मोदींना नोकरशहा सोडून जात आहेत.. ते का?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 08:05 AM2022-03-03T08:05:50+5:302022-03-03T08:06:33+5:30

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी निवृत्तीची इच्छा व्यक्त केली; पण त्यांचा राजीनामा स्वीकारायला पंतप्रधानांनी नकार दिल्याचे समजते!

why burecaureate are leaving modi govt and its analysis | मोदींना नोकरशहा सोडून जात आहेत.. ते का?

मोदींना नोकरशहा सोडून जात आहेत.. ते का?

Next

हरीश गुप्ता

पंतप्रधान कार्यालयात रोचक म्हणता येईल असा खांदेपालट होत आहे. नोकरशहा त्यावर काही बोलायला तयार नाहीत. वरिष्ठ सल्लागार अमरजित सिन्हा यांचा कार्यकाळ ऑगस्ट २०२१ मध्ये संपणार होता. परंतु सात महिने आधीच त्यांनी अचानक पंतप्रधान कार्यालयातून बाहेर पडणे पसंत केले. गतवर्षीच मुख्य सल्लागार पी. के. सिन्हा यांनी नोकरी सोडली होती. या कार्यालयात येण्यापूर्वी सिन्हा मंत्रिमंडळ सचिव होते. त्यांना दिल्लीच्या नायब राज्यपालपदी बसवले जाईल, अशी अफवा पसरली होती.  पण त्याला वर्ष झाले, हे साहेब अजूनही आराम करत आहेत. आता पंतप्रधानांचे सल्लागार म्हणून नेमले गेलेले भास्कर कुलबे यांनी राजीनामा दिलाय. आधी ते पंतप्रधान कार्यालयात सचिव होते. त्यांना निवृत्त होऊ दिले गेले. काही महिन्यांनंतर २०२० साली त्यांना पंतप्रधानांचे सल्लागार म्हणून नेमले गेले. परंतु अचानक त्यांनीही राजीनामा दिला. वर्षभरात तीन ज्येष्ठ अधिकारी सोडून जाऊनही त्यांच्या जागा भरण्यात आल्या नाहीत हे विशेष! 

पंतप्रधानांचे प्रमुख सल्लागार पी. के. मिश्रा सरकारमध्ये मनुष्यबळावर होणारा खर्च कमी झाला पाहिजे या मताचे आहेत. त्याची सुरुवात पंतप्रधान कार्यालयापासूनच करण्यात आली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल ७७ वर्षांचे आहेत. त्यांनीही वयाचे कारण देत निवृत्तीची इच्छा व्यक्त केल्याचे खात्रीशीरपणे समजते. पण त्यांचा राजीनामा स्वीकारायला पंतप्रधानांनी नकार दिल्याची चर्चा आहे. २०१९ मध्ये मोदी लोकसभेत मोठा विजय संपादून आले. तेव्हा त्यांचे प्रमुख सचिव म्हणून नृपेंद्र मिश्रा यांना नियुक्ती मिळाली. पण काही महिन्यांतच तेही सोडून गेले.

नितीश कुमार यांना कोणीच वाली नाही

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार सध्या बरेच चिंतेत आहेत. २०२० च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरून संयुक्त जनता दल दुसऱ्या क्रमांकावर गेल्याने ‘सुशासन बाबू’ आता काय करावे बरे? अशा चिंतेत आहेत. उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक जिंकली, तर बिहारमध्ये अन्य पक्ष फोडून सरकार तयार करायला भाजपला वेळ लागणार नाही. 

या पार्श्वभूमीवर नितीशकुमार यांचे नाव जुलै २०२२ मध्ये होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे उमेदवार म्हणून पुढे आले. असे म्हणतात, की निवडणूक डावपेच तज्ज्ञ प्रशांत किशोर हे त्यामागे होते. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव मुंबईत उद्धव ठाकरे यांना चार तास भेटले. त्यानंतर ही बातमी पसरली. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी या भेटीत राष्ट्रपती निवडणुकीची चर्चा झाल्याचा  इन्कार केला. या भेटीत राऊत पूर्णवेळ सहभागी होते. बिगर भाजपा गोटात असलेली नेतृत्वाची पोकळी भरण्यासाठी नितीश यांनी दिल्लीला जावे, असे प्रशांत किशोर यांना वाटते. पण राजकीय निष्ठा विवाद्य असल्याने नितीशना स्वीकारायला कोणी तयार नाही.

जयशंकर यांची गुप्त रशियावारी 

परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर हे मोदी यांच्या सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीचे एकमेव असे सदस्य आहेत, की फार कोठे बाहेर दिसत नाहीत. त्यांचे इतर सहकारी माध्यमांशी बोलतात, पण जयशंकर माध्यमांसमोर फारसे येत नाहीत. त्यांना एकांत आणि खासगीपणा फार प्रिय आहे. ते शांतपणे आपले काम करत राहतात. त्यामुळेच की काय, ते गेल्या आठवड्यात रशियाला जाऊन आले, हे त्यांच्या खात्यात किंवा बाहेर कोणाला कळलेही नाही.

पंतप्रधानांनी दिलेल्या कामगिरीवर ते हवाई दलाच्या खास विमानाने गेले होते. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्याशी मोदी यांचे बोलणे झाल्यानंतर त्यांनी जयशंकर यांना तिकडे पाठविल्याचे सांगण्यात येते. या अल्पकालीन मॉस्को भेटीत काय चर्चा झाली, हे कळले नाही. दिवसभरात सगळे आटोपून जयशंकर मध्यरात्री साऊथ ब्लॉकमध्ये दाखलही झाले. त्यांचा हा दौरा अत्यंत गुप्त ठेवण्यात आला. काहीही तपशील कोणालाही दिला गेला नाही. युक्रेनमध्ये हजारो विद्यार्थी अडकून पडल्याने त्यांची सुरक्षितता लक्षात ठेवून भारताला पावले उचलावी लागत आहेत.

केजरीवाल का चमकताहेत? 

पंजाबची निवडणूक आपणच जिंकणार, या आत्मविश्वासातून ‘आप’चे निमंत्रक अरविंद केजरीवाल सध्या चमकत आहेत. राजकीय पंडित काही म्हणोत, पंजाबात ‘आप’चीच सरशी होणार असे त्यांनी परवाच एका कायदेतज्ज्ञाला त्याच्या घरी जाऊन सांगितले म्हणे. राज्यात ११७ पैकी ८० जागा “आप”ला मिळतील, असा त्यांचा कयास आहे. राहुल गांधी यांच्या एका निकटवर्तीय नेत्याने काँग्रेस ४० पर्यंत जाईल असे त्यांना सांगितले आहे. अकाली २० च्या पुढे जाणार नाहीत, असे तो नेता सांगतो. मिळणाऱ्या माहितीनुसार आप पंजाबात सर्वात मोठा पक्ष ठरण्याची चिन्हे आहेत.

Web Title: why burecaureate are leaving modi govt and its analysis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.