तरन्नुम.. तरुणाई.. डान्सबार बंदी अन् सरकारची कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 05:02 PM2019-01-24T17:02:35+5:302019-01-24T17:03:56+5:30

माजी गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांनी तडकाफडकी डान्सबार बंदीचा निर्णय घेतला तेव्हाही हीच चर्चा उपस्थित झाली होती की

Why it is difficult for government to ban Dance Bars | तरन्नुम.. तरुणाई.. डान्सबार बंदी अन् सरकारची कोंडी

तरन्नुम.. तरुणाई.. डान्सबार बंदी अन् सरकारची कोंडी

googlenewsNext

संदीप प्रधान

मागील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने डान्सबारवरील निर्बंध शिथिल करण्याचे आदेश दिले आणि वेगवेगळ्या व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर लोकांच्या प्रतिभेला बहर आला. न्यायव्यवस्थेवर शिंतोडे उडवण्यापासून डान्सबारमधील वावरण्यात आलेल्या सैलपणावर विनोद करण्यापर्यंत सारे काही झाले. या मेसेजच्या गदारोळात एक संदेश असा होता की, डान्सबार नसतील तर चांगल्या घरातील पोरीबाळींवर हात टाकला जाईल. त्यामुळे डान्सबार सुरू राहणे ही समाजाची गरज आहे. हा मेसेज वाजताच ख्यातनाम विदुषी दुर्गाबाई भागवत आणि पँथरच्या चळवळीतील एक जहाल कार्यकर्ते राजा ढाले यांच्यात झालेला व महाराष्ट्रात गाजलेला वाद आठवला. त्यावेळी नामदेव ढसाळ यांचे गोलपीठा आले होते. फडके, खांडेकर यांच्या गोडगुलाबी साहित्यकृतींमध्ये रमणाऱ्या पांढरपेशा समाजात गोलपीठाने खळबळ उडवून दिली होती. गोलपीठावरील चर्चेत एका व्यासपीठावर दुर्गाबाई भागवत व राजा ढाले हे होते. त्या व्यासपीठावरुन दुर्गाबाई म्हणाल्या की, वेश्यालये नसतील तर चांगल्या घरातील पोरीबाळींवर रस्त्यात अत्याचार होतील. त्यामुळे वेश्यालये हवीच. लागलीच राजा ढाले उसळले व ते म्हणाले की, गोरगरीब, दलित शोषित महिलांचे वेश्याव्यवसायामुळे शोषण होते. त्याला विरोध करायचे सोडून जर दुर्गाबाईंसारख्या विदुषी वेश्यालयांचे समर्थन करीत असतील तर दुर्गाबाईंनी खाटेला लाल दिवा लावून धंदा करावा. ढाले यांच्या त्या जहाल विधानाने महाराष्ट्रात काहूर माजले. डान्सबारवरील निर्बंध शिथिल झाल्याबद्दल सोशल मीडियाच्या चावडीवरील चर्चा त्याच ऐतिहासिक मुद्द्यापर्यंत आली होती.

माजी गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांनी तडकाफडकी डान्सबार बंदीचा निर्णय घेतला तेव्हाही हीच चर्चा उपस्थित झाली होती की, सरकारने संस्कृती रक्षकाच्या भूमिकेत जाऊन हा निर्णय घेणे कितपत उचित आहे. श्रीराम सेनेसारख्या स्वयंघोषित संस्कृतीरक्षक संघटना कायदा हातात घेऊन वेगवेगळ्या विषयात नाक खुपसतात. मात्र राज्यघटनेनुसार चालणाऱ्या सरकारने अशा पद्धतीने लोकांच्या खासगी जीवनात हस्तक्षेप करावा का? अर्थात मीडिया व समाजातील एका वर्गाने डान्सबार बंदीचा विषय इतका उचलून धरला की, आबा रातोरात हीरो झाले होते. अनेक मोडलेले संसार वाचवणारे मसिहा अशी त्यांची प्रतिमा झाली. त्या प्रतिमेच्या ते प्रेमात पडले आणि पुढे ही बंदी टिकवण्याकरिता त्यांनी आपली व सरकारची प्रतिष्ठा पणाला लावली. अर्थात कायद्यातील वेगवेगळ्या पळवाटांमुळे डान्सबार बंदी ढेपाळली.

डान्सबार व त्यामधील नाचणाऱ्या मुली ही व्यवस्था बेरोजगारी व मुख्यत्वे गिरणी कामगारांच्या संपानंतर निर्माण झालेल्या आर्थिक पेचप्रसंगाचे फलित आहे. वरळी, लालबाग यासारख्या भागात त्यावेळी मोजकेच डान्सबार उभे राहिले. धनदांडग्यांची पोरं तेथे करमणुकीकरिता येऊ लागली. बघता बघता नव्वदच्या दशकात डान्सबार फोफावले. उपनगरात तर गल्लोगल्ली मेडिकल शॉप असावी तसे डान्सबार सुरू झाले. परप्रांतातून आलेल्या मुली या व्यवसायात आल्या. नोटांची उधळण, नोटांचे हार अशा लक्ष्मीच्या ओंगळवाण्या प्रदर्शनाने कळस गाठला. काही डान्सबारमध्ये एकाच वेळी शेकडो मुली वेगवेगळ्या फ्लोअरवर नाचू लागल्या आणि एंट्रीकरिता ग्राहक वेटींग राहू लागले. पैशांच्या थप्प्या लावून ग्राहक एखाद्या विशिष्ट पोरीचे आशिक बनून तासनतास बसू लागले. पहाटेपर्यंत डान्सबार सुरू राहायचे. अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक डान्सबारच्या व्यवसायात उतरले आणि ग्राहक म्हणूनही पायधूळ झाडू लागले. त्यामुळे डान्सबार आणि राडे हे नवे समीकरण झाले. डान्सबारमधील पोरींनी काही गुंडांना आपले बॉडीगार्ड नेमले. त्यांना नेण्याआणण्याकरिता स्पेशल रिक्षा, टॅक्सी तैनात केल्या जायच्या. एखादा आशिक पाठलाग करील म्हणून त्या मधल्याच स्टेशनला रिक्षा, टॅक्सी सोडून दुसऱ्याच वाहनाने प्रवास करुन आशिकांना गुंगारा देऊ लागल्या. बारबालांच्या प्रेमात बुडाल्याने बरबादीतून आत्महत्या, खूनबाजीची प्रकरणे घडली.

