कोण म्हणतं, बायकांना क्रिकेटमधलं काही कळत नाही?

By Meghana.dhoke | Published: March 28, 2023 07:34 AM2023-03-28T07:34:40+5:302023-03-28T07:34:46+5:30

मंदिरा बेदीच्या नूडल्स स्ट्रॅपने गाज(व)लेल्या एक्स्ट्रा इनिंगचा काळ संपला आहे, आता महिला क्रिकेटची नवी इनिंग सुरू झाली आहे आणि चित्र आश्वासक आहे!

Who says women don't know anything about cricket? | कोण म्हणतं, बायकांना क्रिकेटमधलं काही कळत नाही?

कोण म्हणतं, बायकांना क्रिकेटमधलं काही कळत नाही?

googlenewsNext

- मेघना ढोके

मंदिरा बेदीच्या ‘ग्लॅमर’ने गाजलेली एक्स्ट्रा इनिंग ते महिला आयपीएल अर्थात डब्ल्यूपीएलची खरीखुरी ‘इनिंग’ हा २००३ ते २०२३ पर्यंतचा साधारण वीस वर्षांचा प्रवास. मंदिरा बेदीच्या नूडल्स स्ट्रॅपने गाज(व)लेल्या क्रिकेट पलीकडच्या ‘एक्स्ट्रा’ मसाल्याच्याच चर्चा रंगल्या होत्या तेव्हा. ताज्या मौसमात आयपीएलमध्ये खेळलेल्या अनेक खेळाडू तेव्हा जन्मालाही आलेल्या नसाव्यात. वन-डे क्रिकेटला ‘पैजामा क्रिकेट’ आणि पुढे आयपीएलला ‘मसाला क्रिकेट’ म्हणून नावं ठेवली गेली तेव्हाही आपण कधीतरी आयपीएल खेळू असं स्वप्न पाहणंही यातल्या अनेकींच्या कल्पनेतही नसेल. मुळात क्रिकेट हा पुरुषी खेळ हीच धारणा. कॉमेण्टेटर म्हणून महिला काम करू लागल्या तेव्हाही चर्चा रंगली होती की ‘बायकांना कुठं क्रिकेट कळतं?’ मिड ऑफ-मिड ऑनमधला फरक तरी बायकांना सांगता येईल का, असं म्हणत ही चर्चा कायमच सिली पॉइण्टवर येऊन पोहोचत असे..

तो काळ आणि काल मुंबई इंडियन्सने जिंकलेला पहिलावहिला डब्ल्यूपीएलचा किताब. मुळात देशोदेशीचे खेळाडू रीतसर विकत घ्यायचे आणि त्यातून आयपीएलची जत्रा भरवायची हेच सुरुवातीला अनेकांच्या पचनी पडले नव्हते. त्यात आयपीएलचे स्वरूप टोकाचे प्रोफेशनल, ‘हायर ॲण्ड फायर’ तत्त्वावर चालणारे! खेळाडूंवर कोट्यवधीच्या बोली लागल्या, प्रक्षेपणासह जाहिरातींचे बजेट काही कोटी रुपयांच्या घरात पोहोचले म्हणून टीकाही झाली. मात्र, दुसरीकडे हेही पाहायला हवे की आयपीएलने क्रिकेट मोठ्या शहरांतून आधी लहान शहरांत आणि पुढे गावांपर्यंत झिरपत नेले. गावखेड्यातले खेळाडू किमान आयपीएलचे तरी स्वप्न पाहू लागले.

तेच चित्र महिला आयपीएलच्या निमित्तानेही दिसले. आयपीएल खेळण्यासाठी इच्छुक असलेल्या काही हजार मुलींनी यंदा अर्ज केले होते. त्यातल्या काहीच निवडल्या गेल्या, त्यापैकी काहींनाच उत्तम पैसे मिळाले. विदेशी महिला खेळाडूही नियमाप्रमाणे संघात दाखल झाल्या. प्रत्येक संघाच्या प्रशिक्षकपदीही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या खेळाडूंचीच नियुक्ती झाली. एरव्ही पाहायला (पुरुष क्रिकेटच्या) तुलनेत अत्यंत संथ वाटणारे महिला क्रिकेट या पहिल्याच मौसमात वेगवान होताना दिसले. इसाबेल वांगने केलेल्या हॅटट्रिकपासून ते ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या अत्यंत चपळ, प्रोफेशनल खेळापर्यंत, हरमनप्रीतचे नेतृत्व ते दीप्ती शर्मा, राधा यादव यांच्यासह अनेकींनी केलेली उत्तम कामगिरी ही या मौसमाची जमेची बाजू ठरली.  प्रोफेशनल-वेगवान क्रिकेटची झलक, तंत्रशुद्ध फटके आणि क्रिकेटचे नजाकतदार सौंदर्यही या मौसमात दिसले. क्रिकेट हे ‘क्रिकेट’ आहे असे वाटावे आणि खेळाडू बाई आहे की पुरुष याचा विसर पडावा असे काही मोजके सुंदर क्षण या महिला आयपीएलने दिले.

अर्थात, काही ठिकाणी नवखेपणाही दिसलाच. प्रोफेशनल क्रिकेट ‘पाहण्याची’ सवय असलेल्या प्रेक्षकांना काही गोष्टी खटकल्या. नावाजलेल्या खेळाडूंनी केलेल्या अत्यंत क्षुल्लक चुका, रन आऊट होतानाचे घोळ, प्रेशर हाताळताना उडालेली दाणादाण, त्यातून झालेल्या चुका हे फार होते. तिथे सुधारणेला प्रचंड वाव आहे. पुरुष खेळाडूंएवढा मेहनताना घेता तर क्रिकेटही त्याच दर्जाचे खेळा हा आग्रह महिला खेळाडूंकडे भविष्यात धरला गेला तर तोही काही अनुचित ठरणार नाही. तरीही ‘पहिला’ हंगाम, पहिल्यांदाच खेळवण्यात आलेली महिला क्रिकेटपटूंची मोठी स्पर्धा, आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत भारतीय खेळाडूंनी सिद्ध केलेला आपला दर्जा हे सारेच ‘कमाई’च्या यादीत नोंदवले पाहिजे. या अनुभवाचा फायदा घेऊन भारतीय महिला क्रिकेट संघ मोठी आयसीसी स्पर्धा, विश्वचषकात आजवर झालेल्या हाराकिरीवर मात करेल आणि त्यासोबतच महिला क्रिकेटमध्ये अधिक पायाभूत सोयी येतील, दर्जा अधिक उत्तम होईल अशी आशा ठेवायला हरकत नाही. एक्स्ट्रा इनिंगचा काळ संपला आहे, आता महिला क्रिकेटची नवी इनिंग सुरू झाली आहे..  पहिला मौसम तरी ‘हिट’ ठरला हे नक्की.

Web Title: Who says women don't know anything about cricket?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.