२ वर्षांच्या मुलाकडून आईचाच खून होतो तेव्हा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2024 07:28 IST2024-12-16T07:28:10+5:302024-12-16T07:28:14+5:30
दोन वर्षांच्या मोठ्या मुलानं ती गन उचलली आणि आपल्याच आईवर चालवली. तिच्यावर गोळ्या झाडल्या. क्षणार्धात ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि गतप्राण झाली!

२ वर्षांच्या मुलाकडून आईचाच खून होतो तेव्हा...
याच आठवड्यातली गाेष्ट. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील फ्रेस्नो स्ट्रीटचा परिसर. याच भागात एक जोडपं राहातं. अर्थातच त्यांनी लग्न केलेलं नाही. दोघं एकत्रच राहातात. यातल्या तरुणीचं वय आहे २२ वर्षे. दोन मुलांची ती आई आहे. तिचा मोठा मुलगा दोन-अडीच वर्षांचा, तर धाकटा आठ महिन्यांचा. त्यांच्या बेडरूममध्ये लोडेड गन उघड्यावरच पडलेली होती.
दोन वर्षांच्या मोठ्या मुलानं ती गन उचलली आणि आपल्याच आईवर चालवली. तिच्यावर गोळ्या झाडल्या. क्षणार्धात ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि गतप्राण झाली! दोन वर्षांच्या मुलाच्या हातून आपल्याच आईचा जीव गेला. या घटनेनं केवळ अमेरिकेतच नाही, तर अख्ख्या जगात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. अमेरिकेतलं गन कल्चर किती घातक पातळीवर पोहोचलं आहे, त्याला कोणताही रोक नाही, जो उठेल तो केव्हाही घातक शस्त्रास्त्रं घेतो, स्वत:कडे बाळगतो आणि वाट्टेल तसा त्याचा वापरही करतो.
शाळकरी मुलांकडून आपल्या मित्रांवर, आपल्या शिक्षकांवर गोळ्या झाडण्याचे आणि त्यांना मारण्याचे सर्वाधिक प्रकारही जगात सर्वाधिक प्रगत अमेरिकेतच होतात! या घटनेत ज्या तरुणीला आपला जीव गमवावा लागला, तिचं नाव जेसिन्या मीना आणि तिचा बाॅयफ्रेंड ॲण्ड्र्यू सँचेझ. त्याचं वय काय असावं? त्याचं वय आहे फक्त १८ वर्षे! याही मुद्द्यावरून अमेरिकेत आणि सर्वत्र सध्या चर्चा सुरू झाली आहे. कोणत्या वयात लग्न करावं, कोणत्या वयात शारीरिक संबंध ठेवावेत, कोणत्या वयात मुलं व्हावीत, खरोखरच आपल्या जबाबदाऱ्या पेलण्यास आपण केव्हा समर्थ होतो, त्यासाठीचं शारीरिक, मानसिक वय काय असावं?... स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला फरक समजून घेतलाच पाहिजे आणि त्यानुसार आपलं आचरण असलं पाहिजे, तशी त्यांची समज नसेल तर मोठ्यांनी किंवा कायद्यानं त्यांना अशा गोष्टींपासून परावृत्त करायला हवं.. या गोष्टीवरही आता घमासान चर्चा होते आहे.
या घटनेसंदर्भात पोलिस आता चौकशी करीत आहेत; पण त्यातून फारसं काही निष्पन्न होणार नाही, असाच तज्ज्ञांचा होरा आहे. कारण यासंदर्भात दोन गोष्टी महत्त्वाच्या. एकतर अमेरिकेत फोफावलेलं गन कल्चर. ते रोकण्याची सरकारचीच तयारी नाही. आजवर अशा प्रकारच्या अनंत घटना अमेरिकेत घडून गेल्या; पण त्यावर काहीही ठोस उपाययोजना झालेली नाही. दुसरी गोष्ट आहे स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातली सीमारेषा. ती पाळली गेलीच पाहिजे; पण त्याविषयीही अमेरिकेत कोणाला काहीच सोयरसुतक नाही. पण यावेळेचं प्रकरण अधिक गंभीर आहे. त्यामुळे यंदा तरी काही ठोस उपाययोजना अमेरिकेत केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या घटनेसंदर्भात पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झालं आहे, की जेसिन्या मीनाचा बॉयफ्रेण्ड ॲण्ड्र्यू सँचेझनं आपली लोडेड गन बेडरूममध्ये उघड्यावरच ठेवली होती. बालसुलभ औत्सुक्यानं मुलानं ती उचलली, त्याचा ट्रिगर दाबला आणि जवळच उभ्या असलेल्या आईच्या छातीत गोळ्या घुसल्या. ती जागीच कोसळली.. पोलिसांनी आता ॲण्ड्र्यूला ताब्यात घेतलं आहे आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात आशादायक एकच गोष्ट. अमेरिकेतील गन कल्चर आटोक्यात यावं, कोणालाही सहजपणे घातक शस्त्रास्त्रं मिळू नयेत, यासाठी खुद्द अमेरिकेतूनच वेळोवेळी मोठ्या प्रमाणावर ओरड झाल्यानं आणि जगभरातूनही टीकेचा भडीमार झाल्यानंतर अमेरिकेन सरकारनं यावर विचार करण्याचं ठरवलं आहे.
अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही या गन कल्चरसविरोधात आपली सहमती दर्शवली होती आणि सर्वसामान्य लोकांना घातक शस्त्रास्त्रं विकली जाताना, त्यावर कडक निर्बंध घातले जावेत, किमान त्यासंदर्भात चौकशी, तपासणी आणि गरज पाहूनच शस्त्रासत्रं विकली जावीत यासंदर्भातल्या एका आदेशावर या वर्षाच्या सुरुवातीलाच स्वाक्षरी केली होती.
या वर्षाच्या मार्च महिन्यातही हिंसाचाराच्या अशाच काही घटना घडल्या होत्या. त्यामुळे जो बायडेन व्यथित झाले होते आणि त्यांनी निष्पाप लोकांचे प्राण जाऊ नयेत, त्यासाठी शस्त्रास्त्रविक्रीचं धोरण अधिक कडक आणि कठोर केलं जावं, अशी अपेक्षा व्यक्त केली होती आणि त्याचा काही प्रमाणात पाठपुरावाही केला होता.
आता तरी जागं व्हा!..
घातक शस्त्रास्त्रं धोकादायक लोकांच्या, गुंडापुंडाच्या हातात सहजपणे पडू नयेत, विशेषत: लहान मुलांपर्यंत ही शस्त्रास्त्रे पोहोचू नयेत आणि शस्त्रास्त्र निर्मात्यांवरही अंकुश राहावा यादृष्टीनं जो बायडेन यांनी प्रयत्न चालवले होते. पण त्यांच्या प्रयत्नांनाही म्हणावं तेवढं यश आलं नाही. अमेरिकेत शाळकरी मुलांच्या हातातही सहजपणे घातक शस्त्रास्त्रं पडतात, ते वय किती खाली यावं? दोन वर्षाच्या मुलाच्या हातून जर आपल्याच आईचा खून होत असेल तर आता तरी जागं होण्याची वेळ आलेली आहे.