पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर नरेंद्र मोदी हे या देशाचे सर्वात सशक्त पंतप्रधान आहेत, हे मान्य करायलाच हवे. देश आणि परदेश या दोन्ही पातळींवर हे खरे आहे. परंतु यात एक मोठा फरकही आहे. नेहरू यांच्या काळात काँग्रेसचा संपूर्ण देशात बोलबाला होता व विरोधी पक्षही मजबूत नव्हते. तरी विरोधी पक्षांमधील काही नेते एवढे प्रभावी होते की संसदेत ते सरकारला सळो की पळो करीत. नेहरूंच्या काळात त्यांना विरोध करू शकणारे एकटे सरदार वल्लभभाई पटेलच नव्हते. श्यामाप्रसाद मुखर्जी, हिरेन मुखर्जी, ए. के. गोपालन, राममनोहर लोहिया, जे. बी. कृपलानी, गोपीनाथ बारदोलाई आणि फिरोज गांधी अशा नेत्यांचे व्यक्तिमत्त्व एवढे उत्तुंग होते की, त्या सर्वांचे म्हणणे नेहरू गांभीर्याने विचारात घेत असत. इंदिरा गांधींच्या काळात जनसंघाचे अटल बिहारी वाजपेयी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे के. पी. राममूर्ती व ज्योती बसू संसदेत कमालीचे प्रभावी ठरत असत. त्या काळात विरोधी पक्षांमध्ये मोरारजी देसाई, जयप्रकाश नारायण, मधू लिमये, जॉर्ज फर्नांडिस, मधू दंडवते, मोहन धारिया, कृष्णकांत आणि शरद यादव यांच्यासारख्या प्रभावी नेत्यांचा गट होता. त्यामुळे विरोधी पक्ष संख्याबळाने कमी असूनही विरोधकांची उणीव भासत नसे.मोदी हे या देशाला मिळालेले तिसरे सर्वात सशक्त पंतप्रधान असले तरी आजची परिस्थिती नेमकी उलटी आहे. नावे घ्यायला विरोधी पक्षांकडे आज अनेक बडे धुरंधर नेते आहेत, पण वास्तवात मोदींना कोणत्याही स्तरावर आव्हान देऊ शकेल असा त्यांपैकी एकही नाही. भारतीय जनता पार्टी व नरेंद्र मोदी यांना जर कुणी आव्हान देऊ शकत असेल तर ती एकमेव काँग्रेस आहे. पण दुर्भाग्य असे की, आज काँग्रेसमध्ये नेत्यांची काही वानवा नाही, कमतरता आहे ती कार्यकर्त्यांची! आपल्याकडे जे नेते आहेत ते नेमके काय करतात? त्यांचा पक्षाला किती उपयोग आहे, याचा विचार सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी करायला हवा. खरे तर काँग्रेस पक्षाची आज अशी शोचनीय स्थिती का झाली, हा गंभीर चिंतेचा विषय असायला हवा. मला आठवते की, पूर्वी काँग्रेस पक्षातील निवडणुका पूर्ण प्रामाणिकपणे व्हायच्या. वॉर्ड, ब्लॉक, पंचायत, जिल्हा आणि राज्य अशा सर्व पातळ्यांवर त्या निवडणुकांमध्ये कार्यकर्ते सक्रिय असायचे. १९८० च्या दशकापासून बड्या नेत्यांनी हळूहळू पक्षाची पदे निवडणुकीऐवजी नियुक्त्यांनी भरायला सुरुवात केली आणि पक्षात एक प्रकारची पठ्ठेबाजी पसरू लागली. येथूनच समस्या सुरू झाली. काँग्रेस, युवक, महिला काँग्रेस, सेवा दल, एनएसयूआय इत्यादींमध्ये नियुक्त्यांना धंद्याचे स्वरूप आले.दुसरीकडे याच काळात भारतीय जनता पार्टीने आपला भक्कम पाया रचला. पडद्यामागून सूत्रे हलविणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेटवर्क तयार होतेच. त्याचा फायदा भाजपाला मिळाला. पूर्वी काँग्रेस सेवा दलाच्या शाखा भरत. हळूहळू त्या बंद झाल्या. काँग्रेसच्या नेत्यांना हे कळलेच नाही की, नेहरू-गांधी कुटुंबावर लोकांचे प्रेम आहे, त्यांचे लोकांना आकर्षणही आहे; पण कार्यकर्त्यांनीच पाठ फिरविल्यावर पक्षात उरणार काय? मी जरा जास्तच कठोर बोलतोय, पण काँग्रेसला इतर कुणी नाही तर काँग्रेसवाल्यांनीच खरे संपविले, ही वस्तुस्थिती आहे. १९७७ मध्ये इंदिरा गांधी यांचा दारुण पराभव झाला तेव्हा त्यांनी कार्यकर्त्यांची भक्कम फळी उभारूनच पलटवार करून पुन्हा सत्ता काबीज केली होती. आज राहुल गांधी मेहनत करत आहेत, पण त्यांच्यासोबत मैदानात उतरणारे पक्षाचे इतर नेते किती आहेत? वृत्तपत्रांमधून आणि टीव्हीवर चर्चा करणे सोपे आहे पण प्रत्यक्ष मैदानात उतरणे महाकठीण आहे. आणखी असे की, दिल्ली व मुंबई या दोन्ही ठिकाणी सत्ता होती तेव्हा काँग्रेसने कार्यकर्त्यांची व योग्य नेत्यांची बूज राखली नाही. आजही काँग्रेसचे नेते सहजपणे भेटत नाहीत. राहुल गांधी हे सर्वात तरुण नेते असूनही देशातील तरुणवर्ग त्यांच्याऐवजी मोदींच्या बाजूने का आहे, हा विचार माझ्या मनात नेहमी येतो. मोदी लाट थोपवायची असेल तर या प्रश्नाचे उत्तर संपूर्ण काँग्रेस पक्षाला शोधावे लागेल. काँग्रेस सोडली तर मोदींची लाट थोपवू शकेल, अशी ताकद अन्य कोणत्याही पक्षात नाही. प्रादेशिक पक्षांची स्थिती प्रायव्हेट लिमिटेड कंपनीपेक्षा वेगळी नाही. त्यांच्यासाठी राजकारण हा केवळ धंदा आहे. गरिबांची हितरक्षक म्हणविणारी कम्युनिस्ट पार्टी ही हळूहळू संपुष्टात येत चालली आहे. विरोधी पक्ष कमजोर झाले की त्या देशातील लोकशाही धोक्यात येते, असे जगभरातील राजकीय पंडित सांगतात. मग मोदींच्या उदयाने भारतातही तशीच परिस्थिती आली आहे का? सध्या तरी असे म्हणणे घाईचे ठरेल, कारण आपली लोकशाही एवढी मजबूत आहे की एखाद्याची लाट आल्याने ती अशी धोक्यात येणार नाही. हे मात्र खरे की, विरोधी पक्ष आणखी बराच काळ असेच कमजोर राहिले तर परिस्थिती आणखी नाजूक होत जाईल. भारतीय जनता पार्टी, संघ अथवा मोदी आणि अमित शाह यांच्या नावे बोटे मोडून किंवा मतदानयंत्रांवर खापर फोडून काही होणार नाही! गरज आहे ती विरोधी पक्ष मजबूत होण्याची. काँग्रेसलाच ही जबाबदारी घ्यावी लागेल. पण प्रश्न असा आहे की, काँग्रेस स्वत:च मजबूत नसेल तर तिच्या बरोबर इतर विरोधी पक्षांपैकी येणार कोण आणि जनता तरी कसा विश्वास टाकणार? मग काय मोदींची ही लाट अशीच सुरू राहील? लोकांचा सरकारविषयी भ्रमनिरास व्हायला दीड वर्षापेक्षा जास्त वेळ लागत नाही, असा प्रख्यात समाजशास्त्रज्ञ आशिश नंदी यांच्या सिद्धांतावर विरोधी पक्ष विसंबून राहिला आहे की काय, असे वाटते. पण मला वाटते की, सध्या तरी हा सिद्धांत गैरलागू ठरत आहे. त्यामुळे दुसरे कुणी दुबळे होण्याची वाट न पाहता विरोधी पक्ष जोपर्यंत स्वत:हून मजबूत होणार नाहीत तोपर्यंत ही लाट सुरू राहील!
हे लिखाण संपविण्यापूर्वी....अण्वस्त्र हल्ला झाला तरी त्यापासून माणसांचे संरक्षण करू शकेल, अशा उपकरणांची मागणी जपानमध्ये अचानक वाढली आहे. यातील एक उपकरण आहे ‘अॅटॉमिक शेल्टर’, ज्यात लपून बसता येते. दुसरे आहे ‘एअर प्युरिफायर’ जे किरणोत्सर्गापासून बचाव करते. गेल्या वर्षी जपानमध्ये फक्त १० ‘शेल्टर’ विकले गेले होते. पण यंदा फक्त एप्रिल महिन्यातच आठ ‘शेल्टर’ व ५० हून अधिक ‘प्युरिफायर’ विकले गेले आहेत. उत्तर कोरिया व अमेरिका यांच्यातील तणाव जसजसा वाढत आहे तशी जपानमधील चिंताही वाढत आहे. याचे कारण असे की, अण्वस्त्रांमुळे होणारा संहार आणि विनाश प्रत्यक्ष भोगलेला जपान हा जगातील एकमेव देश आहे. जपानी लोकांची ही भीती जग तिसऱ्या महायुद्धाकडे जात असल्याचे द्योतक म्हणावे का?विजय दर्डा(लोकमत पत्र समूहाचे चेअरमन)