द्वारकानाथ संझगिरी

कोविडच्या पिंजऱ्यातून क्रिकेट एवढ्या लवकर निसटेल असं मला वाटत नव्हतं. ह्या खेळात स्पर्श अपरिहार्य; मास्क लाऊन खेळता येत नाही. पण इंग्रजांनीच ‘बायो बबल’ तयार करून चक्क कसोटी क्रिकेट खेळवलं आणि जगाला पिंजरा कसा उघडायचा हे कळलं. भारताला आयपीएल नावाची गुहा उघडायची होती. इंग्लंडचा ‘तिळा तिळा दार उघड’ मंत्र वापरून आपण दुबईत गुहा उघडली. कारण गुहेतला ऐवज सगळ्यांना वाटून घ्यायचा होता.
सहा-सात महिन्यांनंतर आपण क्रिकेटच्या वार्षिक उरुसामध्ये क्रिकेटपटूंना डोळे भरून पाहतोय. या उरुसाचं आकर्षण क्रिकेटशौकिनांना असतं ते उंच उंच षटकार, वगैरेसाठी ! सध्या इतके षटकार मारले जात आहेत की, ते साठवून ठेवायची माझ्या डोळ्यांची क्षमता आता तुटपुंजी वाटायला लागली आहे. संजू सॅमसनच्या षटकारांना जागा दिली की डिव्हिलिअर्स पुढे सरसावतो. तेवढ्यात अनपेक्षितपणे तेवटिया एका षटकात ५ षटकार ठोकून जातो. मग ईशान किशन, पोलार्डचे षटकार डोळ्यात घुसू पाहतात. चौकार सध्या मध्यमवर्गीय झालाय. आणि एकेरी, दुहेरी धाव तर दारिद्र्यरेषेखाली गेलीय. काही फलंदाजांच्या नुसत्या बॅटस्पर्शाने चेंडू सीमापार जातो; आणि हा लेख लिहीपर्यंत विराट, धोनीच्या बॅटला चेंडू शिवायलाही तयार नाही. क्रिकेट हे असं असतं. कोविडच्या तीन महिन्यांनंतर स्टीव्ह स्मिथने पहिल्यांदा बॅट उचलल्यानंतर तो स्वत:शी म्हणाला, ‘अरे वा! बॅट कशी धरायची, ते मी विसरलो नाहीये!’- फलंदाजाला बॅट ही हुंगायला मिळायलाच हवी. सुनील आणि मिसेस अनुष्का विराट कोहलीच्या वादात हाच प्रश्न सनीलने मांडला होता. सुनीलवर विनाकारण टीका झाली.

स्मिथ, राहुल, मयांक, संजू, ईशान किशन, पोलार्ड, एबीडी असे खेळले की, कोविडच्या विश्रांतीचा त्यांना काही फरकच पडलेला नाही. एबीडीने बॅट हातात धरली की तो सेट होत असावा. कोविडकाळात या सर्वांनी स्वत:ला शारीरिक - मानसिकदृष्ट्या फिट ठेवण्यासाठी नक्कीच मेहनत घेतली असणार. काही पोटं सुटलेली दिसली; पण काही प्रचंड फिट वाटले. मयांक अग्रवालने कसोटी क्रिकेट गाजवलंय. पण तो वनडेत अपयशी ठरला होता. आजकाल हातावर पैशाची मोठी रेष उमटायची असेल तर कसोटीतली शतकं, धावा मदतीला येत नाहीत. ते दिवस सुनील गावस्करबरोबर संपले. २०११पासून आयपीएल खेळूनही मयांकचा ठसा उमटला नव्हता. यावर्षी तो दर्जाचा स्टॅम्प बरोबर घेऊनच उतरलाय. खेळलेल्या प्रत्येक फटक्यावर तो ते शिक्के मारत सुटलाय. पंजाबला जिंकायला फक्त २ धावा हव्या होत्या. २ धावा त्याने नुसत्या ढकलून काढल्या असत्या ना तरी प्रीती झिंटाच्या गालावरची खळी अधिक खुलली असती. खरं तर त्या मॅचमध्ये विजयाचा घास हा दिल्लीच्याच ताटात होता. त्यानेच तो तिथून पळवला, त्याचं तोंडही उघडलं होतं. फक्त आत ढकलताना त्याने एक चूक केली आणि तो घास मातीमोल झाला. नंतर राजस्थान रॉयल्स विरुद्ध त्याने ४५ चेंडूत शतक ठोकलं. पण त्यावेळीही तो घास तेवाटिया घेऊन गेला. पहिली चूक मयांक आयुष्यात पुन्हा कदाचित करणार नाही. तो हुशार, मेहनती आहे. मोठ्या दौºयावरून परतल्यावरही २४ तासाच्या आत नेटवर असतो. विपश्यना करतो. ‘आधी मन कोसळतं आणि मग शरीर’ असं आपण म्हणतो. दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये मोठा फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला आणि मग सुपर ओव्हरमध्ये त्याचं शरीरच कोसळलं. पण त्याआधी बहुतेक त्याचं मन कोसळलं असावं... पुढच्या उड्डाणासाठी या अफलातून सुरवातीचा त्याने फायदा उठवायला हवा.

