पक्षसंघटना अन् सरकारचा जबरदस्त मेळ फडणवीस-पाटील जोडगोळीमुळे शक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 04:39 AM2019-07-18T04:39:49+5:302019-07-18T04:40:12+5:30

स्वत:च्या राहण्या-बोलण्यातून स्वयंसेवकत्व जपतानाच राजकारणातील व्यवहार सांभाळण्याचे कसब फार कमी स्वयंसेवक नेत्यांना जमते, आजच्या परिस्थितीत चंद्रकांतदादा त्याबाबत ‘अग्रेसर’ आहेत. ...

Volunteer Serving | पक्षसंघटना अन् सरकारचा जबरदस्त मेळ फडणवीस-पाटील जोडगोळीमुळे शक्य

पक्षसंघटना अन् सरकारचा जबरदस्त मेळ फडणवीस-पाटील जोडगोळीमुळे शक्य

Next

स्वत:च्या राहण्या-बोलण्यातून स्वयंसेवकत्व जपतानाच राजकारणातील व्यवहार सांभाळण्याचे कसब फार कमी स्वयंसेवक नेत्यांना जमते, आजच्या परिस्थितीत चंद्रकांतदादा त्याबाबत ‘अग्रेसर’ आहेत. सामान्य कार्यकर्त्यांशी त्यांनी नेहमीच नाळ जपली आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती ही तीन महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुका समोर ठेवून करण्यात आली आहे. केंद्रात राज्यमंत्री झाल्यानंतर रावसाहेब दानवे यांना प्रदेशाध्यक्षपद सोडावे लागणार हे अपेक्षितच होते.

दानवे यांची कारकिर्द यशस्वी ठरली, असेच म्हणावे लागेल. गेल्या पावणेपाच वर्षांत ग्रामपंचायतींपासून लोकसभेपर्यंत भाजपला जे दमदार यश राज्यात मिळाले, त्याचे श्रेय नि:संशय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जात असले, तरी त्यास पक्षसंघटनेची उत्तम साथ देण्याचे काम दानवे यांनी केले. आता त्यांच्या जागी चंद्रकांत पाटील आले आहेत. दोघेही भिन्न प्रवृत्तीचे नेते आहेत. दानवे यांनी वागण्या-बोलण्यातील रांगडेपण हे नीती म्हणून स्वीकारल्याचे जाणवायचे, तर चंद्रकांतदादा यांनी वागण्या-राहण्यातील साधेपणा हे नीती म्हणून स्वीकारल्याचे दिसते. चंद्रकांतदादा दिसतात, तितके साधे नक्कीच नाहीत. ‘हे मुख्यमंत्री सहा महिन्यांच्या वर टिकणार नाहीत,’ असे छातीठोकपणे सांगणाऱ्यांना देवेंद्र फडणवीस यांनी चारीमुंड्या चित तर केलेच, पण ‘मी पुन्हा येईन महाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी’ असा निर्धारही त्यांनी बोलून दाखविला. त्याचप्रमाणे, ‘मागच्या दाराने आलेल्या स्वयंसेवक चंद्रकांत पाटलांना राजकारणातलं काय कळतं’ असे हिणवणाºयांच्या गडांना हादरे देण्याचे काम चंद्रकांतदादांनी पश्चिम महाराष्ट्रात करून दाखविले. हिणवणारे हे लोक राजकारणाची मक्तेदारी असलेले घराणेशहा आहेत. त्यांना चंद्रकांतदादांनी धडकी भरविली. भाजप ज्या ठिकाणी तिसºया, चवथ्या क्रमांकावर असायचा, त्या पश्चिम महाराष्ट्रात क्रमांक एकवर आणण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांचा पिंड संघ स्वयंसेवकाचा आहे, पण हे स्वयंसेवकत्व जपताना राजकारणातील व्यवहारही ते तितकाच उत्तम साधतात.


‘चंद्रकांतदादांच्या दरवाजातून कोणीही विन्मुख जात नाही,’ असे कौतुक स्वत: मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केले होते. राजकारण हे राजकारणाच्याच अंगाने खेळायचे असते आणि ते खेळताना स्वयंसेवकामधील बुजरेपणा, नीतीनियम बाजूला ठेवायचे असतात, हे तंत्र साधण्यात दादा ‘अग्रेसर’ आहेत. राजकारणात साम-दाम-दंड-भेद वापरताना स्वत:वर ‘बिघडलेला स्वयंसेवक’ं अशी टीकाही ओढावून घेता कामा नये, याचे अचूक भान त्यांना असते. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचे ते निकटवर्ती आहेत. संघ आणि संघ परिवारातील संघटनांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. अनेकांना माहिती नसेल, पण दादा कोणत्याही गाव-शहरात गेले की, तेथील विद्यार्थी परिषदेच्या जुन्या कार्यकर्त्याकडे जाऊन जेवतात, त्यांची विचारपूस करतात आणि त्यांना काय हवे-नको तेही बघतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे अत्यंत स्रेहाचे आणि विश्वासाचे संबंध आहेत. ‘तुम्ही म्हणताय ते मला पटतंय, पण मला एकदा याबाबत मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करावी लागेल,’ असे धोरणात्मक निर्णयचा विषय आला की ते हमखास सांगतात. राज्यात क्रमांक दोनचे मंत्री होताना त्यांना असा संयम कामी आला आहे. मुख्यमंत्र्यांना परोक्ष वा अपरोक्ष आव्हान देण्याची भाषा ते कधीही करत नाहीत. आता ते प्रदेशाध्यक्ष झाल्याने आगामी निवडणुकीचा सर्वार्थाने भार एकट्या मुख्यमंत्र्यांवर पडणार नाही.

पक्षसंघटना आणि सरकार यांचा जबरदस्त मेळ असणे, हे निवडणुकीतील यशासाठी आवश्यक असते. तो मेळ फडणवीस-पाटील जोडगोळीमुळे शक्य होणार असल्याने, भाजपच्या दृष्टीने चंद्रकांतदादांची नियुक्ती योग्य अशीच आहे. मुंबई भाजपचे अध्यक्षपद पाचव्यांदा आमदार असलेले मंगलप्रभात लोढा यांना देऊन मंत्रिपदाने हुलकावणी दिलेल्या एका ज्येष्ठ नेत्याला पक्षाने थोडा का होईना, पण न्याय दिला आहे. त्यांच्या रूपाने पक्षाने एक आश्वासक हिंदी भाषिक चेहराही दिला आहे. त्यांचा स्वभाव सौम्य असला, तरी पक्षासाठी झोकून काम करण्याची त्यांची पद्धत सर्वांनाच ज्ञात आहे़ मंगलप्रभात लोढा यांचे शिवसेनेसोबतही चांगले संबंध आहेत़

Web Title: Volunteer Serving

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.