हे भाषासत्र कधी थांबायचे?
By Admin | Updated: May 9, 2014 00:24 IST2014-05-09T00:24:06+5:302014-05-09T00:24:06+5:30
निवडणूक प्रचारातील आरोप-प्रत्यारोप फारशा गंभीरपणे घ्यायचे नसतात. राजकीय गरजांचा तो साधा विषय असतो. त्यातही निवडणुकांचा मोठा अनुभव पाठीशी असलेल्यांनी, तर त्या आरोपांचे तसे असणे समजूनच घेतले पाहिजे.

हे भाषासत्र कधी थांबायचे?
निवडणूक प्रचारातील आरोप-प्रत्यारोप फारशा गंभीरपणे घ्यायचे नसतात. राजकीय गरजांचा तो साधा विषय असतो. त्यातही निवडणुकांचा मोठा अनुभव पाठीशी असलेल्यांनी, तर त्या आरोपांचे तसे असणे समजूनच घेतले पाहिजे. परंतु, प्रत्येकच शब्दाचे राजकारण करायचे आणि ते आपल्या सोयीसाठी वापरायचे, यात आपल्या राजकारणातले बरेचजण आता वाक्बगार झाले आहेत. प्रियंका गांधींनी मोदींवर ते कमालीच्या हीन भाषेत प्रचार करीत असल्याची टीका उत्तर प्रदेशात केली. त्याचा रोख भाषेवर आणि प्रचाराच्या पातळीवर होता. ‘उत्तर प्रदेशातील शेतकर्यांना दिली गेलेली केंद्र सरकारची मदत राहुल गांधींनी त्यांच्या मामाच्या (म्हणजे आईच्या) घरून आणून दिली होती काय’ ही मोदींची भाषा सभ्यतेचे संकेत उधळून लावणारी होती. याआधीही निवडणूक प्रचाराची पातळी रसातळापर्यंत गेली असली, तरी त्यात पक्षाच्या पुढार्याने दुसर्याच्या आईची वा तिच्या माहेरची अशी संभावना केली नव्हती. प्रियंकाचा रोख मोदींच्या तशा वक्तव्यांवर होता. मोदींनी मात्र तिने प्रचाराबाबत वापरलेल्या हीन या शब्दाला ओढूनताणून आपल्या जातीपर्यंत पोहोचविले आणि ‘होय, मी हीन जातीतून आलो आहे’ असे सांगून आपल्या प्रचाराच्या पातळीतले हलकेपण आणखी नव्याने दाखवून दिले. ते करताना ते ज्या कोणत्या जातीचे आहेत त्या जातीला हीन म्हणून तिचाही त्यांनी अपमान केला. सुसंस्कृत राजकारणात जातीधर्माच्या भाषेचा वापर वर्ज्य असला, तरी आपले राजकारण अद्याप तेवढे सुसंस्कृत बनले नाही.
जात आणि धर्म यांना चिकटलेलेच नव्हे, तर त्यांचेच पक्ष होण्याचे ते क्षेत्र आहे. कोणता पक्ष कोणत्या जातीचा, जातीसमूहाचा वा धर्माचा हे आपल्यातील पोरासोरांनाही समजणारे आहे. पक्ष, पुढारी आणि राजकारण जोवर विचारांच्या, कामांच्या आणि कार्यक्रमांच्या पातळीवर उभे होत नाही, तोवर लोकशाहीची ही विटंबनाही अशीच चालणार. त्यातून पंतप्रधानपदाचे पट्टाभिषिक्त उमेदवार म्हणविणारे पुढारी जातीधर्माची भाषा जाहीरपणे वापरत असतील, तर त्या विटंबनेला नजीकच्या भविष्यात तरी अंत नाही. आपण कुणाचे शब्द उचलतो, ते उच्चारणार्याचे वय काय, त्या उच्चाराचा खरा अर्थ कोणता, आपण त्याचा लावलेला अर्थ काय आणि आपले वय काय यासारख्या साध्या व सभ्य गोष्टींचे ज्यांना भान नसते ती माणसे पुढारी म्हणून पाहावी लागणे हेही या विटंबनेचेच लक्षण आहे. फार पूर्वी आपल्या राळेगणसिद्धीचे अण्णा हजारे ‘मनमोहनसिंगांना अर्थशास्त्रातले काडीएवढेही कळत नाही’ असे म्हणून मोकळे झाले होते. तेव्हा अण्णांना अर्थशास्त्र कितपत कळते हे कुणी विचारले नाही आणि तसे ते विचारण्याचे कारणही (त्या प्रश्नाचे उत्तर ठाऊक असल्यामुळे) नव्हते. पुढे भाजपाच्या एका तरुण व उत्साही अध्यक्षांनी मनमोहनसिंगांना अर्थशास्त्रातले जराही समजत नसल्याचे जाहीरपणे सांगितले, तेव्हा ‘बापाचे ढगळ कपडे अंगात घालून बोलणार्या मुलाचे हे वर्तन आहे’ अशी टीका याच स्तंभातून आम्ही केली होती.
पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी कसे वागावे आणि कसे बोलावे, याविषयीच्या आपल्याही काही सुसंस्कृत अपेक्षा असाव्यात की नाही? त्या पूर्ण न करणार्यांची संभावनाही आपण योग्यरीत्या करावी की नाही? की २००२ चे सारे खूनसत्र सरसकट माफ केल्यासारखी क्लीन चिट त्याला आताच्याही हीन या शब्दच्छलासाठी द्यायची?... हे लिहून थांबत असतानाच एक दणकेबाज बातमी आली. प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदावर असलेल्या ममता बॅनर्जी या भांडखोर महिलेने नरेंद्र मोदींना चक्क ‘गाढव’ म्हटले. त्याआधी नरेंद्र मोदींनीही ममताबार्इंना ‘तू शेरनी आहेस, तर तुझ्या राज्यात एवढे बलात्कार कसे’ असा अत्यंत अस्थानी व फाजील प्रश्न विचारला होता, हेही येथे नमूद करण्याजोगे. खरा प्रश्न आपल्या राजकारणातले हे असभ्य भाषासत्र कधी व कुठे थांबायचे हा आहे... बद्रुद्दीन अजमल, प्रवीण तोगडिया, रामदास कदम, इम्रान मसूद, अमित शाह, बेनीप्रसाद वर्मा, गिरिराज सिंग, राज ठाकरे, आझमखान आणि अबू आझमी एवढ्या सार्यांनी त्या सत्रात भाग घेतल्यानंतर तरी ते थांबावे की नाही?... आपल्या राजकारणाने सभ्यतेची पातळी १९६७ पर्यंत चांगली सांभाळली. १९७१ च्या निवडणुकीपासून त्याने ती सोडायला सुरुवात केली आणि ७७ च्या निवडणुकीत ते पुरते त्या पातळीच्या फार खाली गेले. नंतरच्या काळात ते जराही वर आल्याचे दिसले नाही. नाही म्हणायला, राजीव गांधी, अटलबिहारी वाजपेयी, नरसिंहराव इत्यादींनी ती सावरण्याचा व तिला पूर्वीचे सभ्य स्वरूप प्राप्त करून देण्याचा त्यांच्या परीने प्रयत्न केला. त्यानंतरच्या काळात मात्र एकट्या सोनिया गांधी आणि मनमोहनसिंग यांचा अपवाद वगळता ती पातळी कोणालाही सांभाळता आल्याचे दिसले नाही.