चंद्र हवा, चंद्र हवा... माणसाला चंद्र का हवा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2023 08:47 AM2023-08-18T08:47:49+5:302023-08-18T08:48:40+5:30

चंद्र हा मानवतेसाठी दुसऱ्या जगामध्ये प्रगती साधण्याचे पहिले पाऊल असून, चंद्रापासून मंगळापर्यंत आणि त्याहीपलीकडे मग जाता येईल.

why does man want the moon | चंद्र हवा, चंद्र हवा... माणसाला चंद्र का हवा?

चंद्र हवा, चंद्र हवा... माणसाला चंद्र का हवा?

googlenewsNext

साधना शंकर, निवृत्त केंद्रीय राजस्व अधिकारी

२३ ऑगस्ट २०१३ रोजी शुद्ध पक्षातील सप्तमीचा चंद्र आकाशात असेल. पृथ्वीवरून त्याचा ४१ टक्के प्रकाशित भाग आपल्याला पाहता येईल. त्याच दिवशी भारताचे चंद्रयान चंद्रावर उतरण्याचा (यशस्वी प्रयत्न करेल! श्रीहरीकोटाहून जीएसएलव्ही मार्क ३ (एल व्ही एम ३) या वाहनातून १४ जुलैला चंद्रयानाचे उड्डाण झाले. त्याचे चंद्रावरील अवतरण भारताच्या अवकाश मोहिमेत एक नवे दालन उघडून देणार आहे.

चंद्रयानासमोर तीन महत्त्वाची उद्दिष्टे आहेत. पहिले चंद्रावर अलगद उतरणे, रोव्हर प्रज्ञानची चांद्र प्रदेशांत भ्रमंती आणि तेथे वैज्ञानिक प्रयोग करणे. २३ ऑगस्टला चंद्रयान यशस्वीरीत्या चंद्रावर उतरल्यानंतर अमेरिका, रशिया आणि चीन या देशांच्या प्रभावळीत भारत जाऊन बसेल. चंद्रावर उतरल्यावर एक चांद्र दिवसाचे काम होईल. पृथ्वीवरचा हा काळ १४ दिवसांचा असतो.

या मोहिमेतून तीन वैज्ञानिक उद्दिष्टे साध्य करावयाची आहेत. पहिले म्हणजे ल्युनार सोडियमचा पहिला जागतिक नकाशा प्राप्त करणे, चंद्रावरील विवरांविषयी आणखी माहिती मिळवणे, तसेच तेथे पाणी असल्यास ते शोधणे.

भारताच्या अवकाश क्षेत्राचा प्रवास लक्षात घेण्याजोगा आहे. इस्रोचे भक्कम अधिष्ठान त्याला लाभले आहे. इस्रोची कहाणी ही लवचिकता, अभिनवता आणि सहकार्याची कहाणी आहे; आणि त्याला आलेल्या ९५ टक्क्यांहून अधिक यशामुळे खासगी क्षेत्राला भरभराटीस येण्यास संधी मिळाली. देशात १० स्टार्ट अप्सपासून सुरुवात झाली. त्यांची संख्या आता १०० आहे. देशाच्या अवकाश प्रकल्पात जवळपास १२ कोटी डॉलर्सची भांडवली गुंतवणूक झाली आहे. यान आकाशात सोडण्याच्या वाहनाची रचना, ते अवकाश प्रतिमा चित्रणापर्यंत हा प्रवास दिसतो. 'स्कायरूट एरोस्पेस' आणि 'पिक्सल' यांसारख्या भारतीय स्टार्ट अप्सनी अवकाश क्षेत्रातील विविध भागांत पदार्पण केले आहे.

जगभरातच खासगी क्षेत्राला अवकाशामध्ये स्वारस्य आहे. इलॉन मस्क यांच्या 'स्पेस एक्स' ने पुन्हा वापरता येईल, असे अवकाशयान तयार करण्याची कल्पना पुढे आणली, तसेच स्टारलिंक उपग्रहाद्वारे इंटरनेट सेवा दिली. जेफ बेजोस यांच्या 'ब्ल्यू ओरिजिन' ने प्रवासी आणि मालवाहतुकीकडे लक्ष दिले आहे. नासाच्या आर्टेमिस चंद्रमोहिमेला ही कंपनी तेथे उतरण्यासंबंधीच्या सुविधा पुरवत आहे. रिचर्ड ब्रॅन्सन यांची व्हर्जिन गॅलॅक्टिक ही कंपनी अवकाश पर्यटनावर भर देत आहे.

अवकाशात उद्योग क्षेत्रासाठी अनेक नव्या संधी आहेत. पर्यटन हे त्यातले एक आणि पृथ्वीवरचे जीवन अधिक चांगल्या दर्जाचे करता येण्यासाठी त्याचा उपयोग करून घेणे हे दुसरे. पृथ्वीच्या निरीक्षणात अवकाश क्षेत्र खूप महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. उदाहरणार्थ जमिनीचे नकाशे तयार करणे, हवामानातील बदलांकडे लक्ष ठेवणे, नैसर्गिक आपत्तींची आगाऊ सूचना देणे आणि नैसर्गिक साधन संपत्ती अधिक चांगल्या रीतीने वापरणे यासाठी अवकाश क्षेत्राचा उपयोग होऊ शकेल. उपग्रहाच्या माध्यमातून सर्व प्रकारचे दिशा दर्शन सुरक्षित होईल, त्याचप्रमाणे इंटरनेट सुविधा दूरवर पोहोचून डिजिटल तफावत दूर होण्यासही मदत होईल. 

स्वायत्त अवकाश वाहने विकसित करणे, शोधमोहिमा सुलभ करण्यासाठी अनुकृती आणि डिजिटलचा दुहेरी वापर साध्य होणे यासह कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा अॅनॅलिटिक्सचा अवकाश क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वापर होईल. या सगळ्या प्रवासात चंद्र महत्त्वाचा असल्यामुळे चंद्रयान महत्त्वाचे आहे.

चंद्रावर पाणी सापडले तर, पुढील मोहिमांसाठी त्याचा मोठा आधार होईल. इल्मेनाइट हे एक चांद्र संयुग असून त्याच्या विघटनातून लोह टिटानियम तसेच प्राणवायू मिळवता येईल. चंद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या रिगोलियमध्ये मॅग्नेशियम, अॅल्युमिनियम, सिलिकॉन आणि लोह आहे. त्याचा उपयोग करून चंद्रावर किंवा अवकाशात काही पायाभूत गोष्टी उभ्या करता येतील. चंद्र हा मानवतेसाठी दुसऱ्या जगामध्ये प्रगती साधण्याचे पहिले पाऊल असून चंद्रापासून मंगळापर्यंत आणि त्याही पलीकडे मग जाता येईल. 

या प्रगतीत आपला रस्ता काढत भारत पुढे जातो आहे. मंगळ यान मोहिमेला २०२४ मध्ये गती येईल आणि गगन यान हे पहिले माणसांना घेऊन जाणारे अवकाश यान. २०२५ मध्ये अवकाशात झेपावेल.

(लेखातील मते व्यक्तिगत)

 

Web Title: why does man want the moon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.