अशी असंवेदनशील बुद्धिमत्ता काय कामाची?
By Admin | Updated: July 22, 2015 22:58 IST2015-07-22T22:58:51+5:302015-07-22T22:58:51+5:30
संवेदनशीलता असेल, तरच सर्जनशील बनता येतं. शास्त्रज्ञ वा तंत्रज्ञ हा सर्जनशील कलावंतच असतो. पण केवळ बुद्धिमत्ता असेल, तर मग ती कोणत्याही

अशी असंवेदनशील बुद्धिमत्ता काय कामाची?
संवेदनशीलता असेल, तरच सर्जनशील बनता येतं. शास्त्रज्ञ वा तंत्रज्ञ हा सर्जनशील कलावंतच असतो. पण केवळ बुद्धिमत्ता असेल, तर मग ती कोणत्याही मार्गानं वापरण्याकडं कल असतो. त्यात स्वार्थ प्रभावी ठरतो. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज नारायण मूर्ती हे याचं बोलकं उदाहरण आहे.
‘आयआयटी’, ‘आयआयएम’ इत्यादी उच्चशिक्षण संस्थात जगानं दखल घ्यावी, असं संशोधन किती झालं, असा प्रश्न नारायण मूर्ती यांनी अलीकडंच विचारला. साहजिकच त्यांच्या या मुद्याची दखल घेतली गेली आणि त्यावरच चर्चा सुरू झाली. मात्र असे प्रश्न विचारायचा नारायण मूर्ती यांना किती नैतिक अधिकार आहे, त्यांनी स्वत: काय केलं, हा सवाल अशी चर्चा करणाऱ्यांनी विचारलाच नाही
...कारण नारायण मूर्ती यांच्या भोवतीचं प्रसिद्धीचं व उद्योग, व्यापार व आर्थिक जगतातील दिग्गजतेचं वलय.
प्रत्यक्षात ‘इन्फोसिस’ ही कंपनी स्थापन करणाऱ्यांपैकी एक असलेल्या नारायण मूर्ती यांनी बिल गेट्स किंवा स्टीव्ह जॉब्स यांच्याप्रमाणं माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्राला वेगळं वळण लावणारं काही काम केलं आहे काय? त्यांच्या खाती किती पेटन्ट्स आहेत? भारतात असंख्य प्रादेशिक भाषा आहेत. त्या त्या भाषेसाठी वेगवेगळे फॉन्ट्स व सॉफ्टवेअर्स आहेत. किंबहुना एका प्रादेशिक भाषेतही वेगवेगळी सॉफ्टवेअर्स आहेत. उदाहरणार्थ, मराठीत विविध सॉफ्टवेअर्स वापरली जातात. त्यात समानता आणण्यासाठी ‘इन्फोसिस’ किवा ‘विप्रो’ अशा कंपन्यांनी काही प्रयत्न केले काय?
उलट बिल गेट्स यांच्या ‘मायक्रोेसॉफ्ट’ कंपनीनं ‘युनिकोड’ प्रणाली तयार केली आणि जगातील सर्व भाषांतील फॉन्ट्स वापरण्याची सोय करून दिली. या प्रणालीत मराठीतील ‘मंगल’ हा फॉन्ट प्रसिद्ध सुलेखनकार र. कृ. जोशी यांनी तयार केला. ‘मंगल’ हे त्यांच्या पत्नीचं नाव. या कामासाठी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे गेले असताना विमानतळावरच ह्रदयविकाराचा झटका येऊन त्यांचं निधन झालं होतं. बिल गेट्स यांच्या ‘मायक्रोसॉफ्ट’ला महाराष्ट्रातील जोशी दिसले, पण येथील कोणा ‘तज्ज्ञां’ना ते दिसले नाहीत.
वस्तुस्थिती अशी आहे की, नारायण मूर्ती व त्यांची ‘इन्फोसिस’ ही व्यापारी कंपनी आहे. तिचा माहिती तंत्रज्ञानातील संशोधनाशी काहीही संबंध नाही. जागतिक स्तरावर व्यापार करून या कंपनीनं अब्जावधी डॉलर्स मिळवले आणि सगळे संस्थापक व भागधारक गब्बर झाले. आता ‘भारतात उच्च शिक्षणाच्या संस्था काहीच जागतिक दर्जाचं संशोधन करीत नाहीत’, असा गळा काढायला ही मंडळी मोकळी आहेत.
