आम्ही भान का विसरतो ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 12:55 PM2020-03-24T12:55:11+5:302020-03-24T12:56:33+5:30

मिलिंद कुलकर्णी कोरोना विषाणूशी सारे जग लढा देत असताना आणि आम्ही भारतीय लोकदेखील समर्थ आणि सशक्तपणे मुकाबला करीत असताना ...

Why do we forget the idea? | आम्ही भान का विसरतो ?

आम्ही भान का विसरतो ?

googlenewsNext

मिलिंद कुलकर्णी
कोरोना विषाणूशी सारे जग लढा देत असताना आणि आम्ही भारतीय लोकदेखील समर्थ आणि सशक्तपणे मुकाबला करीत असताना काही मोजक्या मंडळींच्या अविवेकी कृत्यामुळे धोकेदायक स्थिती निर्माण होऊ पहात आहे. सामाजिक भान आम्हाला कधी येणार असा प्रश्न यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
जनता संचारबंदी पाळून संयम आणि संकल्पाचा परिचय द्यावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्याला भारतीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देखील दिला. ही जनता संचारबंदी का, याविषयी कारणमिमांसा पंतप्रधानांनी राष्टÑाला उद्देशून केलेल्या भाषणात केली होती. भारतीय जनतेने त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सायंकाळी ५ वाजता टाळ्या, थाळ्या वाजवून शंखनाद, घंटानाद केला. कोरोनाशी मुकाबला करणाऱ्या डॉक्टरांपासून तर सगळ्या घटकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबविला. आणि त्यात संपूर्ण देश सहभागी झाला. ही वेगळी अनुभूती होती. कोरोनाशी लढण्यासाठी देश सज्ज असल्याचे चित्र यानिमित्त निर्माण झाले. मात्र रात्री ९ वाजेनंतर कोरोनावर विजय मिळविल्याचा आनंद साजरा केल्यासारखी गर्दी रस्त्यांवर दिसून आली. लॉकडाऊन आणि संचारबंदी जारी केली असतानाही सोमवारी भाजीबाजारापासून तर बँकापर्यंत रांगा लागलेल्या दिसून आल्या. कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे, हे विसरुन आम्ही वागत आहोत.
पंतप्रधानांच्या जनता संचारबंदी व टाळ्या वाजविण्याच्या उपक्रमातून जनतेला कोरोनाविषयी लढण्याचे गांभीर्य आणि मानसिकता असे दोन्ही जाणवले, हा फार मोठा फायदा होता. परंतु, त्या उपक्रमाची खिल्ली उडविण्यात काही महाभाग होतेच. अर्थात महात्मा गांधी यांनी काढलेली दांडीयात्रा आणि मूठभर मिठ उचलण्याचा प्रयोग, सविनय कायदेभंग, विदेशी कपड्यांची होळी अशा प्रयोगांची खिल्ली उडविणारी मंडळी तेव्हाही होतीच आणि आताही आहेच. त्याच पंक्तीतील ही मंडळी आहे, हे दिसून आले.
कोरोनाचे संकट हे सामान्यांच्या सहभागाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, ही जाणीव असल्याने पंतप्रधानांनी ‘जनता संचारबंदी’चा उपक्रम राबविला. त्यात कोणताही पक्ष, व्यक्तीचे स्तोम माजविण्याचा प्रयत्न नव्हता. परंतु, काही उतावीळ महाभागांनी ‘मोदीं’चा जयजयकार करीत विजयी रॅली काढली. अशा प्रकाराने मूळ उपक्रमाचे गांभीर्य हरवते, हे तरी मोदीप्रेमी मंडळींनी लक्षात घ्यायला हवे.
सगळ्यात गंभीर प्रकार म्हणजे रावेरमधील जातीय दंगल. कोरोनाचे संकट समोर असतानाही आम्ही जाती-धर्माचे जोखड घेऊन एकमेकांची डोकी फोडत आहोत, हे कशाचे लक्षण आहे? कोरोनाचे संकट हे जात-धर्मापलिकडचे संकट असताना त्याच्याशी लढण्याऐवजी आम्ही एकमेकांविरुध्द लढून शक्तीपात करीत आहोत. संचारबंदी, लॉकडाऊनसारख्या निर्बंधाचे पालन करण्यात व्यग्र असणाºया महसूल व पोलीस प्रशासनाचे कामदेखील अशा दंगलींमुळे वाढत आहे. जखमींवर उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणेला प्रयत्न करावे लागले. कोरोना राहिले बाजूला आणि सगळ्यांना दंगल काबूत आणण्यासाठी झटावे लागले. संकटाचे गांभीर्य आणि सामाजिक भान नसल्याचा हा परिपाक आहे.

Web Title: Why do we forget the idea?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.