पांढरीशुभ्र साडी, डोक्यावर पदर.. आवाजात मादक ठसक्याची आग!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 08:41 AM2022-12-12T08:41:49+5:302022-12-12T08:42:10+5:30

तमाशाच्या रांगड्या फडातून लावणीला बाहेर काढून बैठकीत आणण्याचे आणि प्रतिष्ठा मिळवून देण्याचे श्रेय नि:संशय सुलोचना चव्हाण यांनाच दिले पाहिजे! 

white saree, layer on the head.. Fire of intoxicating sound of Sulochana Chavan | पांढरीशुभ्र साडी, डोक्यावर पदर.. आवाजात मादक ठसक्याची आग!

पांढरीशुभ्र साडी, डोक्यावर पदर.. आवाजात मादक ठसक्याची आग!

Next

- संजीव साबडे, ज्येष्ठ पत्रकार

लावण्य आणि शृंगाराचा ठसठशीतपणा तितक्याच ठसकेबाज पद्धतीने मांडताना सात्विक सादरीकरण खूपच अवघड. त्यामुळे कैक वर्षे आपल्याकडे फडाची लावणी केवळ पुरुषांपुरतीच मर्यादित राहिली. धाट, भाषा, तिचा धारदारपणा आणि किंचित अप्रत्यक्ष चावट शारीर उल्लेख यामुळे ‘लावणी’ हा लोककला प्रकार घराच्याच नव्हे, तर गावाबाहेरच्या तंबूपुरता मर्यादित राहिला. लावणीला फडातून बाहेर काढून बैठकीत आणण्याचे आणि प्रतिष्ठा मिळवून देण्याचे कामे अनेक गायिकांनी केले असले तरी त्याचे प्रामुख्याने श्रेय सुलोचना चव्हाण यांनाच दिले जाते. 

लावणी सम्राज्ञी  म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुलोचनाबाईंच्या धारदार आवाजाचा ठसका कायम कानात रुंजी घालत राहील. उषा मंगेशकर, आशा भोसले, रोशन सातारकर, सुरेखा पुणेकर, शोभा गुर्टू, अलीकडचा तरुण आवाज बेला शेंडे अशा जवळपास सर्व मराठी गायिकांनी अनेक लावण्या म्हटल्या आहेत. त्या लोकप्रियही झाल्या आहेत. पण लावणी आणि सुलोचनाबाई यांचे कायम अतूट नाते राहिले, ते त्यांच्या आवाजामुळे. कळीदार कपुरी पान, पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, मला हो म्हणतात लवंगी मिरची, पाडाला पिकलाय आंबा, सोळावं वरीस धोक्याचं, खेळताना रंग बाई होळीचा, कसं काय पाटील बरं हाय का या त्यांनी गायलेल्या लावण्या आजही हृदयात स्थान करून आहेत. काही वेळा लावणी आठवते, पण गायिका माहीत नसते. सुलोचनाबाईंच्या लावणीबाबत तसे कधीच झाले वा होणार नाही. याचे कारण त्यांच्या आवाजातील ठसका आणि मादकता. ग्रामीण भागांतील लोकसंस्कृतीचा भाग असलेल्या ‘लावणी’ला शहरांत आणि मध्यमवर्गीय घराघरांत पोहोचवण्यात सर्वात मोठे योगदान सुलोचनाबाईंचे! पूर्वी बहुतांशी मराठी चित्रपट तमाशाप्रधान होते. एखाद दुसरी लावणी असायलाच हवी, असा आग्रह असायचा. अशा वेळी सुलोचना चव्हाण यांचेच नाव पुढे यायचे. सुमारे सहा दशके त्यांच्या लावण्यांनी रसिकांना वेडे केले. 

जेव्हा फडाची लावणी लोकप्रिय होती, तेव्हा सुलोचनाबाईंनी बसून, हातवारे व कोणतेही अंगविक्षेप न करता लावण्या सादर केल्या. पांढरीशुभ्र साडी, डोक्यावर पदर आणि चेहऱ्यावर विनम्र भाव असलेल्या सुलोचनाबाई मंचावर यायच्या. मात्र, त्यांनी गायला सुरुवात केली की सारा माहोल बदलून जाई. प्रेक्षकांतून फर्माईशी येत, शिट्ट्या येत, काही जण तर पैसे उडवत, समोर नाचायला सुरुवात करीत. पण गातानाही चेहऱ्यावर मार्दव असणाऱ्या या गायिकेने प्रेक्षकांच्या असल्या थेरांकडे कायम दुर्लक्ष केले. गाणी संपली की प्रेक्षकांना वाकून नमस्कार करून त्या तत्काळ रंगमंचाच्या मागे निघून जात. पारंपरिक बैठकीच्या लावणीतही अदाकारी असते. पण सुलोचनाबाईंनी तिलाही थारा दिला नाही. अदाकारीपेक्षा स्वतःच्या आवाजावर त्यांची भिस्त होती. त्यांची लावणी गातानाची छायाचित्रे पाहिल्यास त्या भक्तिगीत म्हणत असाव्यात, असाच भास होईल. जागी हो जानकी, न्याहारी कृष्णाची घेऊनी अशा भक्तिरस असलेल्या अनेक लावण्या त्यांच्या नावावर आहेत. 

आपल्याकडे लोककलेची बराच काळ उपेक्षा झाली.  सुलोचना चव्हाण यांच्या बाबतीतही तेच झाले. त्यांना यावर्षी म्हणजे कारकिर्दीच्या अखेरच्या काळात ‘पद्मश्री’ किताब दिला गेला. लहानसहान पुरस्कार खूप मिळाले; पण बड्या संस्थांनी त्यांच्या कार्याचा गौरव उशिराच केला. अर्थात सुलोचनाबाईंनी कधी त्याची पर्वा केली नाही. सुरुवातीच्या काळात कार्यक्रमाची बिदागीही अत्यल्प असे. काही जण तर ठरल्यापेक्षा कमी देत. त्यांचे पुत्र व प्रख्यात ढोलकीपटू विजय चव्हाण यांनी मात्र नंतर अशा मंडळींना दूर केले; तेव्हा कुठे सुलोचनाबाईंना थोडाफार पैसा दिसू लागला. बैठकीच्या, नृत्य व अदाकारीच्या लावणीला समाजात मान्यता मिळत असताना त्यासाठी आयुष्य घालविलेल्या सुलोचनाबाई आता हयात नाहीत, त्यांच्या लावणीचा ठसका मात्र कधीही उणावणार नाही! 
sanjeevsabade1@gmail.com

Web Title: white saree, layer on the head.. Fire of intoxicating sound of Sulochana Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.