आमचंबी ठरलं होतं !

By सचिन जवळकोटे | Published: October 13, 2019 06:14 AM2019-10-13T06:14:38+5:302019-10-13T06:16:05+5:30

लगाव बत्ती..

We were lucky! | आमचंबी ठरलं होतं !

आमचंबी ठरलं होतं !

Next

- सचिन जवळकोटे

तिकीट मिळेपर्यंत ‘आमचं ठरलंय...आमचं फिक्सच असतंय...’ अशी भाषा करणारी मंडळी जेव्हा ‘हातात भोपळा’ पडला, तेव्हा पुरती जमिनीवर उतरली. ‘आमची परस्पर अ‍ॅडजेस्टमेंट असतेय...’ ही वरच्या नेत्यांची पॉलिसी ओपन झाली, तेव्हा संबंधीत मंडळी भलतीच हादरली, ‘आमचंबी ठरलं होतं, पण...’ म्हणत नेत्यांच्या नावानं कडाऽऽ कडाऽऽ बोटं मोडण्यात रमली.

अण्णा सेना’ की जय होऽऽ

एक काळ असा होता की, सोलापूर महापालिकेचा अख्खा कारभार मुरारजीपेठेतल्या ‘राधाश्री’वरून चालायचा. ‘तात्यां’नी रिमोट दाबला की ‘इंद्रभवन’मधली यंत्रणा हलायची. महापौर अन् स्टँडिंग नेता हे नावालाच कारभारी ठरायचे. अत्यंत कमी वयात शहराच्या प्रथम नागरिकाचा मान मिळविणाऱ्या ‘महेशअण्णां’चं राजकारण याच ‘मोनोपॉली’ वातावरणात फुललं...बहरलं. ‘मी म्हणेन तसंच व्हायला पाहिजे!’ ही ‘महेश-देवेंद्र’ जोडीची मानसिकता त्यांच्या चेल्या-चपाट्यांनी सातत्यानं कुरवाळत ठेवली; परंतु परिस्थिती बदलली की नेत्यानंही झटकन् स्वत:ला बदलून घेतलं पाहिजे, हे त्यांना कुणी सांगितलंच नाही. कदाचित याचाच परिपाक म्हणजे हक्काच्या मतदारसंघात त्यांच्यावर त्यांच्याच पार्टीनं परकेपणाचा शिक्का मारलेला.
‘बंडखोरी मागं घ्या’ असं जेव्हा या गटाला वारंवार सांगण्यात येऊ लागलं, तेव्हा ‘देवेंद्रदादा’ चिडून म्हणाले की, ‘उद्धोंच्या वरचे अजून कुणी असतील तर त्यांना पाठवून द्या आमच्याकडं...मग बघू !’ हा ‘व्हायरल’ मेसेज आपसूकच वरपर्यंत पोहोचला. (की वानकर-ठोंगे जोडगोळीनं पद्धतशीरपणे पाठविला ?) व्हायचं तेच झालं. पार्टी गेली, तिकीट गेलं. हाती ‘अपक्षत्व’ आलं.
आता या संकटसमयी जवळचे कोण, दूरचे कोण हे ‘अण्णां’ना समजू लागेल. एकेकाळी तासन्तास बंगल्याबाहेर ताटकळणारे आता कुणाचा ढोल वाजवत फिरतील, हेही लक्षात येऊ लागेल. हक्काच्या बँकेतूनही ‘फायनान्स’ करण्यासाठी ‘हंचाटे’सारखे सहकारी मागं-पुढं करतील, तेव्हा ‘सत्ता’ किती महत्त्वाची असते, हे कळू लागेल. ‘पॉलिटिकल मॅच्युरिटी’ नसलेल्या भावकीच्या हाती सूत्रं गेली की आपलाही ‘राणे’ होऊ शकतो, हे जाणवू लागेल; मात्र असं असलं तरीही ‘कोठे’ घराण्याच्या मागं ‘तात्यां’च्या नावाची खूप मोठी पुण्याई. याही राजकीय विजनवासातून कदाचित बाहेर पडतील ते. तोपर्यंत लगाव बत्ती...!

बरं झालं... आबा उभारलेच नाहीत !

सध्या सांगोल्यात दोनच गोष्टींची चर्चा. पहिली खळाळून वाहणाऱ्या ओढा-नाल्यांची...अन् दुसरी राजकीय दुष्काळात सापडलेल्या दीपकआबांची. ‘ए-बी’ फॉर्म असूनही ‘दीपकआबां’ना निवडणुकीतून ‘एक्स-वाय-झेड’ व्हावं लागलं. याचं शल्य त्यांच्या कट्टर कार्यकर्त्यांना लागून राहिलंय. मात्र ‘बरं झालं...आबा उभारलचे नाहीत’ अशीच समाधानी कुजबूज तिन्ही गटात सुरू झालीय. 
पहिला गट ‘गणपतआबां’चा. ‘घड्याळा’च्या चिन्हावर जेवढी मतं ‘दीपकआबां’नी खाल्ली असती, तेवढा फटका देशमुख डॉक्टरांनाच बसला असता. त्यामुळं हा गट खुश.
दुसरा गट ‘शहाजीबापूं’चा. घड्याळाचे काटे मोडीत काढून ‘दीपकआबां’नी व्यासपीठावर ‘बापूं’च्या नावांचा गजर केला. त्यामुळं वर्षानुवर्षे चांगल्या निकालाच्या प्रतीक्षेत असणारा ‘बापू’ गट यंदा पुरता हरखला.
तिसरा गट खुद्द ‘दीपकआबां’चा. आर्थिक परिस्थिती चांगली असू दे किंवा नसू दे...प्रत्येक इलेक्शन लढविण्याची नेत्याची खुमखुमी खालच्या कार्यकर्त्यांसाठी मात्र ठरत असते कधी-कधी त्रासदायक. त्यामुळं त्यांच्या शिक्षण संस्थेतले कैक पगारी नोकरदारही हळूचपणे एकमेकांना मेसेज टाकत अभिनंदन करू लागले, ‘बरं झालं...यंदा आबा उभारलेच नाहीत !’

संजयमामा.. संजयभाऊ.. अन् संजयबाबा..

सध्या माढा अन् करमाळा तालुक्यात एकाच नावाचा लय बोलबालाऽऽ. तो म्हणजे ‘संजय!’ ‘दीदी अन् आबां’च्या भांडणात आपलं टारगेट पूर्ण होईल, या भूमिकेत निमगावचे ‘संजयमामा’.. ‘आता दीदी गेल्या, मामाही गेले..    यापुढं घड्याळावर आपलंच राज्य,’ म्हणत ‘घाटणे’च्या ‘संजयभाऊं’नीही आपला गजर केला. मात्र शेवटच्या क्षणी ‘अजितदादा अन् संजयमामा’ यांच्यातले सख्य पुन्हा एकदा जगाला कळून चुकलं.
एकेकाळी ‘संजयमामां’चे जिगरी मित्र असलेल्या ‘संजयभाऊं’नी मधल्या काळात पक्ष अनुभवले. अनेक संघटना बघितल्या; परंतु असलं ‘लबाडी राजकारण’ म्हणे त्यांनी प्रथमच पाहिलं. असो. करमाळ्यात या दोन ‘संजय’ नावांची चर्चा सुरू असतानाच माढ्यातही अजून एक ‘संजयबाबा’ सध्या फिरु लागलेत. ‘दादा व्हर्सेस बाबा’ लढतीकडं साऱ्या जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलंय.

(लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)

Web Title: We were lucky!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.