अश्लील ‘ॲप्स’वर बंदी घालून काय साध्य होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 08:55 IST2025-08-02T08:54:30+5:302025-08-02T08:55:13+5:30

‘काय हवे?’ याचा समर्थ पर्याय देण्याची जबाबदारी न घेता ‘जे नको’ त्यावर सरसकट बंदी घालणे हा उपाय म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर आहे.

what will be achieved by banning pornographic apps | अश्लील ‘ॲप्स’वर बंदी घालून काय साध्य होणार?

अश्लील ‘ॲप्स’वर बंदी घालून काय साध्य होणार?

डॉ. सबिहा, लैंगिक जीवन आणि परस्परसंबंध समुपदेशक

‘ओव्हर द टॉप’ अर्थात ओटीटी माध्यमे आणि त्यांच्यावर प्रसिद्ध केला जाणारा ‘कंटेंट’ हा एका सातत्यपूर्ण चर्चेचा विषय आहे. त्यातून ‘अमुक ॲप्सवर बंदी’ आणि ‘तमुक ॲप्सला नोटिसा’ अशा बातम्याही अधूनमधून येत असतात. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ‘अश्लील कंटेंट’ असल्याचा आक्षेप घेऊन  २५ ‘ओटीटी ॲप्स’वर बंदी घातल्याची बातमी नुकतीच आली. अशी बंदी घातली जाण्याची ही काही पहिली वेळ नाही. बंदी घातली गेली की, कालांतराने ही माध्यमं फक्त आपला मुक्काम हलवतात आणि जे करत होती तेच करत राहतात. त्यांचा ‘कंटेंट’ बघितलाही जातो. त्याला मागणीही असते. याचा अर्थ साधा आहे. आपलं कुतूहल आणि औत्सुक्य शमवण्यासाठी अनेकांची पावलं या ओटीटीकडे वळतात. मग बंदी घालण्यातून काय साध्य होणार आहे? 

मी गेली अनेक वर्षे वैद्यकीय व्यवसायात आहे. गेली दहा वर्षे मी सेक्स अँड रिलेशनशिप कोच म्हणून काम करते. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर लैंगिक शिक्षणाची किती गरज आहे, हे या काळात मी जवळून बघते आहे. लैंगिकतेबद्दल खुल्या संवादाची शक्यता अत्यल्प असल्याने अर्ध्या वयातली मुले तर सहज उपलब्ध असलेल्या ‘पॉर्न’कडे वळतातच; पण वयस्क लोकही त्याच्या आहारी जातात हे समाजाने आता स्वीकारणे भाग आहे. 

आजकाल मुले-मुली बारा-तेराव्या वर्षीच वयात येतात. त्यानंतर शरीरात होणारे बदल त्यांना गोंधळवून टाकणारे असतात. तो गोंधळ-अज्ञान दूर करण्यासाठी, कुतूहल आणि औत्सुक्याच्या भावनेतून ही मुले सहज ‘पॉर्न’कडे वळतात. त्यातून मग ते बघण्याची सवय लागणे, त्या सवयीचे व्यसनात रूपांतर होणे हे घडते. पॉर्न हे वास्तव नाही. ‘रिअल’ आणि ‘रील’ यात प्रचंड फरक ही साधी गोष्ट, त्या व्यसनाचे दुष्परिणाम याबद्दल खुला संवाद सोडून आपण ‘हे बंद, ते बंद’ असे सोपे मार्ग स्वीकारतो. आपले शरीर, त्याची रचना, अवयव, शरीरशास्त्र, यांबद्दल खरी माहिती मोकळेपणाने देणारी एक रीतसर व्यवस्था उभारणे मात्र आपल्याला महत्त्वाचे वाटत नाही.
सोशल मीडियासारख्या माध्यमातून मी आणि माझ्यासारखे काही लोक लैंगिक शिक्षणासाठी एक व्यासपीठ उभे करण्याचा प्रयत्न करत आहोत; पण आम्हाला येणारे अनुभव वाईट आहेत.

