शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

हे कसले लोकप्रतिनिधी ?

By admin | Published: March 28, 2017 12:45 AM

शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी एका विमान कर्मचाऱ्याला स्लीपरने मारहाण करून स्वत:च्या पातळीचे व मानसिकतेचे

शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी एका विमान कर्मचाऱ्याला स्लीपरने मारहाण करून स्वत:च्या पातळीचे व मानसिकतेचे जे प्रदर्शन केले त्याने शिवसेनेएवढीच महाराष्ट्राचीही मान शरमेने खाली गेली आहे. अशा गुंड प्रवृत्तीच्या माणसांना, स्वत:ला राष्ट्रीय म्हणविणारे पक्ष तिकिटे कशी देतात आणि लोक त्यांना मते तरी का देतात असाच प्रश्न या घटनेमुळे साऱ्यांना पडला आहे. विमानातले कर्मचारी तसेही साध्या प्रवाशांशी सौजन्याने वागतात. खासदार-आमदारसारख्यांशी त्यांची वागणूक जास्तीच्या विनम्रतेची असते. जागांची अदलाबदल व त्याविषयी निर्माण होणारी अडचण यात त्यांचा कुठलाही दोष नसतो. अशावेळी आपल्या संतापाला आवर घालण्याचे व साध्या माणुसकीने वागण्याचे ज्याला ठरविता येत नाही तो माणूस लोकप्रतिनिधी म्हणण्याच्या सोडा, माणूस म्हणवून घेण्याच्या लायकीचाही नसतो. विमान कंपन्यांचे कर्मचारी त्यांना नेमून दिलेली कामे काळजीपूर्वक व तीही हसत करीत असतात. ते कर्मचारी आहेत आणि त्यांनाही अन्य नागरिकांप्रमाणे सन्मानपूर्वक वागविले पाहिजे असे वाटणे हा साधा शहाणपणा आहे. हे जे कोण रवींद्र गायकवाड आहेत त्यांना हे शहाणपण नाही, सौजन्य नाही आणि माणूसपणही नाही. आधीच अहंभाव असणारी माणसे जेव्हा संसदेच्या उंचीपर्यंत पोहचतात तेव्हा त्यांना जास्तीची शिंगे फुटतात. मग त्यांचे चालणे-बोलणे आणि वागणेही बदलते. त्यांच्यावर हिंदुत्वाचेच नव्हे तर राष्ट्रीयत्वाचेही संस्कार मग उरत नाहीत. अशी माणसे जनतेचे प्रतिनिधी म्हणून संसदेत जावी ही आपलेच कमीपण उघड करणारी बाब ठरते. लोकांना त्यांच्या लायकीचेच प्रतिनिधी मिळतात असे जे म्हणतात ते अशावेळी फार अंतर्मुख करणारे ठरते. आपली संसद तशीही किमान शंभरावर अपराध्यांनी आणि गुन्हेगारांनी भरली आहे. त्यात खुनी आहेत, बलात्कारी आहेत, हिंसाचाराला चिथावणी देणारे आणि हत्याकांडे घडवून आणणारे आहेत. खंडणीखोर आहेत आणि भारतीय दंड संहितेला ठाऊक नसणारे अपराध करणारेही आहेत. रवींद्र गायकवाड हे अशा प्रवृत्तीचे लोकप्रतिनिधी आहेत. त्याला संसद आवर घालत नाही, सभापती बोल लावीत नाही, त्याचा पक्ष त्याला जाब विचारत नाही आणि मतदार ? ते तर त्याला निवडून देणारे म्हणून त्याच्या कृत्याला जबाबदारच असतात. गायकवाडांना कोणी शिक्षा करत नाहीत हे पाहून देशातील सगळ्या हवाई कंपन्यांनी त्याच्यावर प्रवासबंदी