शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 06:23 IST

Maruti Chitampalli Passes Away: ‘आयुष्यात सारे काही भरून पावलो, आता कोणतीही आसक्ती उरलेली नाही, आनंदाने मुक्त होऊ द्या’, असे म्हणत त्यांनी निरोप घेतला.

शहरी प्रदूषणापासून मुक्त अशी शुद्ध हवा वर्षानुवर्षे फुप्फुसात भरून घेतलेले, जंगलवाटांच्या चढउतारावर पायाच्या पिंडर्‍या मजबूत झालेले अरण्यऋषी मारुती चितमपल्ली नक्कीच शतायुषी होतील, असे वाटत असताना बुधवारी रात्री त्यांचे प्राणपक्षी उडाले. चाहत्यांना, वाचकांना, निसर्गप्रेमींना त्यांनी चकवा दिला. ‘आयुष्यात सारे काही भरून पावलो, आता कोणतीही आसक्ती उरलेली नाही, आनंदाने मुक्त होऊ द्या’, असे म्हणत त्यांनी निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने निसर्ग व माणूस एकत्र गुंफणाऱ्या एका पर्वाची अखेर झाली आहे. 

नऊ दशकांहून थोड्या अधिक आयुष्यातील सात दशके चितमपल्लींनी निसर्गनिरीक्षण व अध्ययनाची तपश्चर्या केली. संस्कृत साहित्यातील पौराणिक कथा अभ्यासल्या आणि त्यानंतर लहान मुलाच्या उत्साहाने अनुभवकथन केले. अशा चालत्याबोलत्या निसर्गकोशाचे शेवटचे पान उलटले गेले आहे.१९८३ साली म्हणजे वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर त्यांचे ‘पक्षी जाय दिगंतरा’ हे पुस्तक आले आणि त्यानंतरही डझनावारी पुस्तके, वनोपनिषदे, झाडे-पक्षी-प्राणी-मासे आदींचे धीरगंभीर कोश अशी समृद्ध ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केली.

अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, पद्मश्रीसह कित्येक पुरस्कार, अनेक मानमरातब देऊन त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न झाला. तथापि, मिश्रभाषिक सोलापूरमध्ये जन्मलेल्या मारुती चितमपल्ली यांनी मराठी साहित्याला, मराठी संस्कृतीला, महाराष्ट्राला इतके भरभरून दिले की, आपण पूर्णांशाने उतराई होऊच शकणार नाही. कोईमतूर, डेहराडून येथे प्रशिक्षणानंतर चितमपल्ली वनखात्यात दाखल झाले, विदर्भात आले आणि विदर्भाचेच होऊन गेले. तो काळ फॉरेस्ट खात्याच्या दहशतीचा होता. अमरावतीचे दिवंगत खासदार सुदामकाका देशमुख सांगायचे तसे आदिवासी माणसे चार पायांच्या वाघांपेक्षा फॉरेस्ट खात्यातील दोन पायांच्या प्राण्यांना घाबरायची. नंतर अभयारण्ये, व्याघ्र प्रकल्प घोषित होऊ लागले.

देशाच्या वनधोरणाने आदिवासींना जंगलापासून दूर ढकलायला सुरुवात केली. जंगलात आगीचा हाकारा झाला की खरकट्या हाताने ती विझवायला जाणारी आदिवासी संस्कृती क्षीण होऊ लागली. सपाट मैदानातील लोकांनी अवतीभोवतीचे जंगल तोडून विकास नावाच्या विनाशाची वाट धरली. नेमक्या याच काळात सह्याद्रीमधील कर्नाळा, सातपुड्यातील मेळघाट, तसेच नवेगावबांध, नागझिरा अभयारण्यात चितमपल्ली वनाधिकारी होते. त्यांनी त्यांच्या परीने आदिवासी व अरण्याचा सांस्कृतिक सांधा जोडून ठेवण्याचा प्रयत्न केला. नवेगावबांधमधील माधवराव पाटील डोंगरवार या वनवेड्या गुरूंकडून जंगल व जंगलवासींचे जगणे समजून घेतले. 

स्वत: माधवराव पाटील पट्टीचे शिकारी होते. त्यांना जंगलाच्या सगळ्या खाचाखोचा माहिती होत्या. पूर्व विदर्भातील याच टापूमध्ये चितमपल्ली यांची प्रतिभा बहरली. चितमपल्ली गोष्टीवेल्हाळ होते. तो त्यांचा स्वभाव लिखाणात उमटला. जंगल ते नुसते जगलेच नाहीत तर जंगलजीवनाशी एकरूप झाले. जंगल म्हणजे चितमपल्ली आणि चितमपल्ली म्हणजे जंगल. त्यातील वृक्षराजी, पशुपक्षी, महत्त्वाचे म्हणजे जंगलात राहणारी भोळीभाबडी माणसे. शहरी माणसांना विस्मय वाटावा अशा या साऱ्यांच्या अद्भूत कथा. मेळघाटातील फुलांचा रंग शोषून घेणाऱ्या दवबिंदूंनी बरसलेल्या केशराच्या पावसापासून रानवाटांनी दिलेला चकवा आणि त्या भयकंपित प्रवासातही टिपून घ्यायचे टिपूर चांदणे. वृक्षाच्या उंच टोकावर बसून हिरवे जग न्याहाळणारा सुवर्ण गरूड ते रात्रीच्या अंधारात दबा धरून बसलेला रातवा. साप, बगळ्यांचे विश्व. असे सारे जंगलाचे देणे चितमपल्ली यांनी वाचकांच्या पदरात रिते केले. त्यामागील विज्ञान समजून सांगितले.

रक्तचंदनाच्या झाडामुळे किरणोत्सर्ग कसा रोखला जातो, हे सांगितले. अणूबॉम्बमुळे उद्ध्वस्त झालेल्या जपानमध्ये जाऊन त्या उपायाचा अभ्यास केला. वाघ, रानगव्यांपासून सगळ्या हिंस्त्र श्वापदांच्या सवयी व दैनंदिनी चितमपल्लींमुळेच जंगलाबाहेर कळली.. आणि महत्त्वाचे म्हणजे जंगलात राहणाऱ्या आदिवासींनी हा अनमोल ठेवा पिढ्यानपिढ्या जपल्याची जाणीवही त्यांनी करून दिली. यातून सामान्य लोकांमध्ये निसर्गाचे आकर्षण वाढले. निसर्ग विज्ञानाचे कुतूहल वाढीस लागले. एका मागोमाग एक पिढ्या निसर्गवाचनाकडे वळल्या. वृद्ध आजी-आजोबांचे बोट धरून जंगलातील पायवाटांवरून भटकंती करणाऱ्या बाळगोपाळांची पिढी संस्कारित झाली. चितमपल्ली यांच्या लिखाणाने, शब्दांनी, अनुभवकथनांनी, रानवाटांवरील धुळमाखल्या पावलांनी अनेक पिढ्या वनसंस्कारित केल्या. हे वनसंस्कार वृद्धिंगत करणे, जंगल व त्यात राहणाऱ्या माणसांची काळजी घेणे, हीच मारुती चितमपल्ली यांना खरी श्रद्धांजली!  

टॅग्स :Deathमृत्यूMaharashtraमहाराष्ट्र