- देवेंद्र दर्डा(व्यवस्थापकीय संचालक, लोकमत माध्यम समूह)
आजचे जग व्यक्तिगत आवडी-निवडीचा हक्क जपण्यासाठी विशेष आग्रही आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकांना त्यांच्या आहारविषयक सवयींचा पुनर्विचार करण्यास सांगणे ही संवेदनशील बाब आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे. तरीही माझा युक्तिवाद कोणत्याही धार्मिक दृष्टिकोनातून नसून विज्ञान, करुणा आणि सामूहिक जबाबदारी या मूल्यांवर आधारलेला आहे.
मांसाहार कमी करणे हे आपल्या पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी उचलले पाहिजे असे एक महत्त्वाचे, परिणामकारक पाऊल आहे. यामुळे पाण्याचा वापर अधिक जबाबदारीने होईल, जगभरातल्या अर्धपोटी आणि उपाशी लोकांसाठी अन्नाची उपलब्धता वाढवता येईल आणि समाजातील शांतता, सौहार्द वाढीला लागू शकेल.
सध्या जगातील ८० टक्क्यांहून अधिक शेतीयोग्य जमीन जनावरांच्या चरण्यासाठी किंवा त्यांना लागणाऱ्या खाद्यपदार्थांच्या लागवडीसाठी वापरली जाते. तरीदेखील त्यातून मिळणारा परतावा अत्यंत कमी आहे. उदाहरणार्थ, केवळ गोमांसाच्या उत्पादनासाठीच यातली ६० टक्के जमीन वापरली जाते; मात्र गोमांस जगाच्या आहारातील केवळ ४ टक्के उष्मांकांची (कॅलरी) गरज पूर्ण करते. याचा अर्थ असा की, गुरांना खाऊ घालण्यासाठी जे काही पिकवावे लागते, त्यापैकी ९६ टक्के प्रत्यक्षात वाया जाते. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारे वाया गेलेले अन्न जगभरातील ३५० कोटी लोकांची भूक भागवू शकते.
पाण्याच्या वापराचे चित्रही असेच धक्कादायक आहे. जनावरांच्या पालनपोषणासाठी लागणाऱ्या चाऱ्याची लागवड, सिंचन आणि प्रक्रिया यासाठी जगातील साधारण २० ते ३३ टक्के गोड्या पाण्याचा वापर केला जातो. एक किलो गोमांस तयार करण्यासाठी १५ हजार लिटरपेक्षा जास्त पाणी लागते; मटणासाठी सुमारे ८,८०० लिटर; डुकराच्या मांसासाठी ६,००० लिटर आणि चिकनसाठी ४,३०० लिटर पाणी लागते.
या तुलनेत भाजीपाल्यासाठी प्रतिकिलो केवळ ३०० लिटर पाणी लागते. यातून हे स्पष्ट दिसते की, मांसाहार कमी करणे हा केवळ आहारातील बदलाचा प्रश्न नाही, तर अन्न आणि पाण्याच्या सुरक्षिततेसाठीही ते अत्यावश्यक आहे.
मांसाहाराचे हवामान बदलाशी असलेले थेट नाते (आणि परिणाम) भयंकर आहे. मांस आणि दुग्ध उत्पादन उद्योगाचा जागतिक हरितगृह वायू उत्सर्जनातील वाटा १५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. हे प्रमाण जगभरातील गाड्या, ट्रक, जहाजे आणि विमानांमुळे होणाऱ्या उत्सर्जनाइतकेच आहे. जगातील वीस सर्वांत मोठ्या मांस कंपन्यांकडून होणारे हरितगृह वायूंचे उत्सर्जन हे जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन किंवा ऑस्ट्रेलिया यांसारख्या संपूर्ण देशांच्या उत्सर्जनापेक्षा अधिक आहे. प्राणीजन्य पदार्थ अधिक असलेल्या मांसाहारामुळे शाकाहारी आहाराच्या तुलनेत जवळपास दुप्पट हरितगृह वायू उत्सर्जन होते. हवामान बदलाचा प्रश्न गांभीर्याने हाताळायचा असेल, तर हा मुद्दा दुर्लक्षित करता येणार नाही.
यानंतर येतो तो अर्थातच प्राणी कल्याणाचा प्रश्न. २०२३ या एका वर्षात मानवजातीने ८,४०० कोटींहून अधिक म्हणजेच रोज २३ कोटींहून अधिक जमिनीवर राहणारे (स्थलचर) प्राणी स्वत:च्या अन्नासाठी मारले. गेल्या काही वर्षांची आकडेवारी पाहता हे प्रमाण दरवर्षी वाढतच चालले आहे. अनेक कुक्कुटपालन केंद्रांमध्ये नर पिलांना जन्मल्यानंतर काही तासांतच ठार मारले जाते. कारण त्यांना आर्थिक किंमत नसते. गायीगुरांना बऱ्याचदा अरुंद पिंजऱ्यांमध्ये कोंबून ठेवले जाते. त्यांना जिवंत ठेवण्यासाठी सतत अँटिबायोटिक्स दिले जातात आणि त्यांच्या दुधावर डल्ला मारण्यासाठी पिलांना जन्मत:च आईपासून दूर केले जाते.
माणसाने खाण्यायोग्य प्राणी अधिक पुष्ट होऊन अधिक मांस मिळावे म्हणून त्यांना जबरदस्तीने खाऊ घालण्याचे, त्यासाठी त्यांचे डोके विशिष्ट प्रकारे जखडून ठेवण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे या प्राण्यांना अनेक प्रकारचे आजार होतात. अमेरिकेत वापरल्या जाणाऱ्या अँटिबायोटिक्सपैकी सुमारे ८० टक्के प्राण्यांसाठीच वापरली जातात. यामुळे मानवांमध्ये प्रतिकारशक्ती कमी होण्याचा व आरोग्याचा मोठा धोका आहे. ही क्रूरता सुसंस्कृत समाजाच्या मूल्यांनाच आव्हान देणारी आहे.
केवळ आपल्या जिभेचे चोचले पूर्ण करण्यासाठी आपण या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करणार आहोत का? हा विषय केवळ जिव्हालौल्य आणि आहाराचा नाही, तर स्वतःसाठी आणि पुढच्या पिढ्यांसाठी अधिक शहाणपणाने काही निर्णय घेण्याचा आहे. मांसाहार पूर्णपणे सोडला नाही, त्यावर फक्त नियंत्रण आणले तरीही हवामान बदलाशी लढण्यासाठी, पृथ्वीवरील मौल्यवान संसाधने जपण्यासाठी, जगभरातील उपाशी लोकांची भूक भागवण्यासाठी मोठा हातभार लागू शकेल. आजच्या स्वस्थ जगामध्ये करुणेची भावना रुजवण्यासाठीही ते महत्त्वाचे आहे.