भारतातील या उच्च शिक्षणसंस्थांचं मोदी सरकारच्या काळात बौद्धिक दिवाळं काढायचा जो प्रयत्न चालला आहे, त्याबद्दल नारायण मूर्ती यांच्यासारख्यांनी कधी तोंड का उघडलं नाही? दिल्ली ‘आयआयटी’चे संचालक डॉ. शेवगावकर यांच्यावर गैरकारभाराचा ठपका सरकारनं ठेवला. हा सारा बनाव कसा होता आणि त्यामागचं खरं कारण काय होतं, यावर ‘एनडीटीव्ही’ या वृत्तवाहिनीनं अलीकडंच ‘ट्रुथ व्हर्सेस हाईप’ या कार्यक्रमात प्रकाश टाकला.
मोदी सरकारच्या मनुष्यबळ विकास खात्यानं देशातील सर्व ‘आयआयटी’ना असा आदेश दिला आहे की, त्यांनी ‘उन्नत भारत’ या योजनेखाली ग्रामीण भागासाठीचे सुयोग्य तंत्रज्ञान शोधून काढण्यासाठी पुढाकार घ्यावा. प्रथमदर्शनी बघितलं, तर बहुसंख्य भारतीय ग्रामीण भागात राहत असल्यानं अशी योजना योग्यच आहे, असं कोणीही म्हणेल. पण यात गोम अशी आहे की, हे ‘सुयोग्य तंत्रज्ञान’ शोधून काढताना ‘गाय’ हा त्याचा केंद्रबिंदू असायला हवा, असं सरकारचं म्हणणं आहे. या संदर्भात दिल्ली ‘आयआयटी’त एक बैठक बोलावण्यात आली. तिला संघ परिवारातील अनेक धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी हजर होते. शिवाय बाबा रामदेवही उपस्थित होते. या साऱ्या प्रकाराबाबत डॉ. शेवगावकर यांनी नाराजी व्यक्त केली आणि मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांची मर्जी खप्पा झाली. डॉ. शेवगावकर यांच्यावर किटाळ आणून त्यांना बदनाम करण्यात आले. सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली आणि स्वत:लाही असाच अनुभव आल्यानं ‘आयआयटी’च्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाचा त्यांनी राजीनामा दिला. शिवाय ‘ज्याला स्वाभिमान आहे, अशी व्यक्ती हे प्रकार खपवून घेऊ शकत नाही’, अशी बोचरी प्रतिक्रियाही व्यक्त केली. त्यामुळं संघ परिवार खवळला आहे आणि आता ‘आयआयटी’त ‘हिंदू विरोधी वातावरण तयार केलं जात आहे, विद्यार्थ्यांनी प्रेमचुंबन आंदोलन केले, त्याला काकोडकर यांनी विरोध केला नाही, इत्यादी फालतू कारणं देऊन ‘आॅर्गनायझर’ या संघाच्या मुखपत्रानं टीकास्त्र सोडलं आहे.
मात्र प्रश्न ‘आॅर्गनायझर’चा नसून नारायण मूर्ती यांच्यासारख्या मुखंडांचा आहे. ‘आयआयटी’, ‘आयआयएम’ अशा संस्थांच्या कामगिरीवर कोरडे ओढताना माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील या दिग्गजाला मोदी सरकारचे हे प्रयत्न दिसत नाहीत आणि त्यावर बोलावेसेही वाटत नाही, तेव्हा मूर्ती यांचा पक्षपाती दृष्टिकोन उघडच होतो. तसंच सत्तेच्या वळचणीला राहत असतानाच स्वत:ची तथाकथित तटस्थ प्रतिमा जनमानसात उभी करण्याची त्यांची हातोटीही दिसून येते. पण अशा प्रवृत्तीला संधीसाधू म्हणतात.
खरं तर संघ परिवारानं सध्या शिक्षण क्षेत्रात जो उच्छाद मांडला आहे, त्याबद्दल शेगावकर वा काकोडकर किंवा टाटा मूलभूत संशोधन संस्था व इतर काही संशोधन संस्थातील मोजक्या शास्त्रज्ञांव्यतिरिक्त इतर मूग गिळून गप्प आहेत. याच सगळ्या मंडळींंनी मोदींना पाठबळ दिलं होतं. नारायण मूर्ती, वगैरे त्यात आघाडीवर होते. आता उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात मोदी सरकार आणि हिंदुत्ववादी जो धुमाकुळ घालीत आहेत, त्यामुळं अशांपैकी अनेकांची घालमेल होत आहे. पण नारायण मूर्ती वगैरे तथाकथित दिग्गज गप्प आहेत.
असे असंवेदनशील व स्वार्थी बुद्धिवंत जे काही म्हणतात, त्याला ‘बोलाचीच कढी....’ मानणं हेच योग्य.
प्रकाश बाळ
(ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभ लेखक)