विशेष लेख: शिंक्याचे तुटले आणि (कोरियन) बोक्याचे फावले!
By विजय दर्डा | Updated: September 1, 2025 06:34 IST2025-09-01T06:30:27+5:302025-09-01T06:34:42+5:30
बीजिंगमध्ये आयोजित सैन्याच्या कवायतीसाठी चीनने किम जोंग उन या उत्तर कोरियाच्या सणकी, कर्दनकाळ हुकूमशहाला का निमंत्रण दिले असेल?

विशेष लेख: शिंक्याचे तुटले आणि (कोरियन) बोक्याचे फावले!
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानमार्गे चीनला पोहोचले आहेत. जपानशी आपले संबंध नेहमीच उत्तम राहिले आहेत. हे नाते फक्त आर्थिक नाही, सांस्कृतिकही आहे. जपानला आर्थिकदृष्ट्या मागे टाकून आपण तिसरी मोठी शक्ती बनलो असलो तरी जपानची तांत्रिक क्षमता अफाट आहे. मोदी तब्बल ७ वर्षांनंतर चीनच्या दौऱ्यावर गेले असल्याने या भेटीवर संपूर्ण जगाची नजर आहे. या दोन महासत्ता नेमके काय करतील, याची उत्सुकता विश्वसमुदायाला असणे स्वाभाविकच. दरम्यान ट्रम्प यांनी आपला प्रस्तावित भारत दौरा रद्द केल्याची बातमी आहे. त्यांनी भारताला ‘डेड इकॉनॉमी’ म्हटले; परंतु भारताचा जीडीपी अजूनही ७.५ च्या वेगाने वाढतो आहे, हे वास्तव त्यांना चांगलेच झोंबले असणार. अर्थात, अजूनही वेळ गेलेली नाही. प्रयत्न केले तर भारत-अमेरिकेचे संबंध अजूनही रुळावर येऊ शकतात.
या संपूर्ण उलथापालथीत एका बातमीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. चीनने ३ सप्टेंबरला बीजिंगमध्ये होणाऱ्या लष्करी परेडसाठी उत्तर कोरियाच्या खुंखार हुकूमशहाला मुख्य पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे. त्या लष्करी परेडला पुतीनही असणार आहेत. आता प्रश्न असा की, यावर्षी चीनने उत्तर कोरियाच्या हुकूमशहाला का बोलावले आहे? या आधीही १९५९ साली किम जोन यांचे आजोबा किम सुंग यांनी चिनी कवायतीत भाग घेतला होता. त्यानंतर तेथील कोणत्याही नेत्याला चीनने कधीच बोलावले नाही. पण आता मात्र शिंक्याचे तुटले आणि बोक्याचे फावले, असे झाले आहे. चीनला अचानक उत्तर कोरिया प्रेमाचा उमाळा यावा?
रशिया आणि चीन हे दोन उत्तर कोरियाचे मोठे समर्थक आहेत. जगातला हा उपद्रवी गुंड असून, अमेरिकेविरुद्ध एक हत्यार म्हणून त्याचा उपयोग होऊ शकतो हे दोन्ही देश जाणून आहेत. या दोन देशांनी नजर वाकडी केली तर आपण अडचणीत सापडू हे किम यांनाही कळते. म्हणूनच ते आपल्या सैनिकांना रशियाच्या बाजूने लढण्यासाठी पाठवतात आणि गरजेनुसार रशिया आणि चीनला मजूरही पुरवतात. मजूर आणि सैनिक पाठवल्याने थोडे पैसेही मिळतात आणि त्यातला बराच भाग किम जोंग यांच्याकडे जातो.
अमेरिका आणि उत्तर कोरिया यांचा नेहमीच छत्तीसचा आकडा राहिला. कोरियाचे दोन भाग झाल्यानंतर दक्षिण कोरियावर अमेरिकेची छत्रछाया राहिली. रशियाच्या सावलीतला उत्तर कोरिया हुकूमशहाच्या ताब्यात गेला. अमेरिकेने पुष्कळ प्रयत्न करूनही किम जोंग उन यांनी शेवटी अणुबॉम्ब तयार केलाच. न्यूयॉर्क, वॉशिंग्टनसह महत्त्वाची अमेरिकन शहरे आपल्या माऱ्याच्या टप्प्यात येतात असा दावाही ते करत असतात. २०१९ साली डोनाल्ड ट्रम्प यांनी किम जोंग उन यांची भेट घेतली होती. मात्र, किम यांनी ट्रम्प यांची एकही गोष्ट ऐकली नाही आणि शांतिदूत होण्याचे ट्रम्प यांचे स्वप्न अधुरे राहिले.
