‘एल निनो’चा बागुलबुवा कितपत?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2017 23:38 IST2017-04-25T23:38:10+5:302017-04-25T23:38:10+5:30
बळी राजाला मॉन्सूनची चिंता सतावत असते. त्यात ‘एल निनो’च्या भीतीचा बागुलबुवा उभा केला जातो.

‘एल निनो’चा बागुलबुवा कितपत?
बळी राजाला मॉन्सूनची चिंता सतावत असते. त्यात ‘एल निनो’च्या भीतीचा बागुलबुवा उभा केला जातो. परंतु यंदा कमी पावसाची शक्यता जवळपास नसल्यात जमा असल्याने घाबरून जाण्याचे कारण नाही.
भारताच्या एकूण वार्षिक पावसात ७० टक्के वाटा हा एकट्या मॉन्सूनचा (नैऋत्य मोसमी वारे) आहे. देशातील २६३ दशलक्ष शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि त्यांची पिके हे या मॉन्सूनवरच अवलंबून असतात. त्यामुळे घडणार की बिघडणार यंदाचा मान्सून, हा प्रश्न सध्या सर्वांना सतावू लागला आहे.
शेतकऱ्याला मॉन्सूनची जास्त काळजी वाटत आहे. मॉन्सूनचा संबंध थेट राष्ट्रीय उत्पादन आणि प्रगतीशी असल्याने सर्वांना काळजी वाटणे स्वाभाविक आहे. सामान्य पाऊस होणे हे देशाच्या शेतीसाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण देशातील फार मोठी शेतजमीन ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. अशावेळी ‘एल निनो’चा बागुलबुवा कितपत करावा हादेखील प्रश्न शेतकऱ्यांना सतावतो आहे.
यंदा मॉन्सून सरासरीएवढा राहणार आहे. तसेच पावसाचे प्रमाण ९६ टक्क्यांपर्यंत राहील, असा पहिला अंदाज आयएमडीचे महासंचालकांनी जाहीर केला आहे. हवामान विभागाच्या वर्गीकरणानुसार जर मॉन्सून ९६ ते १०४ टक्के यादरम्यान झाला तर तो सरासरी मानण्यात येतो. गेल्या वर्षी देशात १०६ टक्क्यांचा आयएमडीचा अंदाज होता, मात्र प्रत्यक्षात ९५ टक्क्यांपर्यंत पाऊस झाला होता. ‘स्कायमेट वेदर’ या संस्थेने भारतामधील यंदाच्या पावसाचे (मॉन्सून) प्रमाण सरासरीपेक्षा कमी (९५ टक्के) असेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. हे अंदाज ‘एल निनो’ व ‘ला निनो’ यांच्या आधारावर आहेत. स्कायमेटच्या अंदाजानुसार या वर्षी देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता शून्य आहे. तूर्त अल निनोचा प्रभाव जून, जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर काळात राहणार नसल्याने पाऊसकाळ सुरळीत पार पडण्याची आशा निर्माण झाली आहे.
‘आॅस्ट्रेलियन ब्युरो आॅफ मेटेओरॉलॉजी’च्या (एबीएम) माहितीनुसार २०१७मध्ये एल निनो परिस्थिती घडण्याची शक्यता साधारणत: ५० टक्के असेल. तथापि अल निनोची परिस्थिती आॅगस्टच्या अखेरीस निर्माण झाली तर त्याचा परिणाम नकारात्मक नसूही शकेल, असेही आॅस्ट्रेलियन ब्युरो आॅफ मेटेओरॉलॉजीचे म्हणणे आहे. परिणामी मॉन्सून उशिरा येईल असा त्यांचा अंदाज आहे.
खरं तर उगीचच ‘एल निनो’च्या भीतीचा बागुलबुवा उभा केला गेला आहे. पेरू या देशाजवळ, प्रशांत महासागरात पूर्वेला पाण्याचा प्रवाह जास्त गरम झाला की बाष्पीभवन जास्त होऊन पाऊस आधीच समुद्रात कोसळून जातो व मॉन्सून खराब होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे निम्म्या वेळा काहीही प्रभाव न दाखविणारा एल निनो प्रवाह १९९७मध्ये सर्वात उष्ण असतानादेखील भारतातील मॉन्सूनवर काहीच फरक पडला नव्हता.
‘एल निनो’ हा पेरूच्या पश्चिमी किनारपट्टीपासून २०० किलोमीटर दूर उत्तरेकडून दक्षिण दिशेला वाहणारा सागरी प्रवाह आहे. एल निनो व त्याचा भारतीय मॉन्सूनवर होणारा परिणाम याबाबत वेगवेगळे वैज्ञानिक मतप्रवाह आहेत. ‘एल निनो’ भारतीय मॉन्सूनला फायदा देतो, त्यामुळे ‘भारतासाठी वरदान’ आहे, असाही काही वैज्ञानिकांचा मतप्रवाह आहे. गरम पाण्याचे बाष्पीभवन झाल्याने साऱ्या बाष्पाचा पाऊस पूर्वेला पेरूजवळच न पडता काही बाष्प भारत भूमीवर पावसाच्या रूपाने कोसळून शेतीला हातभार लावतात.
जेव्हा देशाच्या २० टक्के ते ४० टक्के भूभागात १० टक्केपेक्षा कमी पाऊस होतो तेव्हा दुष्काळ पडला असे म्हटले जाते. कागदी आकडे पाहता १० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस तोही २० ते ४० टक्के भूभागात पडण्याची शक्यता यावर्षी जवळपास नाही. त्यामुळे ९५ टक्के पावसाच्या मॉन्सून अंदाजाने घाबरण्याचे मुळीच कारण नाही. ९५ टक्के पावसाचा दिला गेलेला अंदाज म्हणजे यंदा दुष्काळ आहे असा त्याचा अर्थ मुळीच निघत नाही. त्यामुळे एल निनोचा बागुलबुवा करत शेतकऱ्यांनी उगीचच घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. असे असले तरी केलेली पाणी बचत ही फायद्याचीच ठरणार आहे.
- किरणकुमार जोहरे
(लेखक हवामानाचे अभ्यासक आहेत.)