व्हॉट इज युवर चॉइस ?

By Admin | Updated: April 5, 2015 01:16 IST2015-04-05T01:16:33+5:302015-04-05T01:16:33+5:30

स्त्री-पुरुष भेदाभेद केल्याबद्दल अलीकडेच काही माजी कर्मचाऱ्यांनी फेसबुक टिष्ट्वटरविरुद्ध खटले भरले. सिलिकॉन व्हॅलीतील 'रेडिट' या न्यूज साइटची माजी कनिष्ठ भागीदार एलेन पाओने तक्रार केली आहे

What is your choice? | व्हॉट इज युवर चॉइस ?

व्हॉट इज युवर चॉइस ?

स्त्री-पुरुष भेदाभेद केल्याबद्दल अलीकडेच काही माजी कर्मचाऱ्यांनी फेसबुक टिष्ट्वटरविरुद्ध खटले भरले. सिलिकॉन व्हॅलीतील 'रेडिट' या न्यूज साइटची माजी कनिष्ठ भागीदार एलेन पाओने तक्रार केली आहे की, तिला वरिष्ठ भागीदार म्हणून बढती मिळाली नाही व नंतर तिची हकालपट्टी झाली. का? तर ती स्त्री आहे म्हणून. भारतात काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या पत्नी दिवं. सुनंदा पुष्कर यांच्याविरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच हीन पातळीची टीका केली होती. आज केंद्रीय राज्यमंत्री गिरिराज सिंह यांनी सोनियांच्या संदर्भात वर्णद्वेषाचे विधान केले आहे. गिरिराज, साक्षी महाराज वा निरंजना देवी यांच्यावर थेट कारवाई होत नसल्यामुळे ही मंडळी चेकाळली आहेत. शासनस्तरावरच या गोष्टी घडत असताना खासगी क्षेत्रात स्त्रियांचा 'माता, भगिनी, देवी' म्हणून उदोउदो करीत, प्रत्यक्षात मात्र त्यांना मागच्या रांगेतच ठेवायचे, ही आपली थोर परंपरा आहे! मुलीला जन्मण्यापूर्वीच मारायचे. मुलाला बोर्नव्हिटा नि मुलीला चहा. मुलाला पुण्या-मुंबईतल्या कॉलेजात घालायचे, मुलीला दहावीनंतर शाळेबाहेर काढायचे. कॉलेजात घातले, तर सातच्या आत तिने घरात यावे, अशी सक्ती करायची. ती प्रेमात पडली तर जात-धर्म-भाषेच्या भिंती उभ्या करून तिला 'सुरक्षित’ स्थळ बघून उजवायचे. दुर्दैवाने ती विधवा झाली, तर तिने भावना गोठवून टाकायच्या..!

'बीइंग सायरस’, 'कॉकटेल’, व 'फाइंडिंग फॅनी’ यासारखे सकस चित्रपट बनवणाऱ्या होमी अदजानियाने 'माय चॉइस’ नावाचा व्हिडीओपट बनवला असून, त्याचे निवेदन दीपिका पदुकोणचे आहे. दीपिकासह त्यात निम्रत कौर, फरहानची पत्नी केशभूषाकार अधुना अख्तर, चित्रपट समीक्षक अनुपमा चोप्रा प्रभृती ९९ जणींचे चेहरे दिसतात. लग्न करावे की करू नये, लग्नापूर्वी सेक्स करावा की करू नये, हा केवळ माझा चॉइस आहे, असे विचार त्यात व्यक्त करण्यात आले आहेत.

'स्वैराचारास निमंत्रण देणारा व्हिडीओ’ म्हणून संस्कृतीरक्षकांनी नाराजी प्रकट केली आहे. पण तो जगभरातील लाखो लोकांनी पाहिला असून, म्हणूनच ‘हॅऽऽ, फॅशनेबल स्त्रियांचे चाळे’ असे म्हणून त्याची वासलात लावता येणार नाही. विवाहबाह्य संबंध म्हणजे स्त्री-सक्षमीकरण नव्हे, अशी टीका सोनाक्षी सिन्हाने केली़ तरी या व्हिडीओचा भर स्त्रीला चुका करण्याचीही, म्हणजे निवड करण्याची संधी असली पाहिजे यावर आहे.

आज फ्रिडा पिंटोसारखी हॉलीवूड नटी 'गर्ल रायझिंग’ ही प्रचार मोहीम राबवते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा तिचे टिष्ट्वटरवरून कौतुक करतात. अमेरिकेतही 'लेट गर्ल्स लर्न’ असा प्रचार अजूनही करावा लागतो. भारतासारख्या देशात स्त्रियांचा आवाज दाबला जातो. रती अग्निहोत्रीलाही कौटुंबिक हिंसाचारास बळी पडावे लागते. खुद्द दीपिका इतकी निराशाग्रस्त होती, की तिला मानसोपचारतज्ज्ञाकडे धाव घ्यावी लागली.

एकेकाळी मॉडेल प्रतिमा बेदी जुहूच्या किनाऱ्यावर विवस्त्रावस्थेत धावली, तेव्हा खळबळ माजली. मीनाकुमारी युगात स्त्री शोकविव्हल असे. १९९५ नंतर स्त्रिया बोलू लागल्या़ उदारीकरणोत्तर काळात मोठ्या प्रमाणात शिकू लागल्या. मग नोकरी करीत उच्च पदांवर पोहोचू लागल्या. पण हे तंत्रज्ञानाचे, माध्यमांचे, परस्परांना जोडले गेलेले जग आहे. त्यामुळे एखाद्या दुकानाच्या चेंजिंग रूममध्ये स्त्रियांचे गुपचूप चित्रण केले जाते.

समाजमाध्यमांतून अनुष्का शर्माबद्दल आचरट शेरेबाजी केली जाते. गरीब स्त्रियांचा शारीरिक छळ व शोषण तुलनेने अधिक, तर उच्चशिक्षित घरातल्या मुलींचा मानसिक छळ जास्त. 'सखाराम बाइंडर’मधली चंपा आणि 'शांतता! कोर्ट चालू आहे’मधली बेणारे बाई म्हणूनच आठवते. आजची स्त्री पालक, कुटुंब, रिलेशनशिप, आॅफीस इथले ताणेबाणे सांभाळताना भोवंडून जात आहे. तिच्या मनावरच्या दडपणाचा पापुद्रा काढण्याच्या दृष्टीने 'माय चॉइस’सारखी अनेक पावले पडायला हवीत.

हेमंत देसाई

Web Title: What is your choice?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.