पन्न महिना ३३ हजार इतके आहे. दिल्लीत एकूण २ लाख ६६ हजार बेरोजगार असून, त्यातील १ लाख ५६ हजार हे उच्चशिक्षित आहेत आणि १५ ते २९ वर्षाच्या वयोगटातील आहेत. तेच काही लोकांना सत्तेची स्वप्ने दाखवीत असतात.
दिल्ली शहराची अवस्था राष्ट्राच्या अन्य राज्यातील शहरांपेक्षा वेगळी नाही. येथील झोपडीत राहणाऱ्यांना इतरांसारखेच घर हवे आहे तसेच वीज, पाणी, चांगले रस्ते, चांगले ड्रेनेज, चांगले स्वास्थ्य, शिक्षण या गोष्टसुद्धा हव्या आहेत. दिल्लीतील साडेतीन लाख कुटुंबे ही दारिद्र्यरेषेखाली आहेत. तरीही त्यांना दिल्ली शहराचे रूप भुलवीत असते. येथील राजकारणाच्या चिखलात आजवर कोणतेही बदल झालेले नाही. तसेच त्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनातही बदल झालेला नाही!
दिल्ली शहराची निर्मिती ज्यांनी केली त्यांचा जुना इतिहास आता कालबाह्य झाला आहे. त्याचे दफन करण्यात आले आहे. तरीही दिल्ली शहर हे इतिहासावरच जगत असते. त्यामुळे दिल्ली शहरात हिंडत असताना इतिहासही तुम्हाला सोबत देत असतो. कामाच्या शोधात माणसे हिंडत असतात, तसेच कामावर जाणारीही माणसे रस्त्यावरून जात असतात. त्यांच्या मनात सारखीच बेचैनी असते. फायद्या तोट्याचा विचार करीतच दिल्लीकर जगत असतात. आता हेच लोक आगामी निवडणुकीच्या माध्यमातून नवीन इतिहास रचणार आहेत.


पुण्यप्रसून वाजपेयी

 

Web Title: Will Delhi make a new history?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.