कुठे गेली सभ्यता?
By Admin | Updated: September 14, 2015 00:46 IST2015-09-14T00:46:18+5:302015-09-14T00:46:18+5:30
दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी सत्तास्थानी नवागत असताना एकदा त्यांच्या एका जाहीर भाषणात विरोधकांना उद्देशून ‘नानी याद दिलायेंगे’ असे धमकीवजा

कुठे गेली सभ्यता?
दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी सत्तास्थानी नवागत असताना एकदा त्यांच्या एका जाहीर भाषणात विरोधकांना उद्देशून ‘नानी याद दिलायेंगे’ असे धमकीवजा आव्हान आल्यावरून बरीच खळबळ माजली होती. सदरचे आव्हान पंतप्रधानपदावरील व्यक्तीच्या मुखातून येणे त्या पदाचे मोल लक्षात घेता, असभ्य या श्रेणीतच गणले गेले व म्हणून टीकाही झाली. अर्थात त्यात दोष जरी राजीव गांधींचे ते भाषण तयार करून देणाऱ्याचा असला, तरी त्या दोषाचे धनीपण अखेर राजीव गांधी यांच्याचकडे गेले. अर्थात त्यानंतर मात्र असे असभ्य उल्लेख टाळले जाऊ लागले. पुढे गुजरात दंगलींमधील नरसंहारास नरेन्द्र मोदी यांना जबाबदार धरून सोनिया गांधी यांनी ‘मौत के सौदागर’ असे पुन्हा असभ्य श्रेणीत मोडणारे विशेषण बहाल केले. अगदी अलीकडे सोनियांनीच पंतप्रधान मोदींच्या घोषणांना हवाबाजी म्हणणे, त्याला लगेच मोदींनीही हवालाबाजी म्हणणे व त्यातून मग दगाबाजीसारख्या आणखी काही बाजींचा उभयतांकडून उल्लेख केला जाणे पाहिल्यानंतर कुठे गेली देशाच्या सार्वजनिक जीवनातील सभ्यता असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. एरवी राजधानी दिल्लीतील एखाद्या समारंभात सोनिया-मोदी समोरासमोर येतात तेव्हा दोहोंच्या वर्तणुकीत आणि देहबोलीत संपूर्ण सभ्यता आणि शालीनता प्रगट होत असते आणि तेच योग्यदेखील आहे. राजकीय विरोध आणि वैचारिक मतभिन्नता म्हणजे वैर वा शत्रुत्व नव्हे. ते तसे नसते म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांचे भाषण पंडित नेहरूंपासून ते थेट डॉ. मनमोहनसिंगांपर्यंतचे सारे पंतप्रधान लक्ष देऊन ऐकत असत व वाजपेयींच्या सूचनांचा विचारही करीत असत. अर्थात हे केवळ एक उदाहरण झाले. संसदेत वा राज्याच्या विधिमंडळात अशा सभ्यतेचे वारंवार दर्शन घडत असे. अशीच सभ्यता सार्वजनिक जीवनातही आढळून येत असे. मग हल्ली हल्ली हा जो विरोधाभास दिसून येतो तोे कशामुळे? इंग्रजीत ज्याला ‘प्लेइंग फॉर गॅलरी’ म्हणजे लोकरंजनासाठी तर नव्हे? तसे असेल तर आता लोकांवर याचा काहीही परिणाम होत नाही. सोनिया गांधींनी मौत का सौदागर म्हटल्यानंतरही गुजरातच्या मतदारांनी मोदींना तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपद बहाल केले व नंतर तर देशाने थेट पंतप्रधानपदीच त्यांना नेऊन बसविले. अर्थात सोनिया वा मोदी यांच्याकडून लोकांना सभ्यतेची अपेक्षा आहे म्हणून हे म्हणायचे. तशी अपेक्षा ठाकरे बंधंूंकडून कोण कशाला करेल? पण जमले तर त्यांनीही याचा विचार करावा. मनसेच्या आमदारांची संख्या तेरावरून एकावर का गेली याचा जरा विचार केला तर धाकट्या ठाकरेंना कदाचित झाला तर काही अर्थबोध होऊनही जाईल. असभ्य आणि वचावचा बोलण्याने लोक भले टाळ्या आणि शिट्ट्यांचा अहेर देत असतील, पण मते मात्र देत नाहीत.