लादली आहे. जेव्हा कायद्याच्या यंत्रणा कुचकामी ठरतात वा गप्प राहतात तेव्हा समाजाने व सामाजिक संघटनांनीच पुढे यायचे असते. असा पुढाकार घेतल्याबद्दल सगळ्या हवाई कंपन्या आणि त्यांचे संचालक व कर्मचारी यांचे मनापासून अभिनंदन करणेच गरजेचे आहे. त्यांनी या गायकवाडलाच नव्हे तर संसद आणि शिवसेना हा त्याचा पक्ष यांनाही धडा शिकविला आहे. किमान त्यामुळे तरी आपण विमानातच नव्हे तर सर्वत्र सभ्यपणे व सौजन्याने वागावे असा धडा सगळ्या पुढारी म्हणविणाऱ्यांना मिळाला. राजकारण हे सेवेचे क्षेत्र आहे, संसद ही संवादाची जागा आहे आणि लोकशाही ही सगळ्यांना सन्मानाची वागणूक देण्याची शिकवण देणारी संस्कारशाळा आहे हे ज्यांना कळत नाही त्यांना संसदेबाहेर घालविणेच योग्य ठरते. खासदार वरुण गांधी यांनी अकार्यक्षम व अपात्र लोकप्रतिनिधींना परत बोलवण्याचा अधिकार लोकांना असावा अशी मागणी करणारे एक खासगी विधेयक लोकसभेत आणले आहे. स्वित्झर्लंडच्या लोकशाहीत असा अधिकार तेथील जनतेला घटनेनेच दिला आहे. एका विशिष्ट संख्येएवढ्या मतदारांनी सह्या करून ‘हा प्रतिनिधी परत पाठवा’ असे सरकारला त्यात कळवायचेच तेवढे आहे. त्यामुळे तेथील लोकप्रतिनिधींना निवडणुकीपुरताच लोकांचा धाक न बाळगता तो त्यांच्या सबंध कार्यकाळात बाळगावा लागतो. मग ते लोकांत वावरतात आणि त्यांचे वागणे सौजन्याचे असते. आमच्याकडे लोकप्रतिनिधी हा लोकांचा प्रवक्ता वा सेवक नसतो. तो त्यांचा मालक असतो. (एका मंत्र्याबाबत ‘तो आमचा देव आहे’ असे सांगणारी जाहिरातच त्याच्या भगतांनी विदर्भात लावलेली दिसली.) हे भगतही नुसते वेडे नसतात. ते लुच्चे आणि लबाड असतात. त्या पुढाऱ्याकडून काहीतरी मिळवण्यासाठी ते त्याला देवत्वाचा अंगरखा चढवीत असतात. त्यातून आपल्या राजकारणात सध्या योग्यांची, साधूंची, साध्व्यांची, महाराजांची आणि स्वत:ला धर्माचार्य म्हणवून घेणाऱ्यांची चलती मोठी आहे. मात्र धर्माचे म्हणवून घेणारे हे लोकही काही कमी अहंकारी नसतात. त्यांच्या अहंतेला धर्माचे त्रिशूळ वा एखादे जालिम शस्त्र जडलेले असते. ही माणसेही हिंसेवर उतरतात. हिंसाचार घडविल्याने आपली लोकप्रियता वाढते असा त्यांचा समजही असतो. दिल्ली, गुजरात आणि बाबरीसारख्या घटनांनी तो खराही ठरवला असतो. हिंसेच्या बळावर जेथे सरकारे बनतात तेथे रवींद्र गायकवाडांसारखी माणसे फार लहान व क्षुल्लकही दिसू लागतात. असो, हा आपल्या लोकशाहीची लक्तरे वेशीवर टांगणारा प्रकार आहे. त्याचे विकृत स्वरूप जगभरच्या माध्यमांना लोकांसमोर आणावेसे वाटले ही आपल्या राजकारणाची पातळी लक्षात आणून देणारीही बाब आहे. असे प्रकार पुन्हा करू नका, असेच या निमित्ताने आपल्या पुढारी वर्गाला सांगायचे आहे.