What is Serendipity? | आकर्षणाचं केंद्र ठरत असलेलं सेरेंडिपिटी म्हणजे आहे काय?
आकर्षणाचं केंद्र ठरत असलेलं सेरेंडिपिटी म्हणजे आहे काय?

- राजू नायक
पणजी : गोव्यात जाहिरात न करताही पर्यटक गर्दी करतात. कलांचेही तसेच झाले आहे. एवढे कला महोत्सव राज्यात सतत होत असतात की कला रसिकांना हे पाहू की ते अशी परिस्थिती होत असते. त्यात अनेक संग्रहालये व कलामंच येथे आहेत- तेथे तर सतत प्रदर्शने चालू असतात. नाटके, तियात्र, चित्रपट महोत्सव याची राळ उडालेली असते. त्यात सेरेंडिपिटीने आपले स्थान निर्माण केले आहे, यात तथ्य आहे.
गोवा हे जाणीवपूर्वक प्रयत्न न करताही पर्यटनाचे आंतरराष्ट्रीय स्थळ झाले आहे. त्यामुळे आपोआपच गोव्यात होणा-या विविध कला उपक्रमांना आंतरराष्ट्रीय स्वरूप लाभत असते. सेरेंडिपिटीच्या आयोजकांनी गोवा हे या महोत्सवासाठी केंद्र निवडण्याचे तेच कारण असावे; परंतु गोव्याच्या लौकिकाला साजेसा हा महोत्सव होत असतो. त्यात देशभरातील ख्यातनाम कलाकार गोव्यात येतात. नाटक, सिनेमा, चित्रकलेपासून संगीत, फॅशन, अध्यात्म असे विविध विषय निवडले जातात. ते पाहाण्याचे भाग्य गोव्यातील रसिकांना लाभते. इफ्फी असो किंवा सेरेंडिपिटी त्यांनी गोव्याला प्रगल्भच बनविले आहे. परंतु असे असले तरी ‘गोवा’ या ‘सेरेंडिपिटी’त कितीसा आहे? बहुतेक सर्व कलाकार, तंत्रज्ञ व कार्यकर्तेही महोत्सवाचे आयोजक दिल्लीतून आणत असतात. त्यामुळे गोवा या महोत्सवात केवळ एक ‘प्रेक्षक’ असतो. त्यात गोव्याची थिएटरे, मैदाने व स्थळे वापरली जातात; परंतु निव्वळ ती म्हणजेच ‘गोवा’ आहे का?


जेव्हा हा महोत्सव चार वर्षापूर्वी भरू लागला, तेव्हा त्याला सरकारने पाठिंबा देण्याचे कारण या महोत्सवात भव्य दिव्य असे काही घडणार होते. जागतिक कीर्तीचे कलाकार येथे येऊन कला सादर करतील व तिचा अनुभव घेण्यासाठी जगभरातून कलारसिक येथे येणे महत्त्वाचे होते. देशात आज कला व संस्कृती क्षेत्रात जे वैशिष्टय़ आहे, त्याचा रसास्वाद लोकांना घ्यायला मिळणार ही एक पर्वणीच होती. सीमा किंवा सरहद्द ओलांडून जाणारा महोत्सव येथे होणार ही संकल्पनाच आकर्षक होती. आयोजकांच्या मते त्यांनी अजूनपर्यंत चार हजारपेक्षा अधिक कलाकारांना महोत्सवात सामावून घेतले आहे; परंतु गोवा व आसपासच्या कलाकारांचा समावेश त्यात कितीसा आहे? तरुण, होतकरू कलाकारांना तरी त्यात संधी मिळणार की नाही?
नाही म्हणायला, यंदा फ्रांसिस्क न्यूटन सौझांचे नातू सोलोमन सौझा या तरुण चित्रकाराने गोव्यात येऊन इमारतींच्या भिंतीवर अनेक कलाकारांची चित्रे रंगविली. त्यात अनेक गोमंतकीय कलाकारांच्या चित्रांचा समावेश होता. त्यांची शैली येथे खूपच गाजली; परंतु सोलोमन यांच्याबरोबर १२ स्थानिक चित्रकारांचा सुसंवाद घडवून आणला असता तर ते उचित ठरले असते. स्थानिक कलाकार केवळ ‘प्रेक्षक’ बनू नयेत. त्यांना या उपक्रमांत सामावून घेतले तर येथील परंपरा, संस्कृती व स्थानिक लोककलाकारांना हा महोत्सव आपला वाटू शकला असता. तसे न झाल्याने हा महोत्सव केवळ ‘उच्चभ्रू’ म्हणून गणला जात असून अनेक अफलातून प्रयोग महोत्सवात होत असूनही स्थानिकांची उपस्थिती खूपच कमी असते. एक स्थानिक कलाकार म्हणालाही, जोपर्यंत सेरेंडिपिटी ही तळागाळात समरस होणार नाही, तोपर्यंत गोवा त्यात सहभागी होणार नाही व ‘पाहुणा’ म्हणूनच त्याचे स्वरूप राहील. गोवा सरकार महोत्सवाला अनुदान देत नसल्याने अजून त्याबाबत कलाकारांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटलेल्या नाहीत, एवढेच!

Web Title: What is Serendipity?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.