शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
2
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
3
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
4
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशकवाद्यांना कंठस्नान 
5
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
6
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
7
शेअर बाजाराचा बुल सुस्साट, Sensex ८० हजारांपार; Nifty १९० अंकांनी वधारला; IT स्टॉक्समध्ये खरेदी
8
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
9
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
11
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
12
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
13
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
14
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
15
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
16
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
17
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
18
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
19
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
20
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश

गंगा किनाऱ्यावरच्या 'मोनालिसा'चं पुढे काय होणार?

By सचिन जवळकोटे | Updated: February 8, 2025 08:09 IST

Monalisa Mahakumbh: सोशल मीडियाला दररोज नवं भक्ष्य शोधण्याची चटक लागलीय. कालची स्टेशन सिंगर राणू मंडलच्या जागी आज निळ्या डोळ्यांची मोनालिसा; उद्या कुणी तिसरीच.

-सचिन जवळकोटे (कार्यकारी संपादक, लोकमत, सोलापूर)बॉलिवूडमध्ये निळ्या डोळ्यांच्या नायिका तशा अनेक; मात्र सर्वाधिक लक्षात राहिलेल्या दोघीच. मंदाकिनी अन् ऐश्वर्या; परंतु या दोघींच्याही लोकप्रियतेला मागे टाकलं गंगा किनाऱ्यावरच्या मोनालिसानं, तेही अवघ्या आठ दिवसांत. खरं नाव मोनी भोसले. मूळ इंदूरची. रस्त्यावर फिरून रुद्राक्ष अन् गळ्यातल्या माळा विकणारी. दिवसभर चार-पाच माळा विकल्या तरच रात्री चूल पेटण्याची शाश्वती. मात्र, सोशल मीडियानं एका रात्रीत तिच्या गळ्यात 'व्हायरल पॉप्युलॅरिटी'ची भलीमोठी माळ घातली.

यंदाच्या महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरीच्या बरोबरीनं या मोनालिसाचेच व्हिडीओ व्हायरल झाले. कुठल्या तरी लोकल चॅनलवाल्यानं तिची सहज म्हणून मुलाखत घेतली अन् ती पाहता-पाहता लोकप्रियतेच्या कळसावर पोहोचली. तिचे डोळे निळे, म्हणून मीडियानं मोनीऐवजी तिला नाव दिलं मोनालिसा. लिओनार्दो द विंचीच्या अजरामर 'मोनालिसा'सोबत या तरुणीची तुलना केली गेली. 'ब्लॅक ब्यूटी' शब्द जगाला ठाऊक होता; मोनालिसाने 'ब्राऊन ब्यूटी' हा शब्दही फेमस करून टाकला.

तिच्या प्रत्येक व्हिडीओला जबरदस्त रिस्पॉन्स मिळतोय, हे लक्षात येताच प्रयागराजमधल्या तिच्या राहुटीजवळ 'डिजिटल इन्फ्लुएन्सर'ची रांग लागली. तिच्यासोबत सेल्फी काढण्यापेक्षाही तिला वेगवेगळ्या विषयांवर बोलतं करण्याची अहमहमिका सुरू झाली. सुरुवातीला लाजत-बावरत हळूच उत्तरं देणारी मोनालिसाही अवघ्या तीन-चार दिवसांत कॅमेऱ्यांना सरावली. आपण काहीही बोललो तरी तत्काळ व्हायरल होतो, हे लक्षात येताच तिच्या देहबोलीत सराईतपणा येऊ लागला.

सुरुवातीला तिच्या घरच्यांनाही गंमत वाटली. गमतीचं रूपांतर हळूहळू कौतुकात झालं. अशातच एका दिग्दर्शकानं तिला एका चित्रपटात नायिकेचीही भूमिका देऊ केली. काही ब्यूटिशियन्सनी तिचं रूप बदलवलं. एका रात्रीत तिचा 'मेकओव्हर' झाला; मात्र तिचा हा 'अवतार' बऱ्याच फॉलोअर्सना आवडला नाही. सावळ्या रंगातलं अन् निळ्या डोळ्यांतलं तिचं अस्सल गावरान सौंदर्यच म्हणे लोकांना हवं होतं.

लग्नाच्या स्टेजवर कधी-कधी नवरीपेक्षा करवलीच अधिक उठून दिसते, तसं इथंही तिच्या दोन बहिणीच भाव खाऊन जाऊ लागल्या. एकेक व्हिडीओला तीन-चार कोटींचे व्ह्यूज मिळू लागले. आपण एका रात्रीत स्टार बनलोत, याची पुरेपूर जाणीव झालेली मोनालिसा मग स्वतः ही रील्स बनवू लागली. हे इतकं होताहोता कुटुंबाच्या पोटात खड्डा पडायला लागला. घरचे भानावर आले. तिचा व्हिडीओ काढणाऱ्याला दहा हजार लाइक्स मिळाले तरी तिचे दहा रुपयांचे साधे मणीही कुणी विकत घेईना. केवळ 'व्हायरल व्हिडीओं'नी पोट भरत नाही, हा साक्षात्कार तिच्या भावंडांना झाला.

पोटासाठी रस्त्यावर भटकणाऱ्या मंडळींनाही 'व्यक्तिगत खासगीपण' असतं, याची कडवट जाणीव झालेल्या कुटुंबानं तिच्या तोंडावर कापड टाकून तिला तिथून हलवलं. अख्खं कुटुंब मूळ गावी परतलं. तिचं रोजचं नवं दर्शन होईनासं झालं तरी जुनेच व्हिडीओ फिरवून-फिरवून नवे केले जाऊ लागले. हे कमी पडलं की काय म्हणून एआयची मदत घेऊन तिचे शेकडो व्हिडीओ बनवले गेले. तिच्या नावानं तयार झालेल्या कैक फेक अकाउंट्सना लाखो फॉलोअर्स मिळाले. तिला बॉलिवूडच्या एका सिनेमाची ऑफर आलीय आणि राजकुमार रावचा भाऊ तिचा 'हिरो' असणार आहे, अशीही बातमी आली. तिचं खरे-खोटेपण काही दिवसात कळेलचा

आता उत्सुकता एवढीच की, या कहाणीचा शेवट काय? मोनालिसाचाही राणू मंडल होणार का? कारण एका रात्रीत झपाट्यानं व्हायरल झालेली अनेक मंडळी नंतर कोनाड्यातल्या पालापाचोळ्यासारखी अडगळीत पडतात, हा आजपर्यंतचा इतिहास. खरं तर हा विषय मोनालिसा किंवा राणूचा नाही. दररोज व्हायरल होण्यासाठी नवं सावज हुडकणाऱ्या डिजिटल क्रिएटर्सचा. जवळपास बारा वर्षांचा अनुभव गाठीशी असणाऱ्या या सोशल मीडियाला दररोज नवं भक्ष्य शोधण्याची चटक लागलीय. कालची स्टेशन सिंगर राणू मंडलच्या जागी आज निळ्या डोळ्यांची मोनालिसा; आणि उद्या कुणीतरी तिसरीच असते. चेहरे बदलत राहतात एवढंच!sachin.javalkote@lokmat.com

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया