शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
4
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
5
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
6
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
7
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
8
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
9
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
10
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
11
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
12
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
13
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
14
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
15
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
16
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
17
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
18
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
19
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
20
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी

वाचनीय लेख : ... कोरोनामुळे अस्वस्थ होण्यासारखं काय आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2021 08:57 IST

coronavirus : एकाकी मरण ही कोविडची सगळ्यात भयंकर बाजू म्हणतात. पण विभक्त कुटुंबातले वृद्ध, मुंबई लोकलमधून पडणारी मुलं काय वेगळी मरतात?

-अनंत सामंत(ख्यातनाम लेखक)

एकदा आत्मा सैतानाला विकल्यानंतर सैतानाचं अस्तित्व आपल्याला अस्वस्थ कसं करू शकतं? आपली छत्रछाया जाणार आहे, यापुढं उन्हात जळावं लागणार आहे हे झाड तोडण्याआधीच माहिती असतं. माहित असलं पाहिजे! दगड, कुर्‍हाड, बंदूक, अणूबॉम्ब, रेल्वेच्या रुळांइतकाच कोविड निर्जीव असतो असं म्हणतात. आणि दगड, कुर्‍हाड, बंदूक, अणूबॉम्ब, रेल्वेच्या रुळांनी जगभरात केवढा हैदोस घातला त्यापेक्षा कोविडने कमीच घातलाय. असंही म्हणतात की कोविड सायन्सची देणगी आहे. ज्याप्रमाणे ट्रेन, कार, विमानं, कारखाने, प्लास्टिक, इमारती, औषधं, हवापाण्याचं प्रदूषण, ओझॉन लेअरचं भोक, समुद्राची वाढणारी उंची, नष्ट होणारे किनारे, नाहीशा होणार्‍या असंख्य जिवांच्या प्रजाती, कोलेस्ट्रॉल, शुगर, कॅन्सर वगैरे वगैरे. मग कोविडमध्ये नवं असं काय आहे? अनेक कादंबर्‍यांत, चित्रपटांत, मालिकांत कोविड येण्याआधी कित्येक वर्षे तत्सम ‘प्लेग’ची नांदी होतंच होती. एकाकी मरण ही कोविडची सगळ्यांत भयंकर बाजू म्हणतात. पण विभक्त कुटुंबातले वृद्ध, परदेशी गेलेले तरूण, मुंबईच्या लोकलमधून पडणारी मुलं काय वेगळी मरतात?

अस्वस्थ होणारे अस्वस्थ होतात कारण त्यांना अस्वस्थ व्हायची आवड असते. पूर्वी शाळेत जायचा कंटाळा आला की मुलांच्या पोटात दुखायचं. तसं ज्यांना काहीही करायचं नसतं ते अस्वस्थ होतात. पांडवांनी राज्य मागितलं म्हणून काही जण अस्वस्थ होते. कौरवांनी त्यांना राज्य दिलं नाही म्हणून काही अस्वस्थ झाले. पहिल्या महायुद्धानंतर अस्वस्थ होणार्‍यांना वाटलं की नंतर असं युद्ध मांडण्याची इच्छाच कोणाला होणार नाही. दुसर्‍या महायुद्धानंतर त्यांना वाटलं हिरोशीमा-नागासाकी नंतर अणुबॉम्ब कोणी करू धजणार नाही. अणुबॉम्बच्या स्फोटामुळे अस्वस्थ झालेले आत्मे कधीच देवाघरी गेले. आपण शेकडो अणुबॉम्बसोबत आपापल्या घरात सुखेनैव जगतोय. मग नुसत्या कोविडने आपण का अस्वस्थ व्हावं? ज्या उपेक्षितांना, बेकार, भणंग, कंगालांना, गोरगरीब खेडुतांना व्यवस्थेने आधुनिक सुखसोयी-सुविधांपासून वंचित राहाण्यास भाग पाडलं त्यांच्याशी हा निर्जीव कोविड आश्‍चर्यकारक आपुलकीनं वागला. आयुष्यभर अनवाणी चालावं लागणार्‍या माणसांच्या पावलांवर जसं दगडही प्रेम करतात तसं कोविडनं या आत्मा न विकलेल्या माणसांवर प्रेम केलं यात अस्वस्थ होण्यासारखं काय आहे?

