सायकली जेव्हा ‘स्मशानभूमी’त जातात; Use and Throw मुळे वाढलीय अनेक देशांची डोकेदुखी

By Rishi Darda | Published: October 16, 2021 06:09 AM2021-10-16T06:09:48+5:302021-10-16T06:10:09+5:30

चीन, जपानमधील अनेक शहरांत सायकलींचं प्रमाण इतकं वाढलं आहे की, सायकल थोडीशी बिघडली, की टाक भंगारात.. ही मानसिकताही खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

When bicycles go to the cemetery! | सायकली जेव्हा ‘स्मशानभूमी’त जातात; Use and Throw मुळे वाढलीय अनेक देशांची डोकेदुखी

सायकली जेव्हा ‘स्मशानभूमी’त जातात; Use and Throw मुळे वाढलीय अनेक देशांची डोकेदुखी

Next

>> ऋषी दर्डा

एक काळ होता, जेव्हा सर्वसामान्यांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वच लोकांमध्ये सायकलिंगची क्रेझ होती. सायकल घेण्याचं आणि सायकल चालवण्याचं वेडही प्रचंड होतं. नंतरच्या काळात ही क्रेझ कमी झाली आणि सायकल हे ‘गरिबांचं’ वाहन मानलं जाऊ लागलं. सध्या मात्र सगळ्या जगभरातच सायकलिंगची क्रेझ वाढते आहे. बलाढ्य, गर्भश्रीमंत लोकही कारपेक्षाही सायकलला प्राधान्य देत असल्याचं दिसतं. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी अनेक देशांत तर, सरकार स्वत:च सायकलिंगला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देत आहे. 

नेदरलँड्ससारखा देश आज सायकलींचा देश मानला जातो. या देशातील अनेक शहरांत सायकली आणि कार यांची संख्या जवळपास समान आहे. चीन, जपान यासारख्या शहरांतही सायकलींची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. अर्थात खास सायकलिंगसाठी वेगळे रस्ते, सायकल ट्रॅक, सायकल पार्किंगसाठी भल्यामोठ्या जागा, ‘सायकल पार्क्स’, सायकल शेअरिंग, कुठूनही कुठेही जाण्यासाठी सायकलींची खास सोय, शिवाय कुठूनही सायकल उचला आणि कुठल्याही केंद्रावर सोडण्याची मुभा.. त्यामुळे अनेक देशांत सायकलिंग फारच लोकप्रिय होत आहे. नेदरलँडसारख्या देशात तर, बऱ्याच ठिकाणी कारपेक्षा सायकलनं अधिक लवकर पोहोचता येतं. कारण खास सायकलींसाठी केलेले थेट रस्ते. मध्ये कुठला अडथळाच नाही. स्वयंचलित वाहनांना मात्र फिरुन, लांबून जावं लागत असल्यानं त्या त्या ठिकाणी कारपेक्षा सायकलीवर जाणं परवडतं आणि वेळही वाचतो.. त्या त्या देशांना, शहरांना त्याचा फायदा झाला, तिथलं प्रदूषण बऱ्याच मोठ्या प्रमाणावर कमी झालं पण, सायकलींचा एक मोठा धोकाही आता काही देशांना जाणवायला लागला आहे. 

चीन, जपानमधील अनेक शहरांत सायकलींचं प्रमाण इतकं वाढलं आहे की, सायकल थोडीशी बिघडली, की टाक भंगारात.. ही मानसिकताही खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कचरा जसा आपण एखाद्या जागी ‘डम्प’ करतो, तशा सायकली डम्प करण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्यामुळे ‘सायकलींची स्मशानभूमी’ (सायकल ग्रेव्हयार्ड) म्हणून हे भाग ओळखले जायला लागले आहेत. 

जपान हा इतका शिस्तशीर देश, पण या देशांतही लोकांनी फेकून दिलेल्या, टाकून दिलेल्या सायकलींमुळे तिथल्या सायकल स्मशानभूमींची संख्या वाढत चालली आहे. एकावर एक फेकलेल्या हजारो सायकली!..

