निवांत खुची टाकून तुम्ही वाचलेले शेवटचे पुस्तक कोणते ?
By Shrimant Mane | Updated: August 30, 2025 11:03 IST2025-08-30T11:03:03+5:302025-08-30T11:03:35+5:30
Book Reading: मुळात वाचन कमी झालेले. त्यात जे वाचायचे ते 'फायद्या' साठीच, ही वृत्तीही वाढली. आनंदासाठी पुस्तक वाचणारे उरले आहेत, ते बहुधा म्हातारेच असणार!

निवांत खुची टाकून तुम्ही वाचलेले शेवटचे पुस्तक कोणते ?
- श्रीमंत माने
(संपादक, लोकमत, नागपूर)
शांत तळ्याकाठी, तलावाकाठी किंवा घराच्या अंगणात अथवा गच्चीवर खुर्ची टाकून निवांत बसला आहात आणि चहाचा घोट घेत एखादे पुस्तक वाचत आहात, अशी तुमची शेवटची आठवण कधीची आहे? बहुतेकांनी गेल्या कित्येक वर्षांत असा निवांतपणा अनुभवला नसेल. वाचनाचा आनंद घेतानाचे हे असे क्षण केवळ विरंगुळा नसतो.
पुस्तकाच्या साक्षीने, त्यातील मजकुराची अनुभूती घेत घेत स्वतःशीच साधलेला तो संवाद असतो. त्यातून मनातील एखादा जटिल गुंता सुटतो, नव्या कल्पना सुचतात, मनातील भावनांना जोडीदार मिळतात, वैचारिक समृद्धी वाढते. आणखीही बरेच काही घडत असते; पण असे क्षण दुर्मीळ झाले आहेत. कदाचित काहींचे वाचन सुरूच असेल; पण ते पूर्णपणे व्यावसायिक हेतूचेच असण्याची शक्यता आहे. स्वतःच्या आनंदासाठी वाचन हा प्रकार अगदीच अपवादात्मक असावा. आनंदासाठी पुस्तके वाचणे, हा खरेच एक आनंददायी अनुभव असतो. कथानकांचा रोमांच अनुभवता येतो. काहीजण ज्ञान, प्रेरणा किंवा विश्रांतीसाठी वाचतात. एखादी कादंबरी वाचताना माणूस त्या कथेत हरवून जातो, तर एखादे तत्त्वज्ञानाचे पुस्तक वाचताना विचारांना नवीन दिशा मिळते.
डिजिटल युगात वाचन कमी झाले आहेच आणि आनंदासाठी वाचन तर जणू होतच नाही. याविषयी तब्बल २ लाख ३६ हजार जणांच्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष काल-परवा अमेरिकेत जाहीर झाला. फ्लोरिडा विद्यापीठातील सेंटर फॉर आर्ट्स इन मेडिसिनचे जिल सोनके आणि युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनच्या डायसी फॅनकोर्ट यांनी जाहीर केलेले हे निष्कर्ष चिंताजनक आहेत. २००३ मध्ये २८ टक्के प्रौढ अमेरिकन 'रीडिंग फॉर प्लेझर' म्हणजे स्वतःच्या आनंदासाठी पुस्तक वाचत होते. वीस वर्षात, २०२३ मध्ये हे प्रमाण अवघे १६ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. म्हणजे ४० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. २०२२ मध्ये फक्त ४८.५ टक्के अमेरिकन प्रौढांनी वर्षभरात किमान एक पुस्तक आनंदासाठी वाचले. १९९२ मध्ये हे प्रमाण ६१ टक्के होते. मुलांमध्येही हीच प्रवृत्ती दिसते. तेरा वर्षांवरील मुलांनी २०१२ मध्ये दररोज आनंदासाठी वाचन केल्याचे सांगितले, तर २०२३ मध्ये हे प्रमाण १४ टक्क्यांपर्यंत घसरले.
स्मार्टफोन, सोशल मीडिया, स्ट्रीमिंग सेवांचा वाढता वापर, कमी झालेला मोकळा वेळ आणि ग्रामीण भागात लायब्ररी किंवा वाचन साहित्याची कमतरता, यामुळे वाचन कमी झाले असले तरी ज्यांना वाचनाची आवड आहे, जे नियमित वाचन करतात, ते आधीपेक्षा जरा जास्त वेळ वाचनासाठी घालवतात, असे आढळले आहे. उदाहरणार्थ, २०२३ मध्ये असे नियमित वाचणाऱ्यांनी सरासरी १ तास ३७ मिनिटे वाचनासाठी व्यतीत केली. २००३ मध्ये हा सरासरी वेळ १ तास २३ मिनिटे होता. उच्च शिक्षित लोक, महिला, आणि शहरी भागात राहणारे लोक आनंदासाठी जास्त वाचन करतात. कमी शिक्षण, कमी उत्पन्न आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांमध्ये वाचनाचे प्रमाण कमी आहे. कारण, ते पोटापाण्याच्या प्रश्नात अधिक गुंतले आहेत. वाचनाविषयी या दोन वर्गामधील दरी वाढत चालली आहे. भारतातही डिजिटल मीडियाचा वाढता प्रभाव आणि शहरीकरण, यामुळे आनंदासाठी वाचन कमी होत आहे. साहित्य संमेलने वगैरेंची मदत होते खरी; परंतु ती पुरेशी नाही. एकच समाधान म्हणजे मुलांना वाचून दाखवण्याचे प्रमाण गेल्या २० वर्षात फारसे बदललेले नाही. अर्थात, केवळ २ टक्के पालक रोज मुलांना काही ना काही वाचून दाखवतात.
या क्षेत्रातील जाणकार आतापर्यंत समजूत घालत आले की, वाचन कमी वगैरे झालेले नाही, तर वाचनाची पद्धत बदलली आहे. पूर्वी लोक कागदावर लिहिलेले, छापलेले वाचायचे. आता तरुण पिढी पडद्यावर वाचते. पूर्वी पेज रीडिंग व्हायचे, आता स्क्रीन रीडिंग होते. हे समाधान बाळगले तरी प्रश्न उरतोच की, नेमके काय वाचले जाते? नवी पिढी अधिक व्यवहारी आहे. आपल्या हिताचे सोडून इतर गोष्टींकडे लक्ष देत नाही. शिक्षण, करिअर वगैरे काही तरी फायदा असेल तेच वाचण्याकडे ओढा आहे. थोडेबहुत वेगळे विज्ञान, तंत्रज्ञानातील रंजक वाचन होते. कथा, कविता, नाटके, असे निव्वळ काल्पनिक विरंगुळा म्हणून वाचण्याची फारशी आवड उरलेली नाही. आणि आवड असली तरी शिक्षणाच्या रहाटगाडग्यात गुंतलेल्या मुलांकडे, करिअरच्या मागे धावणाऱ्या तरुणांकडे त्यासाठी वेळ आहे तरी कुठे? अमेरिकेतील सर्वेक्षणात पुस्तके, मासिके यासोबतच ऑडिओ बुक्स व ई-रीडर्सचा समावेश आहे. म्हणजे आनंदासाठी पुस्तक वाचणारे उरले आहेत, ते बहुधा म्हातारेच असणार.