हुकूमशहाला आणखी एकदा भेटावे अशी ट्रम्प यांची इच्छा आहे. अलीकडेच दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती ली जे मॅग यांच्या भेटीच्या वेळी ट्रम्प यांनी ही इच्छा व्यक्त केली. चालू वर्षाच्या शेवटी ते शी जिनपिंग यांनाही भेटू इच्छितात .’जगातला हा गुंड तर आमचाच आहे’ असा संदेश अमेरिकेला द्यायची खुमखुमी म्हणूनच चीनला आली असावी. बीजिंगमधील सैन्य कवायतीत पुतीनही सामील होतील तर अमेरिकेचा खूपच जास्त तिळपापड होईल. २०१९ साली ट्रम्प यांच्या भेटीच्या वर्षभर आधी किम यांनी बीजिंगचा दौरा केला होता. ट्रम्प आणि किम यांच्यात चीन पाचर मारून ठेवील असा स्पष्ट संदेश अमेरिकेला जाईल असे मानायला काहीच हरकत नाही. ट्रम्प यांच्याबरोबर शी जिनपिंग यांचे बोलणे होईल तेव्हा जिनपिंग खूपच भारी पडतील यातही शंका नाही.
चीनची ही चाल हुकूमशहासाठी एक मोठी भेट ठरली आहे. या घटकेला जवळपास सर्व जगाने उत्तर कोरियावर बहिष्कार टाकला आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तान, कंबोडिया, व्हिएतनाम, इराण, लाओस, मलेशिया, उझबेकिस्तान, नेपाळ, मालदीव, बेलारूस, तुर्कमेनिया, आर्मेनियासह जगातील २० पेक्षा जास्त देशांचे राष्ट्राध्यक्ष ज्या कवायतीला उपस्थित असतील तेथे किम यांची उपस्थिती या हुकूमशहाला एकप्रकारे वैधता देईल. यात आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे? एक हुकूमशहा नेहमीच दुसऱ्याला साथ देत असतो.
ईदी अमीन किंवा हिटलरपेक्षाही किम जोंग नावाचा हा हुकूमशहा जास्त भयंकर आहे. त्याच्या कारकिर्दीत क्रौर्याच्या सर्व सीमा ओलांडल्या गेल्या आहेत. जे लोक सीमा ओलांडून उत्तर कोरियाबाहेर येऊ शकले त्यांच्या कहाण्या अंगावर काटा उभा करणाऱ्या आहेत. किम यांच्याशी निष्ठा असलेल्यांनाच प्योंगयांग या राजधानीच्या शहरात राहण्याचा अधिकार आहे. देशाच्या इतर भागांतील उत्तर कोरियाई नागरिक राजधानीत येऊ शकत नाहीत. ग्रामीण भागात भीषण गरिबी आहे. चुकून एखाद्याकडून काही आगळीक झालीच तर त्याच्या तीन पिढ्या तुरुंगात सडतात.
लोक आपल्या मर्जीनुसार कपडे परिधान करू शकत नाहीत. आपल्या मर्जीनुसार केशरचनाही करू शकत नाहीत. कोणत्याही चुकीला माफी नसते. सैन्यदल प्रमुखाला बैठकीत डुलकी आली तर त्याच्यावर थेट गोळ्या झाडल्या गेल्या. किम याने आपला भाऊ किम जोंग नईम याला मलेशियाच्या विमानतळावर चेहऱ्यावर विष फासून मारले. अशा हुकूमशहाला बळ देणे म्हणजे उत्तर कोरियामधील दमन वैध ठरवणे आहे. परंतु काय करणार? अशा शक्ती एकत्र याव्यात, ही वेळ ट्रम्प यांनीच जगावर आणली आहे. सामान्य माणसाच्या जगण्याशी त्यांना काय देणे-घेणे आहे?
आपण स्वतंत्र भारतात जगतो, हे आपले भाग्य होय ! सारे जहाँ से अच्छा हिंदोस्तां हमारा...