याच काळात पश्चिम उपनगरातील तरन्नुम या डान्सबार गर्लच्या कहाण्या प्रकाशात आल्या आणि अनेकांना धक्का बसला. तिच्यावर फिदा असलेल्या अनेकांनी तिच्यावर लक्ष्मीची अक्षरश: उधळण केली होती. कुणी तिला लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये फ्लॅट खरेदी करुन दिला तर कुणी तिला होंडासिटी मोटार भेट दिली होती. तिच्याकडे डायमंड सेट किती होते त्याची तर गणतीच नाही. बॉलिवुडचे काही कलाकार, उद्योजक, हिरे व्यापारी हे तिचे आशिक होते. वेगवेगळ्या डान्सबारमध्ये अल्पकाळाकरिता अशा छोट्या छोट्या तरन्नुम उदयाला येत होत्या. ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत सर्वाधित डान्सबार त्या पोलीस स्टेशनमधील बदलीकरिता तेवढी मोठी बोली, असे प्रकार सुरु होते. त्या काळात एका टॅक्सी चालकाची कहाणी चर्चेत आली होती. त्याच्या सात टॅक्सी होत्या. तो रोज त्याच्या तरन्नुमच्या चाहतपायी विशिष्ट डान्सबारमध्ये येऊन बसत होता. दौलत उधळत होता. करता करता सात टॅक्सीपैकी एक राहिली. कुटुंब देशोधडीला लागायची वेळ आली. तेव्हा त्याचे मन रिझवण्याकरिता नाचणाऱ्या त्या मुलीलाच दया आली आणि तिनेच त्याला सांगितले की, बाबारे यापुढे इथे येऊ नको. ती एकुलती एक टॅक्सी चालवून कुटुंबाचे पोट भर. अनेक डॉक्टर, वकील, सीए, व्यापारी हे डान्सबारचे नैमित्तिक ग्राहक होते. कारण त्यांचे शंभर टक्के व्यवहार हे रोखीने होत असायचे व दररोज तयार होणारी ही रोकड पूर्ण घरी न नेता त्यापैकी काही डान्सबारमध्ये उडवणे हे आयकर खात्यापासून खंडणीखोरांपर्यंत अनेकांचा ससेमिरा चुकवण्याकरिता पथ्यावर पडणारे होते.

पनवेलच्या डान्सबारमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील साखरसम्राटांची पोरं येऊन धुमाकूळ घालायला लागली व बर्बाद व्हायला लागली तेव्हा आर. आर. पाटील यांनी बंदीचे अस्त्र उगारले. काही काळ खरोखरच डान्सबार ठप्प झाले होते. मात्र कालांतराने जसजशी बंधने सैलावली तशी बंदी केवळ कागदावर राहिली. मुलींनी रात्री उशिरा डान्सबारमध्ये थांबू नये, असा नियम आहे. मात्र अनेक डान्सबारमध्ये छुपे रस्ते करुन मुली लपवण्याची तळघरे केलेली आहेत. पैसे उधळण्यास बंदी असली तरी त्याचेही उल्लंघन केले जाते. डान्सबारच्या दिशेनी येणाऱ्या रस्त्यावर साध्या वेशातील बाऊन्सर्स उभे करून पोलिसांच्या हालचालींची खबर वॉकीटॉकीवर देऊन आतील गैरकृत्यांना मोकळे रान देणारी व्यवस्था उभी केली गेली.

गोलपीठात शरीर विक्रयाकरिता आणलेली स्त्री ही फसवलेली, अपरिहार्यतेनी या व्यवसायात ओढलेली होती. मात्र डान्सबार ही चैन, पैशांची मस्ती होती व आहे. झटपट पैसे कमावण्याचा मार्ग म्हणून काही तरुणी हेतूत: या व्यवसायात आल्या होत्या. त्यामुळेच बंदी लागू झाल्यावर त्या विरोधात संघटीत झालेल्या बारबाला विरोधाकरिता रस्त्यावर उतरल्या होत्या. डान्सबार बंदीने आर. आर. पाटील यांना वलयांकित केले. मात्र पोलीस दलातील अनेकांचा या मलईदार मनोरंजनाला छुपा पाठिंबा होता. त्यामुळेच बंदीच्या वरवंट्याखाली हा व्यवसाय पूर्णपणे बंद झाला नाही. आता तर कमकुवत बाजू मांडल्याने जवळपास पूर्ण निर्बंधमुक्त झाला आहे. 'मियाँ बिबी राजी तो क्या करेगा काझी', अशी सरकारची या निर्णयामुळे अवस्था झाली आहे.

Web Title: Why it is difficult for government to ban Dance Bars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.