संजू सॅमसनच्या दोन अर्धशतकांनंतर अचानक सर्वजण त्याच्याकडे उद्याचा धोनी म्हणून पहायला लागले आहेत. त्याने धोनीच्याच संघाविरुद्ध ३२ चेंडूत ७४ धावा कुटल्या तेव्हा ‘गेले ते आपले दिवस’ असं धोनी कदाचित मनातल्या मनात म्हणाला असेल. संजूचं टायमिंग एवढं सुंदर की, नळीतून साबणपाण्याचे फुगे उडवावे, तसा तो षटकार उडवत होता. शारजाहला व्हीव रिचर्डसने राजेंद्रसिंग घईचे यॉर्कर स्टेडियमबाहेर मारताना मी पाहिलेत. पण संजू सॅमसनला पाहताना मला षटकार ठोकणं ही गोष्ट वडापाव खाण्यापेक्षा सोपी वाटायला लागली. सॅमसनकडे सातत्य नव्हतं. त्याला जागं केलं विराट कोहलीने. विराटने त्याला विचारलं, ‘किती वर्षं क्रिकेट खेळायचंय तुला?’ तो म्हणाला, ‘किमान १० वर्षं!’- मग विराट त्याला म्हणाला, ‘मग तुझं आवडतं केरळी फूड विसर. १० वर्षांनंतर तुला जे हवं ते खा!’- संजूने यावर्षी कोविडच्या दिवसात नेमकं तेच केलं. अमल मनोहर या फिटनेस ट्रेनरकडे मेहनत घेतली. अमलने त्याच्या चार परीक्षा घेतल्या- वेग, ताकद, स्टॅमिना आणि चपळपणा ! प्रत्येक परीक्षेत संजू फेल! आयपीएलमध्ये दोन मॅचमध्ये मिळणाºया वेळेत याचा थकवा कमी होत नाही. ऊर्जा कमी पडते. थकलेल्या शरीराने तो पुढची मॅच खेळायला जातो, हे लक्षात आल्यावर अमलने संजूच्या शरीरावर - आहारावर मेहनत घेतली. त्याचा परिणाम आता आयपीएलमध्ये दिसतोय. एक-दोन गडगडाटाने कारकीर्द फुलत नाही. गडगडाट हा वारंवार व्हावा लागतो. तो झाला तर या मुलाचं भवितव्य उजळेल. आणि आपल्यालाही एक मोठी गुणवत्ता फुकट न गेल्याचं समाधान मिळेल. आणि हो, या गडगडाटाने कदाचित ऋषभ पंतलाही जाग येईल!


(हा स्तंभ ‘आयपीएल’दरम्यान दर शुक्रवारी प्रसिद्ध होईल)

( लेखक क्रीडा आणि चित्रपट समालोचक आहेत )

Web Title: When sixes are struck like eating Vadapav in IPL 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.