लोकप्रश्नांचे काय? ते बोला ना भाऊ..

By किरण अग्रवाल | Published: September 25, 2022 11:01 AM2022-09-25T11:01:49+5:302022-09-25T11:02:34+5:30

What about public questions : मेळावे पक्ष-संघटनावाढीसाठी होत आहेत, की एकमेकांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर व इशारे देण्यासाठी? यासंबंधीचा संभ्रम निर्माण व्हावा अशीच एकूण स्थिती आहे.

What about public questions? Don't say that bro.. | लोकप्रश्नांचे काय? ते बोला ना भाऊ..

लोकप्रश्नांचे काय? ते बोला ना भाऊ..

Next

-  किरण अग्रवाल

पक्षीय मेळाव्यांनी सध्या जोर धरला असून, त्यानिमित्त विविध खात्यांचे मंत्री जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या खात्याकडून असलेल्या अपेक्षांवर यावेळी चर्चा होऊन काही पदरात पाडून घेता येईल का, हे बघितले जाऊ शकते; पण राजकीय आरोप- प्रत्यारोपांतच अधिक वेळ जाताना दिसतो आहे.

 

पक्षकार्य हे त्या त्या पक्षासाठी केले जात असले तरी अंतिमतः ते लोकहितासाठीच अपेक्षित असते; पण हल्ली पक्षांच्या मेळाव्यात राजकीय फुलबाज्याच अधिक पेटताना दिसतात. त्यामुळे त्यातून भूमिकांची अगर विचारधारेची स्पष्टता होण्याऐवजी केवळ राजकीय राळ उडताना दिसते, ज्यातून मतदारांचेच काय, कार्यकर्त्यांचाही संभ्रमच वाढीस लागावा.

 

संपूर्ण वऱ्हाडात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे गटांचे मेळावे होत असल्याने राजकीय वातावरण घुसळून निघत आहे. विशेषतः या मेळाव्यांमध्ये परस्परांवर राजकीय प्रहार केले जात असल्याने पावसाळ्याच्या वातावरणातही राजकीय उष्मा वाढून गेला आहे. हे मेळावे पक्ष-संघटनावाढीसाठी होत आहेत, की एकमेकांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर व इशारे देण्यासाठी? यासंबंधीचा संभ्रम निर्माण व्हावा अशीच एकूण स्थिती आहे.

 

अकोला जिल्ह्यातील आमदार नितीन देशमुख शिंदे गटाकडून पुन्हा ठाकरेंकडे परतल्याने येथील शिंदे गट ईर्षेने कामाला लागलेला दिसत आहे. मागे खासदार श्रीकांत शिंदे व प्रवीण दरेकर अकोल्यात येऊन गेले, त्यांच्या उपस्थितीत शिंदे गटाने शक्तिप्रदर्शन घडविले होते; त्यानंतर नुकताच माजी केंद्रीय मंत्री, खासदार अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचा मेळावा पार पडला. महाराष्ट्राच्या इतिहासात कधी झाले नाही एवढे घाणेरडे राजकारण आता झाल्याचे सांगत सावंत यांनी भाजपवर आरोप केले. त्यानंतर मंत्री संदीपन भुमरे, अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत शिंदे गटाचा मेळावा झाला. त्यात स्वाभाविकपणे ठाकरे सेनेवर टीकेची झोड उठविली गेली. राजकारणातील अस्तित्वाच्या लढाईसाठी होणारे असे आरोप- प्रत्यारोप समजून घेता येणारे असले तरी, यात कार्यकर्त्यांखेरीज सामान्य लोकांना स्वारस्य असण्याचे कारण नाही. मात्र ज्या पद्धतीने आरोप-प्रत्यारोप झाले, ते पाहता राजकारण कुठल्या वळणावर चालले आहे हे लक्षात यावे.

 

बुलडाण्यातील खासदार व दोन्ही आमदार शिंदे गटात गेल्याने शिवसेना सावरण्यासाठी ठाकरे गटाकडून तालुकानिहाय मेळावे घेतले जात आहेत. मागे झालेल्या अशा एका मेळाव्यात समोरच्यांकडून कशी हाथापाई झाली, ते साऱ्यांनी पाहिले. त्यानंतर अंबादास दानवे यांच्या उपस्थितीतही मेळावा झाला व त्यात या हाथापाईचा समाचार घेतला गेला. सत्तेतील लोकच रस्त्यावर दादागिरी करत असल्याचा आरोप दानवे यांनी यात केला होता. या परस्परांवरील आरोप- प्रत्यारोपांमुळे जिल्ह्यातील वातावरण तापले आहे.

 

वाशिममध्येही तेथील खासदार शिंदेंसोबत आहेत, त्यामुळे सामान्य शिवसैनिक कोणता झेंडा घेऊ हाती म्हणून संभ्रमावस्थेत आहेत. दोन्ही बाजूंनी जोरदार प्रयत्न व रस्सीखेच सुरू आहे. दोघांकडून मुंबईतील नेत्यांकडे शक्तिप्रदर्शन केले गेले. नुकताच शिंदे गटाचा हिंदू गर्व गर्जना मेळावा झाला. आता ठाकरे गटाकडून मोर्चाची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातही वातावरण ढवळून निघाले आहे.

 

सारांशात, जागोजागी राजकीय मेळाव्यांनी जोर धरला असला तरी त्यात लोकांच्या प्रश्नांवर अपवादानेच चर्चा होताना दिसते, जणू लोकांचे प्रश्न संपलेत. सारी आरोप-प्रत्यारोपांचीच राळ उडते आहे. पक्ष-संघटनेच्या विस्तारासाठी कार्यकर्त्यांचा उत्साह टिकवून ठेवण्याकरिता तसे होत असेल; पण त्यातून कसले लोकहित साधले जाणार, हा प्रश्नच आहे.

Web Title: What about public questions? Don't say that bro..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.