‘आत्मा विकणं’ ही काही काल्पनिक प्रक्रिया नाहीय. स्वत:ची बायको, आईबाप, मुली विकणं यापेक्षा आत्मा विकणं अधिक ठोस सत्य आहे. समुद्राचा आत्मा त्याची गाज असते तसा माणसाचा आत्मा त्याच्यातला निसर्ग असतो. आजकाल माणसाचा जन्मच निसर्गाशी फारकत घेत होतो. मग आयुष्यभर आधुनिक सुखसोयींसाठी निसर्गाची वाताहत करत तो स्वत:चा आत्मा कणाकणाने सैतानाला विकत राहातो. संपूर्ण नष्ट होईपर्यंत. आपण जन्माला आल्यापासून ज्या सैतानाच्या उपकारांवर जगतो त्या सहस्रावधी चेहर्‍यांच्या या उपकारकर्त्याचा ‘कोविड’ हा फक्त एक चेहरा आहे. मग उर्वरित सहस्रावधी चेहरे ज्या विनम्रपणे आपण स्वीकारले त्याच विनम्रपणे कोविडला शरण न जाता आपण अस्वस्थ का व्हावं?

कोविडमुळे का कोणाला व्हल्नरेबल, असहाय, एकाकी वाटावं?माणूस व्हल्नरेबल, असहाय, एकाकी नव्हता कधी? जोपर्यंत एखाद्याचं सारं सुरळित चालू असतं, त्याची कोणाकडूनही काही अपेक्षा नसते, तोर्यंतच तो व्हल्नरेबल, असहाय, एकाकी नसतो. ज्यांना कोविडच्या काळातच ते व्हल्नरेबल, असहाय, एकाकी असल्याची जाणीव झाली असेल ते खरोखरच नशीबवान. कारण कोविड येईपर्यंत त्यांना त्याची जाणीवही होऊ नये एवढं सुखासीन आयुष्य ते जगत होते. - आणि त्यांचं वैचारिक दारिद्ˆय एवढं भयंकर की कोविडच्या काळात त्यांना तसं काही जाणवू नये म्हणून स्वत:च्या जिवावर उदार झालेले अगणित कार्यकर्ते, पोलीस, डॉक्टर, कर्मचारी, विक्रेते आणि असंख्य सेवक त्यांना दिसू नयेत. एवढे ते आत्मकेंद्री. त्यांची कोविडने थोडी कोंडी केली म्हणून कोणी का अस्वस्थ व्हावं?

जसे ग्रीक आले गेले. मग तुर्क, अफगाण, मोगल, मंगोल, शक, कुशाण आले-गेले, राहिले-रिचले. तसाच कोविड आला. थोडा राहिल, थोडा जाईल, थोडा रिचेल. दोन्ही महायुद्धात इंग्लंड वाचवण्यासाठी लढताना लाखो भारतीयांनी मरण पत्करलं. कोणी काही बोलतं त्यांच्याबद्दल? दुसर्‍या महायुद्धात ब्रिटिशांच्या जिभेचे चोचले पुरवायला भारतात इंग्रजांनी निर्माण केलेल्या कृत्रिम दुष्काळात किती लाख भारतीय मृत्यूमुखी पडले याचे आकडे अमर्त्य सेनांनी ओरडून सांगितले. ते आहेत कुठल्या पाठ्यपुस्तकात? आजच्या आपल्या इतिहासात जसा आणि जेवढा ब्रिटिशांचा कोविडसम इतिहास आहे तसा आणि तेवढाच आत्ताच्या कोविडचा राहिल. समुद्र पार करणार्‍या जहाजावर एक कप्तान असतो. त्याशिवाय अधिकारी, खलाशी, उंदीर आणि झुरळंही असतात. पण जहाज चालतं ते फक्त कप्तानाच्या आदेशानुसार. ते सात समुद्र पार करतं, असंख्य किनारे गाठतं किंवा भरकटून, आदळून, फुटून बुडतं तेही कप्तानाच्या आदेशामुळे. पण ते जहाजावरल्या प्रत्येकाच्या कर्माचं फळ असतं. कर्म जहाज निवडण्याचं, सैतानाचा चेहरा निवडण्याचं, स्वत:चा आत्मा विकण्याचं. बुद्ध, झेन, गीतेतलं तत्त्वज्ञान हेच सांगतं. पण अशा वादळातही, युद्धातही सैतानाच्या नजरेसमोर कित्येक चित्रकार, मूर्तीकार, कवी, लेखक, संगीतकार सैतानाला आत्मा विकण्याचं नाकारून निसर्गासोबत युगानुयुगं सृजन करत राहिल्याचं दिसतं. निसर्गाचं रूप, रंग, नाद टिपत, जपत सहसृजनानं त्याची नोंद करणं एवढीच तर असते कला. एवढंच असतं निसर्गाला दाद देणं आणि सैतानाच्या ‘अरे’ ला ‘का रे’ विचारणं! सुचायला कला म्हणजे कल्पना नसते. कला लखलखीत सत्य असते. सूर्याच्या तेजासारखी, मातीच्या वासासारखी. ती सुचावी लागत नाही, आत्मा जिवंत असला तर ती आपोआप टिपली जाते आणि परत उमटते. रंगातून, छिन्नी हातोड्यातून, लेखणीतून, पोलादी तारेतून, सोललेल्या त्वचेतून सुद्धा. व्ही.एस.गायतोंडे समुद्र आणि आकाशात तासन्तास काय बघत बसायचे हे त्यांची चित्रं बघून ज्याला कळेल, त्याला कला आकळेल. कलाकार कसा असतो ते समजेल. संघर्षाच्या काळात अधिक सकस कलानिर्मिती का होते ते ही उमगेल. - यात अस्वस्थ होण्यासारखं काय आहे?