‘सेक्स’ हा शब्दही आम्हाला आहे तसा लिहिता येत नाही. तसा लिहून प्रसिद्ध केलेला कंटेंट आम्हाला ‘ब्लॉक’पर्यंत घेऊन जातो. व्हिडीओ किंवा मुलाखतींमध्ये कायद्याने लैंगिक अवयवांची चित्रे दाखवण्यावरही बंदी आहे. माझ्या कामाचा भाग म्हणून मी लैंगिक अवयवांच्या काही प्रतिकृती जर्मनीहून मागवल्या. त्या इथे ताब्यात घेण्यासाठी मला प्रचंड मोठी कस्टम ड्यूटी भरावी लागली. खऱ्या लैंगिक अवयवांशी मिळते-जुळते असल्यामुळे त्यांच्यावर ‘अश्लील’ असा शिक्का होता. जे तज्ज्ञ लोक लैंगिक शिक्षणासाठी काही पर्याय उभे करायचा प्रयत्न करतात त्यांना कायद्याची कुंपणे घातली जातात. ‘काय हवे?’ याला आपण पर्याय देऊ शकत नाही म्हणून ‘जे नको’ त्यावर बंदी घालणे हा उपाय म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर आहे. 

पॉर्न  फक्त ‘टीनेजर’ मुले बघतात असे नाही. सर्व वयातले स्त्री, पुरुष ते बघतात. लग्न झाल्यानंतर एक जोडीदार ते बघणारा आणि दुसरा ते न बघणारा असेल तर ते बघणारा चारित्र्यहीन ठरतो. दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणानंतर लैंगिक संबंधांबाबत मनात प्रचंड दहशत असलेल्या कितीतरी तरुणी मी समुपदेशन सत्रांमध्ये पाहिल्या आहेत. लहानपणी घरातल्याच कुणा ज्येष्ठाने चुकीचे स्पर्श केल्यामुळे मोठेपणी लग्नानंतर जोडीदाराबरोबर लैंगिक संबंध ठेवताना अडखळणाऱ्या मुली हे आपले सध्याचे वास्तव आहे. 

‘पॉर्न’कडे फक्त अश्लील म्हणून बघण्यापेक्षा त्याचे भावनिक, मानसिक, सामाजिक पैलू विचारात घेतले, तर लैंगिक शिक्षणाची गरज स्पष्ट होईल.  लैंगिक शिक्षणाच्या अभावातून घडलेल्या विचित्र घटना आणि त्याचे परिणाम सहन करणारे लोक मला सतत भेटतात. यावर उपाय म्हणून योग्य पद्धतीने लैंगिक शिक्षण देणारी यंत्रणा उभी करणे ही आपली/ समाजाची/ सरकारचीही प्राथमिकता असायला हवी.  पॉर्न, सॉफ्ट पॉर्न कंटेंट आणि तो दाखवणाऱ्या माध्यमांवर बंदी घालून काहीही साधणार नाही.

एखादी गोष्ट करू नका, असे म्हणत तिच्यावर बंदी घातली जाते तेव्हा त्या गोष्टीबद्दलचे कुतूहल अधिक चाळवते आणि मग तेच करून बघावेसे वाटते, हा मानवी स्वभाव आहे. लैंगिक आयुष्याशी संबंधित  विषयांवर आपल्याकडे मोकळेपणाने बोलण्याची एक सामाजिक संस्कृतीही तयार झाली पाहिजे. त्यासाठी सर्व स्तरांतून प्रयत्न गरजेचे आहेत. ‘बंदी’ हा तात्पुरता उपाय झाला. तो निरुपयोगी ठरतो, असाच अनुभव आहे. 
    contact@drsabiha.com

Web Title: what will be achieved by banning pornographic apps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.