अर्थात तरीही जपानसारख्या देशांनी सायकलींना प्रोत्साहन देण्याचं धोरण सोडलेलं नाही. तुम्हाला जर, सायकली लागत नसतील तर, ज्यांना गरज आहे, त्यांना या सायकली द्या, अशी मोहीम सुरू केली आहे. त्याचाही परिणाम होतो आहे आणि सायकल स्मशनाभूमीतील ‘मृत सायकलीं’ची संख्या कमी होऊ लागली आहे. 

लोकांनी सायकली फेकून किंवा टाकून देण्याचं जपानमध्ये आणखी एक कारण आहे.  घरात राहायला जागा अपुरी पडायला लागल्यामुळे आणि ‘बाहेर’ सार्वजनिक सायकली आणि वाहनांचे भरपूर पर्याय उपलब्ध असल्यामुळे ‘स्वत:ची सायकल’ हा पर्याय काहींनी बाजूला ठेवला आहे. आरोग्य आणि पर्यावरण याबाबत जपानमधील लोक खूपच जागरूक आहेत. इंधनाची बचत करुन आपलं शहर स्वच्छ ठेवण्याची इच्छाही जपानी लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसते. म्हणूनच साधारण साडेबारा कोटी लोकसंख्या असलेल्या या देशांतील सायकलींची संख्या आठ कोटीपेक्षाही जास्त आहे.  पण, सायकल स्मशानभूमींची वाढ झाल्यामुळे सरकारनंही ही गोष्ट अतिशय गांभीर्यानं घेतली आहे. 

जपानमधलं साइतामा हे शहर. या शहराची लोकसंख्या साधारण १२ लाखापेक्षा जास्त आहे.  केवळ या एकाच शहरात लोकांनी सत्तर हजारपेक्षा जास्त सायकली फेकून दिल्या आहेत. अर्थात लोकांनी सायकली फेकल्या आहेत, म्हणजे ते सायकलींचा वापर करीत नाहीत असं नाही. सायकलींच्या कचऱ्याची समस्या मात्र प्रशासनाला भेडसावू लागली आहे. त्यामुळे गरजूंना या सायकली देण्याचं आवाहन करताना स्वत:च अशा सायकली जमा करुन, त्या दुरुस्त करुन गरजू लोकांना द्यायला प्रशासनानं सुरुवात केली आहे. 

सायकलप्रेमींचा पुढाकार..

चीन, जपानसारख्या देशात सायकलींच्या स्मशानभूमीत वाढ होत असली, त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा कचरा जमा होत असला, तरी दुसऱ्या दृष्टीनं पाहिलं तर, ही चांगलीच घटना आहे, असं काही तज्ज्ञांना वाटतं. त्यांच्या मते, सायकलींचा वापर वाढल्यानं नव्या सायकली घेण्याचं आणि जुन्या सायकली टाकून देण्याचं प्रमाण वाढलं आहे. या सायकली दुरुस्त करून वापरता येऊ शकतात आणि ज्या दुरुस्त करण्यासारख्या नाहीत, त्यांची कायमस्वरुपी विल्हेवाटही लावली जाऊ शकते. ज्या ज्या शहरांत अशा फेकलेल्या सायकलींची संख्या मोठी आहे, त्या त्या ठिकाणी चीन आणि जपानच्या सरकारनं हे दोन्ही पर्याय वापरायला कधीचीच सुरुवात केली आहे. सायकलप्रेमी नागरिकांनीही याबाबत पुढाकार घेतला असून लोकांमध्ये जनजागृती करायला सुरुवात केली आहे. आपल्या अशा कृतीनं सायकल आणि सायकलस्वारांना ‘बदनाम’ करू नका, या त्यांच्या आवाहनाला लोकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे.

(लेखक लोकमत समूहाचे जॉईंट एमडी व एडिटोरियल डायरेक्टर आहेत.) 

Web Title: When bicycles go to the cemetery!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app