कोविड आला तेव्हा एका टेकाडाच्या जवळजवळ माथ्यावर असलेलं माझी घर विकायला मी आलो होतो. विकत घेणार्‍याला कोविडने येऊ दिलं नाही. कोविडने मला या घराबरोबर टेकाडावर कोंडलं. ठरवलेलं सारं फिस्कटलं. आर्थिक, व्यवहारिक गणित कोलमडलं. पण कोविड नसतानाही वर्षानुवर्षं हे असंच होत आलंय. कोविडमुळे वेगळं एवढंच झालं की वर्षभर मी इथेच अडकलो. मग कामधंदा विसरून भर उन्हाळ्यात अन्नपाणी शोधणारे प्राणी-पक्षी पाहात बसलो. पावसाळ्याआधी लगबगीने घरटी बांधणार्‍या बया पाहिल्या. पावसात नाचणारे मोर पाहिले. साप आणि मुंगूस पाहिले. टपलेल्या घारी पाहिल्या. कुत्र्यामांजरांना पिले होताना पाहिली. प्रत्येक ऋतूत फुलणारं, कोमेजणारं, सुकणारं रान पाहिलं. वणवे पाहिले. काम नसलेले कामगार पाहिले. उपाशी बेरोजगार पाहिले. खेळायला कोणी नाही म्हणून कुत्र्यामांजराबरोबर, त्यांच्या पिल्लांबरोबर खेळाणारा, लोळणारा, त्यांना मिठ्या मारणारा, तीन-चा वर्षांचा, मराठी-हिंदी-इंग्लिश-रशियन बोलणारा मुलगा पाहिला. आणि त्यांच्यासोबतच मोठा होणारा एक रखवालदाराचा मुलगा. फक्त हिंदी बोलणारा. कुत्री, मांजरं, पिल्लं आणि दोन्ही मुलांना आजोबा एकत्र खाऊ देताना पाहिलं. त्या सार्‍यांसाठी उंच पतंग उडवताना... आणि एका रखवालदाराची लहानगी मुलगी, लहान मुलांच्या स्कूटरपासून मोठ्या माणसांच्या स्कूटरपर्यंत काहीही चालवणारी. कामगारांचे डबे पोहोचवणारी. रस्त्यावर खडूने मोर काढून ‘मोर’ असं लिहिणारी. दिवाळीत रस्त्यावर रांगोळी काढणारी. असं खूप काहीबाही. मृत्यूू, आजार, शोक, आक्रोश, वाद, संवाद होताच भोवताली. पण कोविड नव्हता तेव्हा नव्हता का तो? हे सारं नित्य नियमित घडतंच असतं. कोणी स्वत:च्या आयुष्याचं कप्तान नसतं. पण यात अस्वस्थ होण्यासारखं काय आहे?महिनोन्महिने राहायचोच जहाजाच्या पोलादी परिघात. समुद्राच्या वेढ्यात. लाटा असायच्या. वादळं असायची. दोन किनार्‍यांच्या दरम्यान खोल समुद्र असायचा. लोखंडी जहाज सहज बुडवू शकणारा. पण आभाळात सीगल आणि समुद्रात डॉल्फिन दिसायचे दिवसा साथ देणारे आणि रात्रीच्या अंधारात लुकलुकणारे तारे.

गेलं ते वर्ष फार वेगळं नव्हतं.वेगळं एवढंच जाणवलं की या डोंगरावर एक म्हातारा कुत्रा भेटला. या डोंगरातच जन्मलेला. झाडाखाली, मातीत, सावलीत कुठंतरी पडून असतो दिवसभर. दिवसाच्या कुठल्याही वेळी मी पाय मोकळे करायला बाहेर पडलो की कुठूनतरी तो आळस देत उठतो. दुखरे सांधे मोकळे करत तो मी जाईन तिथपर्यंत येतो. परत घरासमोर सोडतो. मी दार लावलं की न थांबता निघून जातो. कुठल्यातरी सावलीत परत सावली होऊन पडतो. मी त्याला खायला देत नाही. हातही लावत नाही. चालता चालता बोलतो फक्त त्याच्याशी. तो ही बोलतो. त्याच्या भाषेत. इथली माणसं त्याला पांडू म्हणतात. त्याचं अख्खं नाव पांडुरंग असेल असं मला वाटतं. तो बाहेर उभा असताना मी दार लावतो, तेव्हा फक्त मला अस्वस्थता जाणवते.

alekh.s@hotmail.com

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत